Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | While discussing the alliance, the Shiv Sena has 32 candidates

‘युती’ची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे 32 उमेदवार जाहीर

प्रतिनिधी | Update - Nov 11, 2018, 11:53 AM IST

विद्यमान नगरसेवकांसह काही नवीन चेहऱ्यांना संधी

 • While discussing the alliance, the Shiv Sena has 32 candidates

  नगर - शिवसेना- भाजपची युतीबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने ३२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात विद्यमान नगरसेवकांसह काही नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. एकापाठोपाठ उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करत शिवसेनेने निवडणूकीत प्रक्रियेत आघाडी घेतली आहे. दरम्यान, युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने उमेदवारांची नावे जाहीर केल्याने मित्र पक्ष भाजपातील इच्छुक उमेदवारांचा संभ्रम वाढला आहे. युतीचा निर्णय काय व्हायचा तो होईल, पण जाहीर केलेल्या नावात कोणताही बदल होणार नसल्याचे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी स्पष्ट केले आहे.


  शिवसेनेने पाडव्याच्या मुहूर्तावर उमेदवारांची पहिली १९ जणांची यादी जाहीर केली. त्यात सर्व विद्यमान नगरसेवकांना स्थान देण्यात आले. शनिवारी जाहीर केलेल्या १३ जणांच्या यादी मात्र नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेने ३२ उमेदवारांची नावे जाहीर करत प्रत्येकी पाच प्रभागात ४ उमेदवारांचा पॅनल निश्चित केला आहे. येत्या निवडणुकीत शिवसेना बहुमत निश्चित मिळवेल. उर्वरीत उमेदवारही लवकरच जाहीर होतील, असेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान शिवसेनेने प्रभाग क्रमांक ७, ८, १२, १३ व १५ मध्ये चारही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर प्रभाग १४ मध्ये तीन उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारांची पुढील यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून जाहीर केलेल्या नावांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले.

  यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक उपस्थित होते. दिवाळी सणानंतर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ९ डिसेंबरला होणाऱ्या महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व मनसे या चारही पक्षांनी जोर लावला आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीप्रमाणेच शिवसेना- भाजप युतीचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे या चारही पक्षाचे इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. शिवसेनेने मात्र युतीच्या निर्णयाची प्रतिक्षा न करता ३२ उमेदवारांची नावे जाहीर करत निवडणूक प्रक्रियेत आघाडी घेतली आहे.

  इच्छुक उमेदवार संभ्रमात
  युतीप्रमाणेच आघाडीचा निर्णय देखील अद्याप प्रलंबित आहे. युतीबाबत वरिष्ठ पातळीवर तर आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार आहे. आघाडीसाठी बैठक देखील झाली, परंतु त्यातून अद्याप काहीच फलीत समोर आलेले नाही. युती व आघाडीचा निर्णय होत नसल्यामुळे या चारही पक्षातील इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. दरम्यान, शिवसेनेप्रमाणेच आघाडीच्या निर्णयाची वाट न पाहता राष्ट्रवादीने १०४ इच्छुक उमेदवारांना अर्जांचे वाटप केले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी भवन येथे या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, दादा कळमकर आदी या मुलाखती घेणार असल्याची माहिती शहराध्यक्ष माणिक विधाते यांनी दिली. येत्या दोन दिवसांत या उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात येणार आहेत.

Trending