आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत पैसा येताे काेठून? देताे काेण? कुणी सांगेल का?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवनीत गुर्जर


मागील लाेकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी जाे खर्च केला, त्याचा अहवाल आला आहे. भाजपला जिंकलेली एक जागा चार काेटीत तर काँग्रेसला १५ काेटीत पडली. अखेर इतका पैसा आला तरी काेठून? ज्या दिवशी हे स्पष्ट हाेईल की, पैसा काेठून आला तेव्हा निवडणुका स्वच्छ हाेतील. जिंकलेल्या आणि पराभूत झालेल्यांचा खर्च एकत्र केला तर भाजपच्या प्रत्येक उमेदवारावर सुमारे ३ आणि काँग्रेसच्या उमेदवारावर जवळपास दाेन काेटी रुपये खर्च झाला आहे. राजकीय पक्ष आयकर भरत नाहीत. यासंदर्भात आरटीआयच्या माध्यमातून काेणी काही विचारू शकत नाही. सामान्य लाेकांना आपण कर सवलत देऊ इच्छित नाही. याउलट मध्यमवर्ग आपली काळजी स्वत:च घेईल असे म्हणत नवे कर लादत राहता. कर भरला नाही तर रस्ते कसे बनणार? वीज कशी येणार? या रस्त्यांवर राजकीय पक्ष चालत नाहीत का? विजेचा वापर करीत नाहीत? काही तरी हिशेब मांडला पाहिजे. कधी तरी हे झालेच पाहिजे. मग निवडून आलेल्या खासदारांनी सामान्य जनतेचे काय भले केले? काेणी त्याचा पाढा वाचेल का?

अखेर, तुमच्या येण्याचा काही फरक जाणवला पाहिजे. काहीच तर बदललेले नाही. रात्र तशीच पेंगाळून येते. तारेदेखील रात्रभर जांभया देत राहतात. सूर्य तसाच डाेळे मिचकावत राहताे. तुमच्या येण्याने जीवनशैलीत खरेच काही फरक पडला असता!! न तहान लागली असती किंवा नखे वाढण्याचे थांबले असते. न केस हवेत भुरभुरले असते किंवा श्वासातून धूर नसता निघाला. काहीच तर बदललेले नाही. मग असे काय आहे की, साऱ्या सवलती नेत्यांना, राजकीय पक्षांना मिळत राहतात आणि त्याची पूर्तता करण्यासाठी सामान्य जनतेने कर भरणा करीत राहावे? मग जे लाेक काेट्यवधी रूपये खर्चून निवडून येतात त्यांच्याकडून प्रामाणिकता आणि पारदर्शकतेची अपेक्षा कशी करावी?

दुसऱ्या बाजूला आम्ही सामान्य लाेक. आम्हाला काेणाशी काही घेणे-देणे नाही. प्रश्न विचारायची तयारीच नाही. भावनांच्या लाटेवर स्वार हाेत मते देऊन टाकताे. मग पाच वर्षे त्याची फळे भाेगत राहताे. शेजाऱ्याच्या घराला आग लागली तर आम्हाला काय त्याचे? आणि एकाने म्हटले- आपल्या घराला आग लागली तर म्हणतात, तुम्हाला काय? नाेटबंदीमुळे देशाचे काही भले झाले की ना झाले, पण ती चांगली यासाठी वाटली की काही लाेक शेजाऱ्यावर कुढत हाेते. माझ्यासमाेर मर्सिडीजमध्ये जात हाेता, आता बरे झाले! माझ्यासमाेर पैशाचा रुबाब दाखवायचा, बरे झाले! काेणीतरी आवाज उठवा की या राजकीय पक्षांनी अब्जावधी रुपयांचा निवडणूक खर्च कमावला तरी काेठून? कुण्या उद्याेगपतीला काेणती लालूच दाखवून ते हडपले? आणि जिंकल्यानंतर त्याचे काेणत्या स्वरूपात, काय भले केले? या प्रक्रियेत आमचे काय नुकसान झाले? आमच्याकडून काय-काय लुटले गेले? काेणालाच काही माहीत नाही, अखेर हे केव्हापर्यंत आणि का चालत राहणार?

नवनीत गुर्जर, नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर