आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या शेतकरी मोर्चासाठी देशातून एकवटले व्हाइट काॅलर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  ‘इंडिया विरुद्ध भारत’ म्हणजेच ग्रामीण विरुद्ध शहरी असा विकासासंदर्भात देशात पारंपरिक संघर्ष असल्याचे आजपर्यंत अर्थशास्त्रज्ञ व शेतकरी नेते मांडणी करत. पण, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी दिल्लीत निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या ‘किसान मुक्ती मार्च’ला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील मध्यमवर्गीय मंडळी (व्हाइट काॅलर) प्रथमच एकवटली असून त्यांनी स्थापन केलेली व शेती प्रश्नाचे अभ्यासक पी. साईनाथ नेतृत्व करत असलेली ‘नेशन फाॅर फार्मर्स’ (एनएफएफ) चळवळ सध्या जाेरात सुरू आहे.  

 
मोर्चा, राजकीय पक्ष काढतात व त्यात कार्यकर्तेच सहभागी असतात, असा आजपर्यंतचा समज आहे. देशातील २०० शेतकरी संघटनांचा २९ व ३० नोव्हेंबर रोजी संसेदवर जो शेतकरी मोर्चा धडकणार आहे. त्यासाठी मात्र पहिल्यांदाच देशभरातील पांढरपेशे-मध्यमवर्गीय अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत.  शेतकऱ्यांच्या २०० संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने त्यासाठी दिल्ली चलो अशी हाक दिली आहे. एक लाख शेतकरी देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत धडकणार आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश, त्यांचे म्हणणे पांढरपेशा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘नेशन फाॅर फार्मर्स’ हा मंच स्थापन झाला असून शेती प्रश्नाचे अभ्यासक व पत्रकार पी. साईनाथ त्याचे नेतृत्व करत आहेत.

 

  या मंचमध्ये देशाच्या मेट्रो शहरातील डाॅक्टर, वकील, इंजिनिअर्स, रिक्षावाले, बँकर्स, विद्यार्थी संघटना, फोटो जर्नालिस्ट, पत्रकार, औद्योगिक कामगार असे जोडले जात आहेत. पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो फोटोग्राफर्स देशाच्या कानाकोपऱ्यातून छायाचित्रे काढत मोर्चाबरोबर दिल्लीत येत आहेत. ‘दिल्ली चलो’च्या वेब पोर्टलवर १० हजारपेक्षा अधिक नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदवला असल्याचे ‘एनएफए’चे सिद्धार्थ अडेलकर यांनी सांगितले.  मार्च २०१८ मध्ये नाशिक ते मुंबई असा किसान सभेचा पायी शेतकरी मोर्चा आला होता. त्याला मुंबई, ठाण्यामधील मंडळींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. त्यातून ‘दिल्ली मार्च’मध्ये शहरी नागरिकांना सामील करून घेण्याची कल्पना सुचल्याचे किसान सभेचे काॅ. अशोक ढवळ म्हणाले.    आपल्यासाठी अन्न पिकवणारा संकटात असताना त्याच्या बाजूने उभे राहणे, शहरी मध्यवमर्गीयांना आपले नैतिक कर्तव्य वाटते. म्हणूनच ‘एनएफएफ’ला मेट्रो शहरांतून पाठिंबा मिळतो आहे. ही मोठ्या राजकीय उलथापालथीची नांदी असल्याचा दावा नेशन फाॅर फार्मर्स मंचचे नेतृत्वकर्ते पी. साईनाथ दावा करत आहेत.    

 

‘आप’च्या पायघड्या   
२९ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या चारी मार्गांनी २० कि.मी. पायी चालत लाखो शेतकरी रामलीला मैदानावर पोहोचणार आहेत. ३० नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता ते संसद स्ट्रीट किंवा बोट क्लबला पोहोचतील. तेथे जाहीर सभा होईल. ‘दिल्ली मार्च’ची दिल्लीतील सर्व व्यवस्था आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करणार आहेत.   

 

कृषी प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवा  
मार्चची पहिली मागणी म्हणजे २१ दिवसांचे कृषी प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा. दुसरी म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतमालाला खर्चाच्या दीडपट भाव याची तरतूद असलेली दोन्ही अशासकीय विधेयके मंजूर करावीत. आता सरकार या मागण्या मान्य करते का ते पहावे लागेल.

 

बातम्या आणखी आहेत...