आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? : अशोक चव्हाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात महाराष्ट्रातील सनातन संस्थेचे नाव आरोपी म्हणून घेतले. यातूनच सनातन ही अत्यंत घातक संस्था असून हिंसक कारवायांमध्ये गुंतलेली आहे, या वस्तुस्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वीही या संदर्भातील अनेक पुरावे समोर आले असताना सनातन संस्थेवर फडणवीस सरकारकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे सनातन संस्थेला वाचवणारे फडणवीस सरकारमधील खरे साधक कोण आहेत, असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. रविवारी यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी करत चव्हाणांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.


चव्हाणांनी यात म्हटले की, गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटकेतील आरोपी सनातन संस्थेशी संबंधित आहेत. या संस्थेने इतर कट्टरवादी संघटनांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली, असा स्पष्ट उल्लेख कर्नाटक पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. तसेच नरेंद्र दाभोलकर, एम. एन. कलबुर्गी, गोविंद पानसरंंच्या हत्याकांडाशीही सनातन संस्थेचा संबंध आहे, हेसुद्धा यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर तत्काळ बंदी घालण्यात यावी.

 

याअगोदरही मुंबईजवळ नालासोपारा येथे सनातनच्या साधकाकडे जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सनातनच्या काही साधकांना अटकही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने आरोपींचा मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा कट होता. हे स्पष्ट झाले असतानाही सरकारने सनातनवर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.


फडणवीस सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप
२००८ मध्ये गोव्यात झालेल्या बॉम्बस्फोटात सनातनच्या साधकांचा हात होता. काही वाहिन्यांनी स्टिंग ऑपरेशन करून समोर आणले. तरीही या प्रकरणी सनातन संस्थेची साधी चौकशी करण्याची तसदीही फडणवीस सरकारने घेतली नाही. कर्नाटक सरकारने या प्रकरणात चौकशी केली नसती तर सत्य समोर आले नसते. या प्रकरणातील भाजपच्या फडणवीस सरकारची भूमिका पूर्णपणे संशयास्पद आहे, असा थेट आरोप चव्हाण यांनी पत्रकात केला आहे

बातम्या आणखी आहेत...