आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे ऊन कुठून आलं इथं?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे समदं आपल्याच लोकांनी केलंय, ईश्वास ठेवा तुमी! हे कुण्या बाहेरच्याच काम नाय. नाही तर कसं, तिच्या छाताडाला एवढी भोकं पाडली कुणी? ही एवढी धुरकांडी आनून तिचा गळा दाबला कुनी? आरं ही समदी एका वानाची माकडं हायती. आन तुमी त्यात नाय म्हनताव का काय? उगी उन्हाच्या नावानं बोंबा मारण्यात काय अर्थय!


असे किती जन्माचे दुःखाचे उमाळे बाहेर येताहेत तिचे? तिच्या पोटातला लाव्हा जणू वाऱ्यावर वाहतोय. त्या लाव्ह्यातून ओसंडणारी कोरडी आग अंग भाजून काढतेय. हे कोणत्या प्रदेशात आलोय मी, आणि कोणत्या होरपळणाऱ्या ऋतूत?


सकाळ होतच नाही या प्रदेशात आजकाल. बालपणातच निबर झालंय ऊन. आता ते रांगत, बागडत येत नाही इथल्या अंगणात, इथल्या गॅलरीत. काल परवाची तर गोष्ट आहे, गॅलरीत कोवळं ऊन यायचं, मांजरीसारखं उन्हाच्या पाठीवर हात फिरवत बसून राहावं वाटायचं उगीच. मी काहीबाही वाचत बसून राह्यचो गॅलरीत आणि बकरीच्या गोड पिलानं अंग घासत जावं भिताडाला तशी एक हवीहवीशी ऊब अंगात मुरत जायची. अस्थीमज्जेत नव्या पेशींचा कारखाना सुरु व्हायचा. नाही तर हे मवाली ऊन जरा घराबाहेर पडावं तर भर रस्त्यात गचूरं धरून जोरात कानसुलीत लगावत राहतं ज्याला त्याला. त्यानं ओळखू नये मला म्हणून मी डोळ्यांवर काळा चष्मा चढवतो, डोक्याला गुंडाळतो काही तरी आणि बाहेर पडतो पण तरीही हा दुश्मन ओळख विसरत नाही माझी आणि माझी आंधळी त्वचा जाळू पाहतो. मला ठेवतो या सनातन चुलवणावर आणि माझं रक्त उकळू लागतं. रक्तपेशी विसरतात त्यांचा धर्म… लाल तांबड्या, पांढऱ्या पेशी सैरावैरा धावत सुटतात, साती खंड व्यापून टाकतात. माझा मेंदू बरळू लागतो ताप आलेल्या माणसासारखा आणि त्याच्या उजव्या डाव्या अर्धगोलात होऊ लागतात स्फोट. ख्राइस्टचर्चच्या मशीदीवर उडतात रक्ताचे शिंतोडे प्रत्यक्ष त्याच्यासमोर नतमस्तक झालेल्या माणसांचे आणि कोलंबोतील चर्चमध्ये येशू परत चढतो सूळावर! इस्टर संडेला त्याला भेटायला आलेल्या लोकांना चर्चमध्येच भेटतो सैतान आणि पारा इतका चढतो की मावत नाही तापमापकात! 
आभाळीच्या बापा, इतकी शतकं लोटली पण आपण काय करतोय ते त्यांना अजूनही समजत नाही. तू त्यांना माफच कर. पण माझ्यातली होती नव्हती ती सारी ओल संपवणाऱ्या या उन्हाला कसं रे माफ करु मी? या उन्हाच्या कटाविरुद्ध मला एकवटलंच पाहिजे, बळ म्हणून मी चालत राहतो तसाच बेगुमान निखाऱ्यावरून चालावं तसं! उन्हात भाजलेल्या माझ्या कपाळावरून घामाची लहानशी धार डोळ्यांच्या कडेने गालावरून ओठाच्या डाव्या कोपऱ्यातून जिभेवर उतरते, हिमालयातून उतरणाऱ्या गंगेसारखी! घामाची खारट ओली चव रक्तात मिसळते. नवा हुरुप येतो. जोवर ही गंगा कपाळवरून वाहते आहे तोवर या सनातन उन्हाचे सारे डाव उधळून टाकायची त्रिवार शक्यता आहे.


