अयोध्या : जेथे / अयोध्या : जेथे रामलला विराजमान तेथेच श्रीराम जन्मभूमी: योगी आदित्यनाथांची टिप्पणी

वृत्तसंस्था

Nov 08,2018 10:02:00 AM IST

अयोध्या - जेथे रामललाची मूर्ती आहे तिथेच त्यांचे जन्मस्थानही आहे, अशी टिप्पणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी येथे श्रीराम जन्मभूमीला भेट देऊन रामललाचे दर्शन घेतले आणि राज्याच्या सुख-समृद्धीसाठी वरदान मागितले. योगी म्हणाले की, ‘जेथे रामलला विराजमान आहेत तीच त्यांची जन्मभूमी आहे. आमचे सरकार अयोध्येचा विकास करण्यासाठी सतत काम करत आहे.

भगवान श्रीराम यांचे भव्य मंदिर अयोध्येत बांधले जाईल. हे एक घटनात्मक प्रकरण आहे आणि ते न्यायालयाच्या विचाराधीन आहे. राज्यातील सर्व स्थळांचा विकास व्हावा हे मुख्यमंत्री या नात्याने माझे कर्तव्य आहे आणि ती जबाबदारीही आहे. त्यासाठी मी संकल्पितही आहे. त्यामुळे फक्त पर्यटनाला तर चालना मिळेलच, शिवाय रोजगारही मिळेल. दिवाळीचा उत्सव ही अयोध्येची देणगी आहे. संपूर्ण देश मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्यामुळे हा सण साजरा करतो.योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येचे महत्त्व जागतिक पर्यटनाच्या मानचित्रावर घेऊन जाण्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक पर्यटनाच्या मानचित्रावर अयोध्येची चांगली प्रतिमा निर्माण व्हावी. त्यामुळे पर्यटक येथे येऊ शकतील.

तेथे तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळाव्यात. अयोध्येचा समग्र विकास व्हावा यासाठी हे संपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन म्हणजे आपल्या परंपरा आणि आपली संस्कृती यांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्न आहे. अयोध्येचा विकास व्हावा यासाठी त्यात सातत्य यायला हवे.


योगी यांनी मंगळवारी लहान दिवाळीनिमित्त कोरियाच्या प्रथम महिला किम जुंग सुक यांच्यासोबत अयोध्येला जाऊन भगवान श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांना राज्याभिषेक केला होता. त्यांनी दीपोत्सवात भगवान श्रीरामांच्या नगरीला अनेक भेटी दिल्या. राणी हो स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण करून रामकथा पार्क येथे फैजाबाद जिल्ह्याचे नाव अयोध्या करण्याची घोषणा केली होती. याप्रसंगी योगींनी अयोध्येला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची घोषणा केली. त्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयाला राजर्षी दशरथ यांचे आणि विमानतळाला भगवान श्रीराम यांचे नाव देण्याचीही घोषणा केली होती. अयोध्येत भव्य दीपोत्सवाचे आयोजनही करण्यात आले होते. अयोध्येला त्रेतायुगाप्रमाणे सजवण्यात आले होते. शरयू नदीच्या तीरावर एकाच वेळी विक्रमी तीन लाखांपेक्षा जास्त दिवे लावण्यात आले
होते.

योगी यांनी दिवाळीच्या सणानिमित्त श्रीरामांची नगरी अयोध्या येथून देशवासीयांना आणि राज्यवासीयांना शुभेच्छा दिल्या. अयोध्येत त्रेतायुगासारखी भव्य दिवाळी साजरी केल्यानंतर त्यांनी बुधवारी रामजन्मभूमी येथे जाऊन रामललाचे दर्शन घेतले आणि राज्याच्या सुख-समृद्धीसाठी आणि सुरक्षेसाठी आशीर्वाद मागितले. त्यांनी दिवाळीच्या दिवसाची सुरुवात हनुमान गढी मंदिरात पूजा-अर्चा करून केली आणि रामजन्मभूमीच्या वादग्रस्त परिसरात रामललाच्या दर्शनसाठी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी पूजा-अर्चा, दर्शनानंतर कनक भवन, सुग्रीव किल्ला आणि रामकथा पार्कच्या मागे श्रीरामांच्या नियोजित १५१ मीटर उंच पुतळ्याच्या प्रस्तावित जागेचीही पाहणी केली. त्यांनी दिगंबर आखाड्याचे (परमहंस आश्रम) संत सुरेशदास महाराज यांचीही भेट घेतली.

X
COMMENT