आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When Will These Victims Get Justice ? There Are So Many Cases Of Rape Are Pending Even After Verdict Of Death Sentence

या निर्भयांना न्याय कधी? आरोपींना मृत्युदंड सुनावूनही अंमलबजावणी न झाल्याने कोर्टाने चक्क फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्याचा प्रकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्भयानंतर हैदराबादमधील सामूहिक बलात्कार व खुनाच्या घटनेने समाजमन ढवळून निघत असताना आरोपींचे एन्काउंटर झाल्याने देशभर पडसाद उमटत आहेत. मात्र, अशा क्रूर वासनेच्या बळी ठरलेल्या निर्भया किंवा हैदराबादची पशुवैद्यक डॉक्टर या पहिल्या नाहीत. राज्यातही गेल्या ५ वर्षांतील अशा अमानुष घटनांमधील पीडितांची कुटुंबे अद्यापही न्यायाच्या अपेक्षेत आहेत. विशेष म्हणजे, काही खटल्यांत न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा अंमलबजावणीच न झाल्याने रद्द झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. (कंटेंट : दीप्ती राऊत, अनिरुद्ध देवचक्के, मंगेश फल्ले, महेश जोशी)

1. कोपर्डी हत्याकांड
 

दिनांक : १३ जुलै २०१६, स्थळ : कोपर्डी, अहमदनगर

घटना : नववीत शिकणाऱ्या पीडितेस रस्त्यात अडवून अत्याचार, खून करण्यात आला होता. ३-४ दिवसांत आरोपींना अटक झाली. कोपर्डी हत्याकांड म्हणून बहुचर्चित या प्रकरणानंतर राज्यात मराठा क्रांती मोर्चांचा आक्रोश सुरू झाला. राज्यभर या घटनेचे सामाजिक पडसाद उमटले. विधिमंडळाच्या सभागृहात चर्चा झाली. ७ ऑक्टोबर २०१६ रोजी मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. जलदगती न्यायालयात चाललेल्या या खटल्यात २९ नोव्हेंबरला तिन्ही आरोपींना फाशी सुनावण्यात आली.

आजची स्थिती : शिक्षेविरुद्ध अपील
 
सामाजिक दबावातून पोलिसांनी तपास केल्याचा आणि बचावपक्षाचे पुरावे-साक्षीदार घटनेशी विसंगत असल्याचा आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद आहे. यावर त्यांनी हायकोर्टात शिक्षेविरोधात अपील केले आहे.

आरोपी क्र. 1 - पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे वीटभट्टीवर मजूर. सध्या येरवडा कारागृहात
आरोपी क्र. 2 - संतोष भवाळ खांडवीचा रहिवासी. जितेंद्रसोबत कोपर्डीत वीट्टभट्टीवर मजूर, सध्या येरवडा कारागृहात
आरोपी क्र. 3 - नितीन भैलुमे कोपर्डीतील रहिवासी. सध्या कारागृहात.

त्यांना जगण्याचा अधिकार नाही
 
साडेतीन वर्षे झाली आमच्या घटनेला. अद्याप न्याय मिळालेला नाही. येथील न्यायालयात फाशी झाली, पण केस पुढे गेली. अशा प्रकरणातील आरोपींना जगण्याचा अधिकार नाही. लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. - रेखा, पीडितेची आई

2. नयना प्रकरण
 
अभियंता नयना रात्री कामावरून घरी जाण्यासाठी झेन्साॅर कंपनीजवळ उभी हाेती. त्या वेळी आरोपी योगेश राऊतने इंडिका कॅबमधून तिला घरी सोडण्यासाठी गाडीत बसवले. गाडीत आधीपासून बसलेल्या राऊतच्या दोन मित्रांनी धावत्या गाडीत बलात्कार केला. त्याच अवस्थेत हडपसर परिसरात ४ तास फिरवले. आणखी एका साथीदारास बाेलावून सगळ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. खेड परिसरातील जंगलात अाेढणीने तिचा गळा आवळून खून केला, चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला. तिची पर्स, पाकीट, साेन्याच्या बांगड्या घेऊन अाराेपी पसार झाले. १६ ऑक्टोबरला पोलिसांनी आरोपींना अटक केली. पीडितेच्या पतीसह नागरिकांनी मोर्चे काढल्यावर १७ महिन्यांनी पोलिसांनी योगेश राऊतला बेड्या ठोकल्या.


