Crime / स्कूल बसची वाट बघताना भावंडांना कारने उडवले; भावाचा अंत, बहीण गंभीर 

स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन साजरे करण्याअाधी झाल्टा फाट्यावर घडला अपघात 

दिव्य मराठी

Aug 17,2019 10:23:00 AM IST

औरंगाबाद : स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत जाण्यासाठी सकाळी ६.३० वाजता झाल्टा फाट्यावरील गणपती मंदिरासमाेर रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत असलेल्या भाऊ अाणि बहिणीला १५ वर्षीय कारचालकाने चिरडले. यात संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (७) याचा मृत्यू झाला तर त्याची बहीण श्रावणी ज्ञानेश्वर शिंदे (९) गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरू आहेत. नेताजी सुभाषचंद्र बाेस यांची वेशभूषा करून संभाजी शाळेत जाणार हाेता. तेथून अाल्यावर बहिणीसाेबत रक्षाबंधन साजरे करायचे हाेते. पण नियतीला मात्र ते मान्य नव्हते.

झाल्टा फाटा शिवारात शिंदे कुटुंब शेती करते. संभाजी व श्रावणी शाळेत जाण्यासाठी अाईसाेबत स्कूल बसची प्रतीक्षा करत हाेते. आई कामानिमित्त घराकडे निघाली असता तेवढ्यात भरधाव वेगामध्ये लाल रंगाची स्विफ्ट कार (एमएच ०३ एडब्ल्यू ६७२४) भरधाव अाली व दाेघांना उडवले. तत्काळ दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत संभाजीचा मृत्यू झाला होता तर श्रावणी गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरू अाहेत. या प्रकरणी अल्पवयीन कारचालकासह त्याच्या वडिलांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे करत अाहेत.

शाळेत निघण्याअाधी केले सॅल्यूट अन्...
पहिलीत शिकणारा संभाजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची वेशभूषा करून जात होता. रात्री त्याची सर्व तयारी करुन त्याने तसा ड्रेस सुद्धा अाणला. सकाळी तशी वेशभूषा करुन त्याने माेबाइलमध्ये एक छायाचित्र देखील काढले.

X