आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा भरलेला असो किंवा नसो, शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - अतिवृष्टीमुळे शेतातील पिके जमीनदोस्त झाली असून जिल्हा प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन सर्वतोपरी मदत करणारच आहे. शेतकऱ्यांनी विमा भरलेला असो किंवा नसो, प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट मदत करणार असल्याचे  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले.

गेवराई तालुक्यातील रेवकी महसूल मंडळात बांधावर जाऊन सकाळी साडेअकरा वाजता सुनील केंद्रेकर यांनी अचानक पाहणी केली. त्यांनतर  माजलगाव तालुक्यातील तालखेड मंडळातील टाकरवण शिवारात भेट देऊन नुकसानीचे पंचनामे केले. या पाहणीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बीड जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, कपाशी, सोयाबीन, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बीड जिल्ह्यात आले होते. यात पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे पंचनाम्यात दिसून आले.

माजलगाव तालुक्यातील टाकरवण, श्रृंगारवाडी येथे केंद्रेकर यांनी भेटी देऊन शेतातील नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, तुम्हा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यावेळी त्यांना शेतात बाजरी, कपाशी व सोयाबीनला पावसामुळे कोंब आल्याचे दिसले. विमा कंपनीने तालखेड मंडळात विमा भरून घेतलेला नव्हता. त्यामुळे कांद्याचे पंचनामे करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले. यावेळी डाळिंब बागांचीही पाहणी केली. शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून महसूल अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक पिकांचे पंचनामे करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. जिओ टॅगिंगचा वापर करा. साध्या कागदावर जरी शेतकऱ्यांनी नुकसानीचा अर्ज दिला तरी तो स्वीकारा, परंतु त्या अर्जात बॅकेचा खाते क्रमांक व आय.एफ.सी. कोड शेतकऱ्यांकडून लिहून घ्या, शेतकऱ्यांना वेठीस धरू नका असेही केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

बागपिंपळगाव,रेवकी मंडळांत केली पाहणी 
गेवराई | विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता गेवराई तालुक्यातील रेवकी महसूल मंडळातील बागपिंपळगाव तलवाडा रस्त्यावरील गट नं १५१ मधील शेतकरी विलास कोटंबे यांच्या बाजरीची पाहणी केली. त्यांनतर रेवकी येथील गट नं २० मधील शेतकरी कचरू मदने यांची बाजरी, आसाराम पारेकर यांच्या सोयाबीन, तर देवकी शिवारातील मधुकर आर्दड यांच्या बाजरी व बंडू बंडगर यांच्या कपाशीची पाहणी केली. यावेळी केंद्रेकर यांनी दीड तास पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. 
 

मराठवाड्यात खरिपाच्या पिकांचे ९० टक्के नुकसान
ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीचे अर्ज केले असतील किंवा नसतील अशाही शेतकऱ्यांचे  शंभर टक्के पंचनामे करण्याच्या सूचना मराठवाड्यात जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात खरिपाचे सध्या ९० टक्के नुकसान झाले आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीडमध्ये शनिवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना दिली. विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी शनिवारी दुपारी गेवराई व माजलगाव तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. माजलगाव येथे शेतकऱ्याचे जेवण घेऊन त्यांनी बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना केंद्रेकर म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे  खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान  झाले आहे. मी तीन चार जिल्ह्यातील पिकाची पाहणी केली आहे. एकंदर यंदा खरिपाचे ९० टक्के नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीचा अर्ज केला असेल किंवा नसेल अशाही शेतकऱ्यांचे  शंभर टक्के पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.