आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चंद्रसेन देशमुख
उस्मानाबाद - गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप स्वबळावर लढल्याने चारही पक्षांची ताकद दिसून आली होती. या वेळी मात्र महाआघाडी विरुद्ध महायुती, असे चित्र असू शकते. दरम्यान, जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात कोण, राणा पाटील उस्मानाबादमधून लढणार की तुळजापूरमधून, भूम-परंड्यातून सेनेचे उपनेते डॉ.तानाजी सावंतांनी केलेली तयारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या पथ्यावर पडणार का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जिल्ह्यात उस्मानाबाद-कळंब, तुळजापूर, उमरगा-लोहारा व भूम-परंडा-वाशी, असे चार विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी गेल्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद-कळंबमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे यांचा पराभव केला होता. मात्र, पुढे लोकसभा निवडणुकीत या दोघांमध्ये लढत होऊन ओमराजे निवडून आले. आता या मतदारसंघातील चित्र बदलले असून, राणा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार का याविषयीची उत्सुकता आहे. भूम-परंडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, अशी लढत झाली होती.
तिथे राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांनी हॅटट्रिक करत तिसऱ्यांदा बाजी मारली. त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा पराभव केला होता. आता या मतदारसंघासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे उपनेते प्रा.तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा आहे.
उमरग्यात चौगुलेंना संधी मिळणार का?
उमरगा-लोहारा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले धर्मसंकटात सापडले आहेत. माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांचे विश्वासू असलेले आमदार चौगुले यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार न केल्याने आता त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यावर पक्षांतर्गत विरोध आहे. ते दोन वेळा सेनेकडून निवडून आले आहेत. या मतदारसंघासाठी शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने काँग्रेसकडून २००९ मध्ये निवडणूक लढवलेले डॉ.बी.पी.गायकवाड यांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे आमदार चौगुलेंचे काय होणार, हा प्रश्न आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.