मी घरी येतो आणि बेडरूममधला एसी चालू करतो. दोन-तीन मिनिटात काहिली शांत होते जिवाची. घरातला उष्मा बाहेर ओकत एसी मला थंड करत राहतो आणि बेल वाजते. उन्हाला केसात माळत आमची कामवाली संगीता आत येते. ती पाठमोरी होत किचनकडे जाते तेव्हा तिच्या डोक्यातला गुलाब दिसतो मला. मी मंदसा हसतो, एसीतून येणाऱ्या थंड हवेसारखा. पहिल्या दोन पोरींनंतर आता पोरगाच पायजे म्हणणारा तिचा नवरा मला आठवतो. किचनमधून भांड्यांचा आवाज सुरू होतो आणि बायकोची आणि तिचा संवाद कानावर पडू लागतो.


‘अग बाई, आज काही तरी खास दिसतंय गुलाबाचं फूल माळलंय डोक्यात?’ बायको तिला चिडवते. आपला नवरा सटीसामाशी साधा मोगऱ्याचा गजराही आणत नाही, हे असावंच तिच्या मनात कुठं तरी.


‘नवऱ्यानं सकाळसकाळीच घातलंय डोक्यात,’ कामवाली सांगते.
बायको तिला अजून चिडवू पाहते, पण ती ‘कसलं काय अवो बाई,’ असं म्हणत ती बायकोच्या कानात काही तरी कुजबुजते. ते मला ऐकू येत नाही. कामवाली गेल्यावर बायको मला सांगते, ‘ऐकलं का?,’ मी ऐकत राहतो. कामवालीच्या डोक्यातला गुलाब वेगळाच असतो. तिचा नवरा म्हणे ती घरी गेल्यावर ते फूल चेक करतो. ते जर चुरगाळलं असेल तर, ‘तुला कुणी चुरगाळली गं हरामखोर,’ म्हणून खुशाल मारहाण करतो. मी पडून राहतो निपचित, भिंतीवर चढणाऱ्या पालीकडं पाहत. हे कसलं ऊन आहे सालं. या उन्हात असले गुलाब उगवतात, निर्जीव पाकळ्यांचे आणि जहरी काट्यांचे! ना गंध, ना मुलायमपण. उन्हाचं हे नवीनच वाण कुणी आणलंय, कुणी फोफावलंय या प्रदेशात? मी गॅलरीत येतो, समोरच्या एकमेव झाडाकडं पाहतो. त्याची पानं, फांद्या उन्हाला फितूर झालेली. झाड मख्ख उभा असतं, जिवंतपणाची कोणतीच खूण नसल्यासारखं. वाटतं आता वारा येईल आणि झाड थरथरेल तिला आठवून पण …मी मोबाइलला शरण जातो. तर तिथंही तेच! यूट्यूबवर व्हिडिओ दिसू लागतो. माळरान झालेल्या गावात चिमणीला पुरेल एवढंही पाणी नाही. गावापासून चार-पाच किमी दूर असलेल्या विहिरीवर घागर, कळशी, पिपं घेऊन बायका जमल्यात. विहिर आ वासून त्यांच्याकडे पाहतेय. विहिरीला ना पायऱ्या, ना रहाट! फक्त तिच्या तळाशी थोडंसं पाणी दिसतंय. दोराला कमरेला बांधून एक हाडापुरती उरलेली बाई त्या विहिरीत उतरतेय, जिवाच्या करारावर. मध्येच दगडांचे सुळके आडवे येताहेत पण तरीही ती उतरतेय आणि सगळ्यांची भांडी भरुन देतेय. ती हडकुळी बाई मरणाच्या दारातून हंडाभर पाणी घेऊन ऊन तुडवत घराकडे निघालीय. घरात छत फाडून ऊन उतरलंय. उन्हानं तिचं घरच काय अवघं गाव लुटून नेलंय. उरलंय काय? नाही म्हणायला या बायकांच्या डोळयांत थोडं पाणी आहे अजून, अजून ते उन्हाच्या मुठीत गवसलेलं नाय. कमूचा मेसेज दिसतोय, ‘शेतात चौथा बोअर घेतला, पण पाणी लागलं नाय.’  हजार हजार फूट खोल जाऊनही ओल गवसत नाही. या उन्हानं पाण्याचा एवढा काळाबाजार कसा केला? की आपणच माती खाल्लीय. मी लिहतोय, बोलतोय की बरळतोय, ‘कमू, तुला आठवतं ना, अशाच उन्हाच्या कारात डांबरी रस्त्यावरून अनवाणी चाललेली म्हातारी. तू न राहवून तुझी पायातली चप्पल काढून तिला दिली होतीस. म्हातारी किती गोड हसली होती, सुरकतलेली बोटं तुझ्या चेहऱ्यावरून फिरवत.’ आपल्या तळपायातही ओल होती कालपर्यंत. परवा गावाकडं गेलो तर बॅक वॉटरचं एकदम आटलेलं पाणी दिसलं रेल्वेतून आणि शेकड्यांनी मोटारी, पाण्याच्या दिशेने  सापासारखे वळवळत गेलेले किती तरी पाइप…! 


हिरवळीचा टिपूसही नसलेल्या वावराकडं खोल गेलेल्या डोळ्यांनी पाहत गुरं निष्पर्ण बाभळीखाली उदास उभी आहेत. हंबरणारे काही सुदैवी जीव चारा छावणीत दाखल झालेत आणि तो हंबरडा हरवलेल्या घरातील म्हातारीकोतारी आपल्यासाठी बी अशी चारा छावणी कोण काढील अशी वाट पाहत गुडघ्यात मान घालून बसलीत. उन्हानं ती हिरवी रानं पण नेस्तनाबूत केली हे खरंच! हे काय कारस्थान आहे… हे ऊन या प्रदेशात आणलं कुणी? कुणी वाट दाखवली त्याला या गावाची, त्या हिरव्या रानांची! महादेवाच्या देवळाजवळ कायम पडून असलेला तो येडा मवन्या मला म्हणाला, ‘हे समदं आपल्याच लोकांनी केलंय, ईश्वास ठेवा तुमी! हे कुण्या बाहेरच्याच काम नाय. नाही तर कसं, तिच्या छाताडाला एवढी भोकं पाडली कुणी? ही एवढी धुरकांडी आनून तिचा गळा दाबला कुनी? आरं ही समदी एका वानाची माकडं हायती. आन तुमी त्यात नाय म्हनताव का काय? उगी उन्हाच्या नावानं बोंबा मारण्यात काय अर्थय!’


मवन्या बोलून चालून येडा जीव, त्याचं किती मनावर घ्यायचं? मी हसलो आन पुढं आलो, पण मोबाइल टॉवरवर बसलेली चिमणी मला म्हणाली, ‘मवन्या म्हनतू ते खरंय?’


तुम्ही असं हसताय कशामुळं? मला ऊन लागलं म्हणून असं बरळतूय असं वाटतंय का तुम्हाला?
मला चिमणीची भाषा कशी कळली? अरे ही चिमणाकावळ्यांची भाषा आपल्याला कळली तरच या उन्हाचा बिमोड करता येईल. आयच्यान, चिमणी मला म्हणाली, ‘काल शेतात काम करत असताना सुदाम्या ऊन लागून गेला. आज तेला ऊन लागलं, उद्या तुला बी लागू शकतंय. तुला झाड व्हावं लागलं, झाड!’
चिमणीचं बोलणं मला कळतंय. झाडाच्या नुसत्या नावासरशी एक झुळूक माझ्या अंगावरून गेली आणि एक काळा ढग आभाळातून पुढं सरकतोय…!
लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६

बातम्या आणखी आहेत...