आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुठे हरवलास डायोनिसस?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आकाश, वादळ आणि विजांचा राजा झ्यूस हा ऑलिंपस पर्वतावरच्या सगळ्या देवांचा राजा होता. अपोलो आणि डायोनिसस ही त्याची दोन मुलं. अपोलो म्हणजे ताळतंत्र आणि नीटनेटकेपणाचं प्रतीक. याउलट डायोनिसस म्हणजे सहजप्रेरणा आणि उत्कटता. अपोलो डोक्यानं काम घेतो, शांतपणे, तर्कशुद्ध विचारांनीच चालतो. डायोनिसस मात्र भावनांवर स्वार होऊन जीव ओतून काम करतो. अपोलोला सूर्याच्या तेजाची झाक आहे, तर डायोनिसस मनमोकळ्या नृत्याचं प्रतीक! एकाच देवाची ही दोन मुलं.... सख्खी भावंडं. कुणी त्यांना कधी आमने-सामने उभं केलं नाही आणि तेही कधी एकमेकांच्या आड आले नाहीत. दोघं आपापल्या रस्त्याने जात राहिले… आणि अचानक एका वळणावर दोघांच्या लक्षात आलं की अपोलोच्या रस्त्याचा भव्य हमरस्ता झाला आहे. काळाने अशी वळणं घेतली की कळायच्या आत अपोलो एका अघोषित स्पर्धेचा विजेता ठरला आहे.  ग्रीक पुराण वाचता वाचता एकोणिसाव्या शतकात जर्मनीतल्या फ्रेडरिक नीट्शे या विचारवंताला एकदम लक्षात आलं की हे दोघेही देव खरंतर तेवढेच तुल्यबळ. मग कधी झाली असेल त्यांच्यात स्पर्धा? आणि कसा जिंकला असेल अपोलो? सकाळ होते आणि फोनवरच्या एकामागोमाग एक वाजणाऱ्या अलार्मच्या कलकलाटात कधीतरी आपण उठतो. किती वाजले ते पाहून घड्याळाशी स्पर्धा करत आवरून कामावर निघतो. घड्याळाचे काटे फिरत राहतात आणि त्यांच्या पाठोपाठ आपण धावत राहतो. बँकेचा बॅलन्स, ईएमआय भरण्याची तारीख आणि जगाच्या बाजारात घसरत चाललेला रुपया… एक एक आकडे डोक्यात फेर धरून नाचू लागतात. टेबलावरून ओसंडून वाहणाऱ्या कामातून बाहेर पडण्यासाठी टपरीवर सिगारेटीच्या धुरात उभ्या उभ्या फेसबुक उघडतो, तर आपले सगळे ‘मित्र’ लाइक आणि रिॲक्ट करणारा आकडा बनून आपल्या पोस्टखाली निर्जीव बसलेले असतात. चांगली सुटी घालवायची तर चांगली नोकरी हाताशी लागते. तेव्हा कुठे जगातले सगळे आनंद हातात येऊ शकतात.  धाप लागते, पण थांबायचं कसं? चालत्या ट्रेनमधून उडी कुठे मारता येते? पोटाची खळगी भरायची तर पळावं तर लागणार. दाम करी काम आणि कामाशिवाय कुठे दाम! एकीकडे काडीने दात कोरत पारावर बसून ‘टिकटॉक’ करत बसणाऱ्या तरुणांचा जत्था दिवसेंदिवस वाढत चाललेला असतो. शेती हातातून निसटत चाललेली असते. घर संसाराच्या एक एक आशा मुठीत घट्ट धरून कुणी गावातून तालुका आणि तालुक्याहून उपनगर गाठायचं म्हणून तडकाफडकी निघतं. हातातल्या पगाराच्या आणि स्वप्नातल्या दुनियेच्या वजाबाकीच्या हिशेबानं फोनमध्ये एकेक ॲप डाऊनलोड होतं. आजवर वाटत होतं की, माझे पाय आणि पायाखालचा रस्ता माझ्याशी बेइमानी करतात. माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या दोन कवड्यांचीच ही चूक आहे… पण डोळे मिटल्यावर लक्षात येतं की माझी स्वप्नंच चोरीला गेली आहेत. मला काय हवं हेसुद्धा मला रस्त्याकडेचा भव्य फ्लेक्स सांगतो आहे. आनंद, शांतता आणि आरामावर किती मोठं बिल फाडलं जातंय! पन्नास टक्के डिस्काउंटमध्येही हे परवडेनासं आहे. एक जगज्जेता सम्राट त्याच्या महान स्वारीच्या दरम्यान एकदा त्याच्या म्हाताऱ्या गुरूला भेटायला जातो. कोवळं ऊन खात गुरू निवांत बसलेला असतो. मोठ्या उत्साहाने त्याचा महान शिष्य त्याला आपल्या स्वारीचा बेत सांगू लागतो. मिश्कीलपणे त्याचा गुरू विचारतो, ‘मग, आता काय करणार?’  सम्राट सांगतो, ‘आता हे शेजारचं साम्राज्य जिंकून घेणार!’  गुरू विचारतो, ‘मग, त्यानंतर?’ सम्राट आवेशात म्हणतो, ‘मग त्यापुढचं राज्य, त्याच्या पुढचं राज्य, सगळं जगच जिंकून घेणार!’ गुरू म्हणतो, ‘आणि मग?’ सम्राट हसतो, ‘मग काय! आरामच आराम!’ पाय पसरत शांतपणे पहुडलेला त्याचा गुरू म्हणतो, ‘मग आता मी काय करतोय?’ सकाळी उठल्या उठल्या पाठवण्याच्या व्हॉट्सॲप मेसेजेसच्या महाकाय दरीच्या खोल तळाशी अंधारात हरवलेली ही गोष्ट पाहून न पाहिल्यासारखी करायचा मी प्रयत्न करते, पण उशीर झालेला असताना कामाला निघायच्या गडबडीत ती हमखास वाट हरवून उभी राहते. अखंड पळत निघालेल्या माझ्या सोबत्यांच्या नजरा सतत एका ‘यशा’कडून दुसऱ्या मिळकतीकडे भिरभिरत राहतात आणि त्यापाठोपाठ पळण्याचा वेग वाढत जातो. वेगाबरोबर ठेच लागून पडण्याची भीतीही वाढत जाते. रोजीरोटीच्या मजबुरीमधली अगतिकता तर टाळता येत नाही, पण अमाप अनंत मजबुरीपलीकडे जगणंच न उरणं… याचं काय करायचं? पोटाला भाकर आणि निजायला निवाऱ्यापलीकडे खरंतर काय पाहिजे असं आणखी जगायला? पण आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी आणखी ‘मिळवत’ राहावं लागतं. मग मिळवत राहण्यासाठी पळता पळता अखेर कितीही आणि काहीही हाती आलं तरी काळ असामाधानाच्याच दोरांनी जखडून ठेवतो. मग कधी लागणार सुखाची झोप! आपण ‘महत्त्वाकांक्षी’ आहोत असं म्हणत स्वतःला डिफेंड करत राहतो, पण म्हणजे नेमकं काय? काय मिळालं की मिळवल्याच्या निर्भेळ आनंदात भिजता येईल? रसरसून जगण्याची भूक एकेका आकड्यावर भागू लागली की तब्येतही खराब होत जाते. आयटीतला पगार कितीही ऐटीत उचलला तरी त्याचं काय करायचं, हे सांगायलाही माणसं नेमावी लागतात. झगमग एकटेपणाच्या काचेच्या ऑफिसात रंग ओतण्यासाठीही पैसा खर्च करावा लागतो. सकाळी बागेत लाफिंग क्लबमध्ये हसणारा घोळका भेसूर दिसू लागतो. जपानसारख्या देशात रडण्यासाठीच्या खास कक्षांसाठी मोठ्या कंपन्या आणि सरकारही तरतूद करू लागतं.  का जिंकलास तू अपोलो? खरं तर वर्षानुवर्षं आपल्यामध्ये दोघंही राहत आले. भावनेच्या भरातला वेडेपणा आणि तर्कशुद्धतेच्या नादातलं कोरडेपण, दोन्हीची पोटभर चेष्टा झाली, तसं नेटक्या टापटिपीचं आणि भावनावेगाचं कौतुकही होत आलं. मग नेमका कधी आपण पद्धतशीर व्यवस्थेच्या नादी लागून गोंधळातल्या काव्याचा कायमचा निरोप घेतला असेल? आपल्या असण्याच्या निम्म्या शक्यता नाकारून कसलं माणूसपण शिल्लक राहणार! डायोनिसस कोपऱ्यात हसत उभा असतो. कृष्णाच्या बासरीचे सूर पकडून तो गुणगुणतो आणि विठूच्या गजरात मग्न होऊन फुगडी घालतो. सूफी संतांच्या सोबतीने गिरक्या घेऊ लागतो. वृद्ध विधवेच्या दुःखाशी एकरूप होऊन तिच्या खांद्यावर रडत राहतो आणि पहिल्या पावसात नाचणाऱ्या मुलांसोबत डबक्यात होड्या सोडतो. चुकून कुणाचं त्याच्याकडे लक्ष गेलं तर डोळे फाडून ते पाहा राहतात. हसण्याची, रडण्याची, चिडण्याची आणि घाबरण्याची इथे स्वतंत्र दालनं आहेत, एवढी साधी गोष्ट माहीत नसणाऱ्या या माणसाची रवानगी वेड्यांच्या दवाखान्यात होते. म्हणजे मग बाकीचे सगळे आपण शहाणे आहोत म्हणून सुरक्षितपणे मिरवू शकतात. एकच एक हमरस्ता आपली घरं, आपल्या जमिनींवरून भरधाव निघाला आहे. तेव्हा निर्वासित झालेल्या माझ्या माणासांनी कुठं जायचं? थांबतो तो तर संपतोच! डायोनिसस भिंतींना धडका देत ओरडत राहतो. अशा वेळी त्याचं असं रूप पाहून रस्त्यावरचं ट्रॅफिक काही क्षण थांबतं. खांद्यावरून मागे पाहत अपोलोही त्याला साद घालतो. तू आणि मी, यिन आणि यांग, अपोलो आणि डायोनिसस… दोघांचा हात  लागला आहे, तेव्हा कुठे ही पृथ्वी स्थिर आहे. ती कलू लागली की थैमान घालत वादळं येतात आणि आठवण करून देतात की डायोनिससलाही डोकं आहे आणि अपोलोच्या आत खोलवर रडतंय एक हळवं कोवळं मन.  लेखिकेचा संपर्क : ९०९६५८३८३२  

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser