Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | While addressing a rally of Modi, they stop for not to do speech to MP Gandhi

मोदींच्या सभेत भाषण करताना खासदार गांधींना रोखले, त्यांचे डोळे पाणावले; विखेंकडून गांधींची मनधरणी

प्रतिनिधी | Update - Apr 13, 2019, 11:04 AM IST

रोखल्याने गांधींनी माइक बंद करत व्यक्त केली नाराजी

 • While addressing a rally of Modi, they stop for not to do speech to MP Gandhi

  नगर - युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत खासदार दिलीप गांधी यांना भाषण करताना रोखण्यात आले. व्यासपीठावर झालेला हा प्रचार मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांनी पाहिला. त्यानंतर बोलताना गांधी यांचे डोळे पाणावले होते. भाजपतील निष्ठावंतांबाबत घडलेला हा प्रकार चर्चेचा विषय ठरला.


  नगरचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी संत निरंकारी भवन मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातून कार्यकर्ते सभेसाठी आले होते. सभास्थळी जाणारे रस्ते सकाळी दहापासूनच गर्दीने फुलून गेले होते. सभास्थळापासून वाहनतळ दूर असल्याने भर उन्हात पायपीट करत नागरिक सभास्थळी पोहोचले. प्रत्येकाची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत होती.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन, खासदार गांधी व सदाशिव लोखंडे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, बबनराव पाचपुते आदी यावेळी उपस्थित होते. मोदींच्या येण्यापूर्वी अन्य वक्त्यांची भाषणे सुरू झाली. त्याचवेळी गांधींना भाषण करण्यापासून रोखण्यात आले.

  रोखल्याने गांधींनी माइक बंद करत व्यक्त केली नाराजी
  खासदार गांधी यांना उमेदवारी न मिळाल्याने यापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. तथापि, गांधी यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही. विकासकामांवर ते बोलत असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी त्यांचे भाषण रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गांधी संतापले. असे काय करता? दोन मिनिटे बोलू देणार नाही तर तुम्हीच बोला, असे म्हणत त्यांनी माइक बंद केला. नंतर पुन्हा लगेच माइक सुरू करत गांधींनी पुढे बोलण्यास सुरुवात केली. मी तुम्हाला धन्यवाद देतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या जनतेने मोठे केले, हे सांगताना त्यांचे डोळे पाणावलेे. जनतेने मोठे केले म्हणून मी तुमचे आभार मानतो. काही लोक विकास केला का, असे म्हणत टीका करतात. कोणी उत्तर द्यायचे त्याचे, माझ्याकडे सर्व बाड आहे. कोणता विकास केला, त्याचा लेखाजोखा काळे पांढरे आहे आमच्याकडे असे त्यांनी सांगितले. भरसभेत हा प्रकार घडल्यामुळे भाजपतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले.

  विखेंकडून गांधींची मनधरणी :

  सभेत बोलताना खासदार दिलीप गांधी यांना रोखण्यात आले. त्यामुळे ते संतापले. सभेनंतर डॉ. सुजय विखे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत डॉ. विखे यांनी हा प्रकार अनावधानाने झाल्याचे सांगत त्यांची मनधरणी केली. डॉ. विखे यांनी नंतर आपण गांधी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे सांगितले.

  काळे वस्त्र परिधान करून आलेल्यांना रोखण्यात आले
  पंतप्रधानांची सभा ऐकण्यासाठी आलेल्यांपैकी काळे वस्त्र परिधान करणाऱ्या नागरिकांना सुरक्षा यंत्रणांनी सभेत जाण्यापासून रोखले. काळे शर्ट, काळे सॉक्स काढल्यानंतरच प्रवेश दिल्याचे नागरिकांनी सांगितले. चोख बंदोबस्तात प्रत्येकाचीच कसून चौकशी करण्यात आली. या सभेसाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पोलिस तसेच जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात होता.

Trending