आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Who Often Betrayed Party Changers? Divya Marathi Special Interview Of Rana Jagjit Singh's

दिव्य मराठी विशेष मुलाखत : अनेकदा पक्ष बदलणाऱ्यांनी कुणाचा विश्वासघात केला? राणा जगजितसिंह यांचा शरद पवार यांना टोला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दत्ता सांगळे
उस्मानाबाद
: शरद पवारांचे निकटवर्तीय राहिलेले माजी मंत्री डाॅ. पद‌्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांनी भाजप प्रवेश करून पवारांचा विश्वासघात केला, असा आराेप राष्ट्रवादीतून होत आहे. त्याला चाेख प्रत्युत्तर देताना राणांनी थेट पवारांवरच निशाणा साधला. 'आजवर राज्यात महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या नेत्याने अनेक पक्ष बदलले. तेव्हा त्यांनी कुणाचा विश्वासघात केला?' असा सवाल त्यांनी अप्रत्यक्षपणे पवारांना उद्देशून केला. 'यापूर्वी जेव्हा जेव्हा पक्ष बदलले ते कुणाच्या प्रेमासाठी किंवा हट्टासाठी होते तेही सांगावे आणि याचे उत्तर सुप्रियाताईच देऊ शकतील,' असेही राणांनी 'दिव्य मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. राष्ट्रवादी पक्ष का साेडला, या प्रश्नाचे थेट उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले.

प्रश्न : पवारांनी तुमच्या कुटुंबाला आजवर सत्तेत अनेक पदे दिली, तरीही तुम्ही साथ का सोडली?
राणा : माझे वडील प्रारंभीपासूनच पवार साहेबांसोबत होते. प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली. पवार किंवा त्यांच्या पक्षाने जे दिले त्याचा परतावा जशास तसा केला. पक्ष अडचणीत होता तेव्हा माझे वडीलच धावून गेले. येथे विश्वासघाताचा प्रश्न येताेच कोठे? मी दोन महिन्यांपासून बोलणी करत होतो. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांशी चर्चा करावी, विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांशी पक्षाने चर्चा करावी, अशी सूचना मी केली होती. परंतु तसे झाले नाही. पक्ष सोडणे विश्वासघात असेल तर काही नेत्यांनी (एका नेत्याचे नाव जगजाहीर आहे.) अनेक पक्ष बदलले. तेव्हा त्यांचा विश्वास अन‌् विश्वासघाताचे काय? त्यांनी कोणत्या पुत्रप्रेमासाठी पक्ष बदलला होता हे जाहीर करावे. सुप्रियाताई यावर अधिक भाष्य करू शकतील.

प्रश्न : ...तरी प्रश्न पडतो तुम्ही राष्ट्रवादी का सोडली?
राणा : माझ्या वडिलांनी नव्हे, मी भाजपमध्ये प्रवेश केला. पप्पांनी सुरू केलेले पाच प्रकल्प मला मार्गी लावायचे आहेत. त्यातील कृष्णा-मराठवाडा जल प्रकल्पासाठी फडणवीस यांनी ३ हजार ८०० कोटी दिले. उस्मानाबादेत मेडिकल कॉलेज, काैडगाव एमआयडीसी यासाठी मी सत्तेत असताना प्रयत्न केले होते. ते मार्गी लागलेत. या कामांसाठीच मी इकडे वळलो. 

राणा जगजितसिंह यांचे प्रत्त्युत्तर :  जे घडलेच नाही त्याबद्दल सुप्रियाताई बोलल्याने मनाला वेदना झाल्या
मला आशीर्वाद देऊन वडील तुळजापूरहून निघाले अन‌् त्या म्हणतात, अर्ध्या रस्त्यावर सोडले. 
'मी राष्ट्रवादी सोडली असली तरी सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्याशी माझे संबंध चांगलेच आहेत. त्यांच्याशी माझा काहीही वाद नाही आणि पक्ष सोडल्यानंतर मी काहीही बोललो नाही. परंतु अचानकपणे सुप्रियाताईंनी 'बापाला अर्ध्या रस्त्यावर सोडून भाजपमध्ये गेला' असे भाष्य केल्याचे वाचून माझ्या मनाला वेदना झाल्या,' अशा शब्दांत भाजपवासी झालेले माजी आमदार राणा जगजितसिंह यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना सुप्रिया यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. 'मी बापाला कसा बरे रस्त्यावर सोडेन?' असा सवाल करतानाच 'सुप्रिया यांच्या जवळच्या लाेकांनी त्यांना चुकीची माहिती दिली असेल किंवा त्यांचे विधान हे राजकीय भावनेने प्रेरित असावे,' असेही राणा म्हणाले. '८० वर्षांचे झालेले माझे वडील डॉ. पद‌्मसिंह पाटील आता कोणत्या पक्षात जाणार?' असा प्रश्नही त्यांनी केला.