आरोपी क्र. 1 - योेगेश अशाेक राऊत, रा.गाेळेगाव, अाळंदी, ता.खेड, पुणे
आरोपी क्र. 2 - महेश बाळासाहेब ठाकूर, रा.साेळू, ता.खेड, पुणे
आरोपी क्र. 3 - विश्वास हिंदूराव कदम, रा.मरकळ, ता.खेड, मु.रा.खटाव, सातारा
निर्दोष मुक्तता - राजेश पांडुरंग चाैधरी, रा.गाेळेगाव, अाळंदी, पुणे

3. ज्योतीकुमारी प्रकरण
 
पुण्यात बीपीओ कंपनीत कार्यरत ज्योतीकुमारी घरी परतत असताना टॅक्सीचालक पुरुषोत्तम बोराटेने साथीदारासह तिच्यावर बलात्कार करून खून केला. तिचा मृतदेह मावळ परिसरातील गहुंजे येथे फेकून तिला कंपनीत सोडल्याची खोटी नोंदही केली. पुणे सत्र न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात आरोपींना मार्च २०१२ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली होती. मे २०१७ मध्ये त्यांचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींना फेटाळला होता.


आरोपी क्र. 1 - पुरषोत्तम बोराटे (टॅक्सीचालक)
आरोपी क्र. 2 - प्रदीप कोकडे (साथीदार)

4. मानसी प्रकरण

११ जून २००९ - औरंगाबाद, बलात्कारानंतर पीडितेवर २१ वार


औरंगाबादेत ११ जून २००९ रोजी २१ वर्षे वयाच्या मानसी या तरुणीवर बलात्कार करून अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली होती. ती घरात एकटी झोपलेली असताना चोरीच्या उद्देशाने आत शिरलेल्या जावेद खान ऊर्फ टिंगऱ्या याने मोबाइलच्या वायरने तिचे हात तर ओढणीने पाय बांधले. मोबाइल, सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम चोरली. नंतर मानसीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हर घालून आणि शरीरावर २१ वार करून हत्या केली. या घटनेचे समाजात तीव्र पडसाद उमटले. मोर्चे, निदर्शने झाली. यामुळे पोलिसांवर दबाव वाढला.

आजची स्थिती : फाशी प्रलंबितच
 
२२ जून २००९ रोजी प्रदीप चंडालिया, राम बोडखे आणि जावेद खान ऊर्फ टिंगऱ्या या आरोपींना अटक झाली. जिल्हा सत्र न्यायालयाने २४ जून २०१२ रोजी जावेद खानला १० वर्षे कैदेची शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात टिंगऱ्याला फाशीची मागणी केली. ती मान्य करत ९ मार्च २०१६ रोजी न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. मात्र, आजवर त्याची अंमलबजावणी झालेली नाही.


आरोपी - जावेद खान ऊर्फ टिंगऱ्या

फाशी झाल्यावरच शांती लाभेल
 
ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाची होती. मात्र, आरोपीला अजूनही फाशी झालेली नाही. ती लवकर व्हावी. फाशी झाल्यावरच मानसीच्या आत्म्याला शांती लाभेल. - पीडितेचे नातेवाईक

5. ८ ऑगस्ट २००९ । खराडी, पुणे
 

आजची स्थिती : सुनावणी प्रलंबित


जिल्हा सत्र न्यायालयाने ३ अाराेपींना मे २०१७ मध्ये फाशीची शिक्षा, तर माफीचा साक्षीदार एका आरोपीची मुक्तता केली. आरोपींनी हायकोर्टात अपील केले. सुनावणी प्रलंबित आहे. यापूर्वी आरोपींनी चंदननगरातील एका महिलेवर बलात्कार करून खून केला हाेता. विश्रांतवाडीतील एका चालकाच्या पत्नीचे अपहरण करून बलात्कार केला होता.

या एन्काउंटरचा अानंदच वाटतो


आम्ही अशाच अत्याचाराविरोधात ११ वर्षांपासून लढत अाहोत. अद्याप नयनाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या एन्काउंटरमुळे आनंदच झाला. या ११ वर्षांत आम्हाला प्रचंड त्रास झाला, संघर्ष करावा लागला तरी न्याय अधांतरी आहे. बलात्काराच्या गुन्ह्यातील अाराेपींना फाशीचीच शिक्षा सुनावली पाहिजे तरच वचक बसेल. - अभिजित, पीडितेचे पती

6. १ नोव्हेंबर २००७ - पुणे
 

आजची स्थिती : आता जन्मठेप


२४ जून २०१९ रोजी दोघांना येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात येणार होती. परंतु त्याविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला गृहखात्याने विलंब केल्याने हायकोर्टाने त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना जन्मठेप सुनावली.

