आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक सत्तेसाठी काय काय करतात! शिवसेनेने एका रात्रीत भूमिका कशी बदलली -अमित शहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दुपारी 12 वाजता नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकात मुस्लिमविरोधी असे काहीच नाही. मुस्लिम या देशाचे नागरिक होते आणि पुढेही राहतील असे अमित शहा म्हणाले. परंतु, त्यांनी विधेयकाची प्रस्तावना वाचली तेव्हाच विरोधकांनी गदारोळ निर्माण केला. काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूलसह सर्वच विरोधी पक्षांनी एकमुखाने या विधेयकाला विरोध केला. राज्यसभेत नागरिकत्व विधेयकावर रंगलेल्या चर्चेमध्ये एकानंतर एक सर्वांनीच लक्षवेधी भाषणे दिली. दरम्यान, शिवसेनेच्या आक्षेपावर बोलताना लोक सत्तेसाठी काय काय करतात असा टोला गृहमंत्र्यांनी लावला. एका रात्रीत शिवसेनेने या विधेयकावर भूमिका कशी काय बदलली हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगा असेही ते पुढे म्हणाले आहेत.

इतरांना नागरिकत्व देण्यापेक्षा भारतीयांना मूलभूत सुविधा द्या -तृणमूल

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन म्हणाले, "तुम्ही देशातील लोकांना जेवण, कपडे आणि घरासारख्या मूलभूत सुविधा देऊ शकत नाही. त्यातच दुसऱ्या देशातील लोकांना नागरिकत्व आणि अधिकार देण्याच्या गोष्टी करत आहात. नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात व्यापक आंदोलन उठले आहे. तुम्ही जाहीरनाम्यात सुद्धा म्हणाला होता की कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. नोटबंदी, बेरोजगारी, गोरखा इत्यादी मुद्द्यांवर पंतप्रधानांचे दावे फौल ठरले. सरकार आश्वासने देण्यात चांगले पण ते पूर्ण करण्यात तेवढेच वाइट आहे. एनआरसीमध्ये बंगाली हिंदूंना नागरिकत्व देण्याचे खोटे आश्वासन देण्यात आले आहे. तुम्ही म्हणता, की नागरिकत्व विधेयक सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाईल. ही सुवर्ण अक्षरे राष्ट्रपिता महात्मा गांधी नाही तर मोहंमद जिन्ना यांच्या कब्रीवर लिहिली जातील."

तुम्ही ज्या शाळेत शिकता आम्ही तेथील हेडमास्तर -संजय राउत

संजय राउत यांनी सांगितले, "जो या विधेयकाला समर्थन देणार नाही त्याला देशद्रोही आणि समर्थन करणाऱ्याला देशभक्त म्हटले जात आहे. असेही म्हटले जात आहे की विरोध करणारे पाकिस्तानची भाषा करत आहेत. हे पाकिस्तानचे सभागृह आहे का? पाकिस्तानची भाषा आवडत नसेल. त्या ठिकाणी अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचे वाटत असेल तर त्या पाकिस्तानला संपवा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत." राउत पुढे म्हणाले, "या देशाला मजबूत पंतप्रधान आणि गृहमंत्री लाभले आहेत. परंतु, ज्या शाळेत तुम्ही शिकत आहात, तेथील हेडमास्तर आम्ही आहोत. बाळासाहेब ठाकरे आमचे हेडमास्तर होते. या विधेयकावर चर्चा करताना मानवतेच्या आधारावर चर्चा करावी. आम्हाला घुसखोर आणि शरणार्थींमधला फरक कळतो. शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देत असाल तर आधी घुसखोरांना हकला. मलाही माहिती आहे की शेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार होतात. पण, त्यावर राजकारण करू नका."

'दोन देशांचा सिद्धांत हिंदू महासभेत मांडण्यात आला होता. तुम्ही इंग्रजांवर का बोलत नाही?' -आनंद शर्मा


काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आनंद शर्मा यांनी या विधेयकाची संपूर्ण पार्श्वभूमी आणि इतिहास मांडला. ते म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर नागरिकत्व विधेयकावर संविधान सभेत चर्चा झाली होती. महात्मा गांधींच्या नेतृत्वात ज्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांनी नागरिकत्वाचे महत्व समजून घेतले. राज्यघटना बनवणाऱ्यांनी हे पूर्वीच्या पिढ्यांपासून निश्चित केले होते. आणि आपण 70 वर्षांनंतर त्यावर प्रश्न करतो की त्यांना काही अक्कल नव्हती. लाखो लोक फाळणीनंतर भारतात आले होते. त्यातील दोन जण मनमोहन सिंग आणि आय.के. गुजराल देशाचे पंतप्रधान बनले."


"नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 1955 मध्ये आले होते. यामध्ये 9 वेळा बदल करण्यात आले. परंतु, कधीही मतभेद झाले नाहीत. तुम्ही (अमित शहा) लोकसभेत स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्यांना फाळणीसाठी जबाबदार धरले होते. त्यांचा संघर्ष आणि विचारसरणी नाकारली जाऊ शकत नाही. इतिहास बदलता येणार नाही. विनायक दामोदर सावरकर हिंदू महासभेचे नेते होते. दोन देशांचा सिद्धांत हिंदू महासभेत मांडण्यात आला होता. तुम्ही इंग्रजांची चर्चा का करत नाही. जिन्नांना त्यांचे समर्थन होते. तुम्ही कुणाला नवीन इतिहास लिहिण्याची जबाबदारी दिली असेल तर मी अपील करतो की असे करू नका. नागरिकत्व कायद्यात संशोधन झाले. त्यामध्ये गोवा, दमन-दीवच्या लोकांना नागरिकत्व देण्यात आले. युगांडाच्या लोकांना सुद्धा नागरिकत्व मिळाले. पण, भारत सरकारने कधीही धर्माला आधार केले नाही. त्यामुळेच, हे विधेयक कलम 14 चे उल्लंघन आहे. भारताने हिंसाचारात पीडित ठरलेल्या सर्वांना शरण दिली. मग, ते ख्रिस्ती असो की ज्यू असो." स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्म संसदेत सुद्धा एकात्मतेचा संदेश दिला होता अशी आठवण आनंद शर्मा यांनी करून दिली.

बातम्या आणखी आहेत...