पप्पांना अटक झाली तेव्हा राष्ट्रवादीचेच गृहमंत्री हाेते ना, तेव्हा काय झाले?

प्रश्न : भाजपने पद‌्मसिंह पाटील यांना पक्षात घेण्यास ऐनवेळी नकार दिल्याने आपण एकटेच भाजपमध्ये गेल्याचे सुप्रिया म्हणाल्या? नेमके काय झाले होते?
राणा : हे पूर्णपणे खोटे आहे. मी वडिलांना सोडून कसा कोठे जाईल? वयाच्या ८० व्या वर्षी पप्पांना आता कोठे राजकारण करायचे आहे? कशाला ते गळ्यात दुसऱ्या पक्षाचा रूमाल घेतील. सुप्रिया असे का बोलल्या हेच मला समजत नाही. मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. ३१ ऑगस्टला आमचा परिवार संवाद झाला. त्यात मी भाजपमध्ये जाण्याचे ठरले. पप्पांनी कार्यकर्त्यांशी बोलताना, 'मला आतापर्यंत साथ दिली, आता राणाला द्या,' असे सांगितले. मी सोलापूरला भाजपमध्ये प्रवेश करणार होतो. आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यायचे अन‌् मी पुढे जायचे असे ठरले होते. त्यानुसार मी औशाहून तुळजापुरात आलो आणि पप्पा उस्मानाबादहून. तेथे देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मी पप्पांचे दर्शन घेतले अन् भाजप प्रवेशासाठी पुढे गेलो. ते तुळजापुरातूनच परतणार असे ठरले होते. यात पप्पांना अर्ध्या रस्त्यात सोडण्याचा प्रश्न येतोच कोठे? ते आता सक्रिय राजकारणात नाहीत. त्यांना यापुढे राजकारण करायचेही नाही. तेव्हा ते भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. जर काही गडबड, किंतु-परंतु असते तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश कसा केला असता. कोठे तरी गुपचूप हा कार्यक्रम उरकला नसता का?'

प्रश्न : मग सुप्रिया यांनी हे भाष्य का करावे?
राणा : याचे उत्तर त्यांनीच द्यावे. त्यांच्याभोवती जी माणसे आहेत, त्यांनी सुप्रियाताईंना चुकीची माहिती दिली असावी किंवा राजकीय हेतूने प्रेरित होऊन मुद्दाम त्यांनी हे विधान केले असावे.

प्रश्न : चौकशांच्या फेऱ्यातून सुटका हाेण्यासाठीच तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते...
राणा : मी अशी काेणती गडबड केली की ज्यातून मला मुख्यमंत्री वाचवू शकतील? बँक, कारखाना यात माझा काहीही संबंध नाही. राहिला विषय पप्पांना वाचवण्याचा. तर २००९ मध्ये जेव्हा पप्पांना अटक झाली तेव्हा तर राज्य व केंद्रात काँग्रेस आघाडीचीच सत्ता होती. राज्याचे गृहमंत्री तर राष्ट्रवादीचेच होते. तेव्हा काय झाले? त्यामुळे हा मुद्दा असण्याचा प्रश्नच नाही.

प्रश्न : पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला काही ऑफर दिलीय का?
राणा : असे काहीच नाही. मुख्यमंत्री माझे मित्र आहेत. अामच्यासाेबत या, असे ते पूर्वीपासूनच मला म्हणत हाेते. मात्र त्यासाठी काही डील झालेली नाही. हां.... माझ्या माघारी काही डील झाली असेल तर त्याबाबत सुप्रियाताईच सांगू शकतील.

प्रश्न : 'तुमच्या जागी मी असते तर राजकारण सोडले असते...' असे सुप्रिया म्हणाल्या...
राणा : जे घडलेच नाही त्यावर मी राजकारण सोडण्याचा प्रश्न येतोच कोठे? सुप्रिया यांनी केलेले विधानच मुळाच चुकीचे आहे.