अाम्हाला न्याय मिळाला नाही


फाशीची शिक्षा होऊनही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ती रद्द होते याचा दाहक अनुभव आम्ही घेतला. एवढे अमानुष कृत्य करून त्यांना जीवनदान मिळाले, ही बाब खेदजनक अाहे. गंभीर गुन्ह्यातही न्याय याेग्य मिळत नसेल तर असे गुन्हे करणाऱ्यांची प्रवृत्ती वाढेल. - पीडितेचे नातलग गौर सुंदर

आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा न्यायालयीन मार्गाने मिळायला हवी होती : डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे : हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळण्याचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या चारही आरोपींचे पोलिसांनी एन्काउंटर केले आहे. मुळात आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा मिळायला हवी होती. परंतु बऱ्याच वेळा न्यायालयात निकाल लागण्यास विलंब लागतो. ज्योतीकुमारी चौधरीच्या केसमध्ये तर सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून आरोपींना जामीन देण्यात आला. हैदरबाद एन्काउंटरचे कौतुक केले जात आहे. परंतु या प्रकरणातील आरोपी हे खरे होते की नाही हे न्याय्य पद्धतीने सिद्ध झाले नसल्याने याबाबत शंकेला जागा निर्माण होते. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे मत शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले अाहे.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, या एन्काउंटरमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरा प्रश्न हा आहे की एन्काउंटर झाले की घडवले गेले. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना असे एन्काउंटर होते त्या वेळी पोलिस यंत्रणेवर शंका येते. ज्यांनी वेळीच कारवाई केली नाही, तक्रार नोंदवून घेतली नाही अशा सगळ्यांवर कारवाई होऊ शकते. म्हणूनच यावर पडदा टाकण्यासाठी केलेला हा प्रयत्न असू शकतो. हे एन्काउंटर केले की घडवले याची केंद्राने चौकशी करायला हवी. जे घडलं त्यावर पडदा टाकण्यासाठी हे केलं गेलं आहे का, असा सवाल विचारत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

वकिलांचे मत... 

कारवाई चांगलीच, मात्र हा काही कायदेशीर न्याय नाही


हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचे एन्काउंटर केल्याने स्थानिक पोलिसांचे देशभरातून कौतुक होत आहे. मात्र वकिलांनी हा प्रकार घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. आरोपींना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी होती. हा कायदेशीर न्याय नाही, अशी प्रतिक्रिया पुण्यातील वकिलांनी व्यक्त केली आहे.

आरोपींची शिक्षा न्यायालयच ठरवेल


कायदा व कायद्याची प्रक्रिया आपणच संविधानाद्वारे प्रस्थापित केली असून ती पाळली पाहिजे, असे नागरी बंधन आपल्यावर आहे. त्यामुळे एन्काउंटर हे बेकायदेशीरच आहे. आरोपीला काय शिक्षा द्यायची हे न्यायालय ठरवेल. पोलिसांनी न्यायाधीशांची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. लोकांच्या भावना लक्षात घेता न्यायालये बंद करून सर्व अधिकार पोलिसांना द्यायचे का? - अॅड. असीम सरोदे

असा गुन्हा करणाऱ्यांना जरब बसेल


आरोपींचा खटला चालवून कायद्याने दिलेले अधिकार मिळायला हवे होते. एवढ्या सकाळी त्यांना घटनास्थळी नेण्याची गरज नव्हती. कायद्याच्या दृष्टीने विचार केला तर हा सर्व घटनाक्रम नाष्ट्यमय दिसतो. मात्र एन्काउंटर केल्याने अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्यांना जरब बसणार आहे. - अॅड. अमोल डांगे

कायद्यानुसार न्याय झाला का?


एन्काउंटरचे स्वागत नैतिक विजयासाठी चांगले आहे. मात्र कायद्यानुसार न्याय झाला का? पोलिसांची वस्तुस्थितीची सत्यता संशयाची भावना निर्माण करते. ही "कस्टोडियल किलिंग' आहे, असे जाणवते. प्रत्येकाला त्याची बाजू सिद्ध करण्याचा हक्क कायदा देतो. तो आरोपींकडून काढून घेण्यात आला आहे. - अॅड. पुष्कर पाटील

समाजात चुकीचा संदेश जाईल


एन्काउंटरचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. येत्या काळात त्यातून समाजात चुकीचा संदेश जाईल. यापुढील प्रत्येक घटनेतील आरोपींना अशाच प्रकारे मारण्याची मागणी होईल. त्यातून एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. पोलिसांना कोणाला शिक्षा देण्याचा अधिकार नाही. ते काम न्यायालयाचे आहे. - अॅड. विकास शिंदे