आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडीवरील कोट्यवधींचा खर्च टाळला, तरी गोविंदा पथकांचा उत्साह कायम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात सांगली, कोल्हापूर, कोकणात आलेल्या पुरामुळे राजकीय नेत्यांनी यंदा दहीहंडीवर होणारा कोट्यवधींचा खर्च टाळला असला तरी गोविंदा पथकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. सकाळपासूनच मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी नेहमीप्रमाणे बाहेर पडली होती. 
थरांचा विक्रम करणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाने यंदाही आपली परंपरा कायम ठेवत नऊ थरांची सलामी देऊन विश्वविक्रमाशी बरोबरी केली. तर दादरमध्ये भारतीय जवानांना अनोख्या पद्धतीने सलामीही देण्यात आली. एकूणच राजकारण्यांनी दहीहंडी आयोजनाकडे पाठ फिरवली असली तरी गोविंदा पथकांनी मात्र दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणावर साजरा केला.  

दादर येथील जिवादेवाशी निवास मंडळाची दहीहंडी दुपारी १२ वाजता साईराम मित्रमंडळाने आठ थरांचा मानवी मनोरा रचून फोडली. साईराम गोविंदा पथकाने जवानाच्या वेशातील गोविंदा पूरग्रस्तांचे प्राण वाचवत असल्याचा देखावा सादर करत, पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांसाठी देवदूत ठरलेल्या भारतीय जवानांना अनोखी सलामी दिली. भारतीय जवान आणि एनडीआरएफप्रती या गोविंदा पथकाने व्यक्त केलेल्या भावनेला मोठ्या प्रमाणात टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली. ठाण्यात जय जवान गोविंदा पथकाने संस्कृती युवा प्रतिष्ठान येथे ९ थरांची सलामी दिली. तसेच विघ्नहर्ता गोविंदा पथकाने चेंबूर येथे ८ थरांचा मानवी मनोरा रचून मिळालेल्या ५० हजारांच्या पारितोषिकातील ४० हजार रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाहीर केले.

दादर येथील आयडियलच्या गल्लीत साजरा होणाऱ्या दहीहंडीत यंदा शिवराज्याभिषेकाचा देखावा सादर करण्यात आला होता. घाटकोपरमध्ये क्रांती क्रीडा मंडळाने सर्वात वरच्या थरावर गणपती बसवून आगामी गणेशोत्सवाची झलक दाखवली. 

दादर प्लाझा कॉर्नरजवळ अंध आणि दिव्यांग गोविंदांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. अंध आणि दिव्यांगांनी यासाठी तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. अंध दिव्यांगांचे हे एकमेव गोविंदा पथक आहे. ठाण्यातील नौपाडा येथे मनसेने दहीहंडी आयोजित केली होती. दहा थरांच्या या दहीहंडीसाठी जय जवान मंडळाने खूप प्रयत्न केले, परंतु ते दहा थर लावू शकले नाहीत. मात्र, नऊ थर लावून त्यांनी विश्वविक्रमाची बरोबरी केली. ठाणे येथीलच संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीतही जय जवान मंडळाने नऊ थर लावले. मनसेचा ईव्हीएमला विरोध असल्याने भांडूप येथे “मतदानात ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवा’ असा मजकूर छापलेले पाच हजार टी शर्ट गोविंदा पथकांना वाटून ईव्हीएमविरोधात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
 
 

५१ गोविंदा जखमी, २४ वर उपचार सुरू
मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या दहीहंडी उत्सवामुळे दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. यंदाही ५१ गोविंदा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील किरकोळ जखमी झालेल्या २७ गोविंदांना प्रथमोपचारानंतर घरी पाठवण्यात आले असून २४ गोविंदांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 

राम कदम यांची दहीहंडी प्रथमच रद्द, गोविंदा पथकाला मोठी रक्कम मिळाली नाही
घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांनी प्रथमच दहीहंडी रद्द केली. परंतु मनसेने त्यांच्या या निर्णयाची खिल्ली उडवत “लबाड लांडगं ढोंग करतंय, पूरग्रस्तांच्या नावाने सोंग करतंय’ असा मजकूर असलेले फलक लावले. बोरिवलीतील शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना नेते सचिन अहिर, ठाण्यातील शिवसेनेचे राजन विचारे यांनी यंदा कोल्हापूर, सांगली, कोकणामध्ये आलेल्या पुरामुळे दहीहंडी कार्यक्रम रद्द केले. तसेच गिरगाव, लालबाग, परळ, काळाचौकी, दादर, माहीम, वरळी, घाटकोपर, बोरिवलीसह अनेक ठिकाणी मोठ्या रकमेच्या हंड्या लावण्यात येतात, मात्र या दहीहंडीही यंदा रद्द करण्यात आल्याने मुंबईसह परिसरातील विविध गोविंदा पथकांना यंदा बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली नाही.