आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही पाहत असताना स्नॅक्स खाणाऱ्या किशोरवयीन मुलांना हृदयराेग, मधुमेह या आजारांचा वाढता धाेका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 वाॅशिंग्टन - लहान मुले विविध प्रकारचे स्नॅक्स खात टीव्ही पाहत किंवा संगणकावर गेम खेळत असतात व त्यांच्या पालकांना यात काहीही वावगे वाटत नसते. परिणामी याकडे ते सर्रास दुर्लक्ष करतात. परंतु दुर्लक्ष करण्याची हीच वृत्ती आता पालकांना विशेषत: किशाेरवयीन मुलांना नुकसानकारक ठरू शकते. टीव्ही पाहताना किंवा संगणकावर गेम खेळताना स्नॅक्स खाल्ल्याने किशाेरवयीन मुलांमध्ये हृदयराेग व मधुमेहाचा धाेका वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव एका संशाेधनातून समाेर आले आहे.  


याबाबत ब्राझीलमधील फेडरल डू रिओ ग्रँड डू सूल विद्यापीठाने संशाेधन केले. त्यात प्रकृतीसाठी अयाेग्य असलेल्या बहुतांश प्रकारच्या स्नॅक्सवर्गीय खाद्यपदार्थांमुळे मुलांना हृदयाशी संबंधित आजारांसह मधुमेहाचा सामना करावा लागू शकताे, असे आढळले. अशाने किशोरवयीन मुलांत मेटाबॉलिक (चयापचय) सिंड्रोम विकसित हाेऊन रक्तदाब, कंबरेजवळ चरबी जमा हाेणे, कोलेस्टेरॉल आदी वाढल्याने हृदयरोगासह मधुमेहाचा धोका वाढतो. यावर नियंत्रण ठेवल्यास चयापचय सिंड्रोमचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते, असे संबंधित विद्यापीठातील संशाेधक बिट्रिझ शॅन यांनी सांगितले.   


किशाेरवयीन मुलांमधील हृदयविकाराची कारणे शाेधण्यासाठी ब्राझीलमध्ये १२ ते १७ वर्षे वयाेगटातील ३३, ९०० शालेय मुलांवर हे संशाेधन करण्यात आले. त्यात ६० % मुलींचा समावेश हाेता. संशोधकांनी मुलांच्या कंबरेजवळचा भाग तपासून रक्तदाब मोजला. रक्तातील ग्लुकोज, एचडीएल-कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसरायड्स मोजण्यासाठी रक्ताचे नमुनेही घेतले. त्यात ८५ % मुलांनी टीव्ही पाहताना, तर ६४ % मुलांनी संगणकावर काम करताना किंवा व्हिडिओ गेम खेळताना स्नॅक्स खाल्ल्याचे सांगितले. संशाेधकांना अशा मुलांत २.५ % मेटाबाॅलिक सिंड्रोम असल्याचे आढळले.   

 

किशोरवयीन मुलांनी स्नॅक्स खाणे टाळणेच फायदेशीर  
टीव्ही किंवा संगणकासमाेर सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ घालवणाऱ्यांना हृदयराेग, मधुमेहाचा जास्त धाेका आणि स्नॅक्स आदी खाणारी किशोरवयीन मुले गरजेपेक्षा जास्त वेळ घालवत असल्याचेही दिसून आले. मुलांनी किती वेळ टीव्ही पाहावा किंवा संगणकावर घालवावा हे ठरवणे तसे कठीण आहे; परंतु  स्नॅक्सचा वापर टाळणे शक्य होऊ शकते. मुलांना कमी वेळ टीव्ही पाहण्याचा सल्ला देण्याऐवजी त्यांचे स्नॅक्स खाण्याचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न झाले पाहिजेत. तेव्हाच हा धाेका काहीसा कमी करता येईल, असेही शॅन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...