आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नांदेड । रात्री सर्व झोपेत असताना घराला आग लागल्याचे महिलेच्या लक्षात आले, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. तिने दारात झोपलेल्या अकरावर्षीय मुलगा करण पवारला घराबाहेर आणून सोडले. पती व मुलीला वाचवण्यासाठी परत घरात गेली. त्या वेळी आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत ती अडकून पडली अन् महिला, तिचा पती व आठवर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना मुक्रमाबाद येथील ऐनुल्लाशाहवल्ली येथील माळरानावर घडली.
शेजारील चुलीच्या ठिणगीने घराला आग
मुक्रमाबाद येथील ऐनुल्लाशाहवल्ली येथील माळरानावर लाकडाचे व गवताची सावली करून त्या ठिकाणी चारही बाजूंनी टिनपत्रे मारून घर करून राहत होते. या घराशेजारीच असलेल्या चुलीतील असलेली लहानशी ठिणगी वाऱ्याने घरावर पडून आगीने पेट घेतला. आग विझवण्यासाठी आसपास कोणीही नसल्यामुळे व घराला चारही बाजूंनी लाकडाचे व गवताच्या कुडाने वेढलेले असल्यामुळे काही वेळातच हे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग ज्या वेळी लागली त्या वेळी घरातील सर्व जण गाढ झोपेत होते. त्या वेळी घराला आग लागल्याचे पत्नीच्या लक्षात आले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. तिने दारात झोपलेल्या आपल्या अकरावर्षीय करण पवार या मुलाला त्याच अवस्थेत घराबाहेर आणून सोडले. आत असलेल्या पतीला व मुलीला वाचवण्यासाठी परत घरात गेली. त्या वेळी मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीत ती अडकून पडली. जळती लाकडे व टिन पत्रे अंगावर पडल्याने त्यात महिला रेखाबाई व्यंकट पवार (३५), तिचा पती व्यंकट तिम्मा पवार (३९) व मुलगी काजल व्यंकट पवार (८) या तिघांचा व एका शेळीचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. माधव चन्नप्पा वलेपवाड यांच्या माहितीवरून मुक्रमाबाद ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. तपास सहायक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, बीट जमादार किसनराव चिंतोरे करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.