प्रश्न : तुमचे वडील पद्मसिंह पाटील अनेक वर्षे सत्तेत होते, तुम्हीही पाच वर्षे मंत्री होतात तेव्हा हे प्रश्न मार्गी का लागले नाहीत?
राणा : पप्पांनी आणि मीही यासाठी प्रयत्न केले, परंतु ते झाले नाहीत. आता ते होताहेत. त्यासाठी प्रयत्न करणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे.

प्रश्न : तरीही पक्ष का साेडला याचे खरे कारण सांगाच...
राणा : उस्मानाबादसाठी निधी मिळवणे हे पहिले कारण. दुसरे जनतेचा कौल. सर्वच जण मला म्हणत होते की, तुम्ही राष्ट्रवादीत थांबू नका. तिसरे कारण म्हणजे माझी सुप्रियाताईंसमवेत बैठक झाली. तेथे आम्ही तिघेच होतो. (तिसरा कोण हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.) त्यावर पुढे काहीच समोर आले नाही. त्यात काय झाले ते मी सांगणार नाही. ते मला कधीच सांगायचे नाही. आमच्या मित्रांना विनंती आहे, मला तोंड उघडे पाडण्यास भाग पाडू नका.

प्रश्न : उस्मानाबाद जिल्ह्यात तुम्हाला शिवसेना मदत करेल?
राणा : नक्कीच. युतीत ते नक्कीच मदत करतील. एक घटक मदत करणार नाही असे म्हटले जातेय, पण मी त्यांच्याशी स्वत: बोलेल.

प्रश्न : उस्मानाबाद की तुळजापुरातून विधानसभा निवडणू लढवणार?
राणा : पक्ष ठरवेल. मी अजून काहीच ठरवलेले नाही. मला खासदार, आमदार व्हायची इच्छा नाही. मी राजकारणात आलो खरा, पण त्यात मला रुची नाही. येथील प्रश्न सोडण्यासाठी मी प्रयत्न करत राहील आणि फडणवीस ते करू शकतात. काही हजार कोटींचा निधी मिळतोय तो मी मिळवेल. त्यातच मला आनंद आहे.

प्रश्न : ओमराजेंशी कसे डील करणार?
राणा: निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची जेव्हा प्रक्रिया होईल तेव्हा बोलणी होईलच ना. तेव्हा भेट घेईल.

प्रश्न : ओमराजेंना व्यक्तिश: भेटणार का?
राणा : युतीची प्रक्रिया झाल्यानंतर यावर बोलूच. ते व शिवसेना मला मदत करतील ही आशा आहे.

पद‌्मसिंह पाटील म्हणतात...
सुप्रियांनी कार्यकर्त्यांची काळजी घेतली असती तर पक्षावर ही वेळ आली नसती
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर डाॅ. पद‌्मसिंह पाटील यांनीही मत मांडले आहे. ते म्हणतात 'सुप्रिया मला मुलीसारख्या आहेत. त्यांनी माझी काळजी व्यक्त करताना वस्तुस्थितीला धरून मत व्यक्त केले असते तर आनंद वाटला असता. राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी मिळून जिल्ह्याचे प्रश्न साेडवण्याच्या दृष्टीने पक्षबदलाचा आग्रह धरला हाेता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून राणांच्या पक्षांतराचा निर्णय घेतला. या निर्णयासाठी मी स्वत: तुळजापूरपर्यंत त्यांच्यासाेबत जाऊन त्यांना आशिर्वाद दिले हाेते. तत्पूर्वी ३१ अाॅगस्ट मेळाव्यात मी स्वत: राणांना राजकीय वाटचालीस आशीर्वाद दिले हाेते व 'राणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा' असे आवाहन समर्थकांना केले हाेते. २०१४ पासून प्रकृतीच्या कारणामुळे मी राजकारणात सक्रीय नाही. त्यामुळे माझा पक्षप्रवेशाचा प्रश्नच नव्हता. सुप्रियांना देखील हे माहित आहे, असे असताना त्यांनी माझा पक्षप्रवेश राेखण्याबाबतचे विधान करणं खेदकारक आहे. सुप्रियांनी माझ्यापेक्षा पक्षातील नेत्यांची काळजी घेतली असती, पक्षांतर्गत कुरघाेड्यांना वेळीच पायबंद घातला असता तर पक्षावर कदाचित आज ही वेळ आली नसती.

बातम्या आणखी आहेत...