column / ..अशा स्थितीत कोणाला डॉक्टर व्हावे वाटेल?

 आरोग्य प्रणालीत उत्तमोत्तम तज्ज्ञांना आकर्षित करायचे असेल तर त्यांना सुरक्षा द्यावीच लागेल
 

चेतन भगत

Jun 20,2019 10:08:00 AM IST

मी शाळेत होतो तेव्हा माझे अनेक मित्र प्रवेश परीक्षेची तयारी करत होते. तेव्हा आणि आताही बहुधा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर आणि इंजिनिअरिंग हेच सर्वात लोकप्रिय पर्याय होते. मी इंजिनिअरिंग निवडले. आज देशातील डॉक्टरांची स्थिती पाहतो तेव्हा मी हा पर्याय निवडला नाही, हे माझे नशीब समजतो. आपण डॉक्टरांकडून एवढ्या अपेक्षा कशा करू शकतो? डॉक्टर हे तल्लख बुद्धीचेच असावेत, अनेक दशके त्यांनी अभ्यासात घालवलीच पाहिजेत, दुर्गम ग्रामीण भागासह कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची त्यांची तयारी असावी. पैसा कमावताना त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना असली पाहिजे. कोणत्याही चुकीची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, लालची राक्षसांसारखी प्रतिमा झाल्यास त्याचीही डॉक्टरांनी तयारी ठेवली पाहिजे. वेळ पडली तर संतापलेल्या गर्दीने त्यांना मारहाण केली तरी चालेल! आपले प्राण वाचवणाऱ्यांना अशी वागणूक देणे योग्य आहे का?

मजेची बाब म्हणजे, हे सर्व घडत असताना भारतीय राष्ट्रवादाची भावना परमोच्च बिंदूवर आहे. चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये सैनिकांचा जयजयकार होत आहे. कारण ते आपल्या प्राणांचे रक्षण करतात. आपले प्राण वाचवतात. सैनिकांना हा सन्मान मिळावा, यात शंका नाही, कारण ते आपले प्राण वाचवतात. पण ते केवळ लढाई किंवा सैनिकी कारवायांमध्ये ही कृती करतात. डॉक्टर तर आपले आणि आपल्या नातेवाइकांचे प्राण दररोज वाचवत असतात. तरीही आपण त्यांना मारहाण का करतो? मानवी जीवनातील सर्वात चांगल्या व्यवसायात काम करणाऱ्यांना आपण असे भयंकर अनुभव का देतो? याची अनेक कारणे आहेत. एक, आपल्या देशातील अत्यंत निकृष्ट आरोग्य प्रणालीसाठी दोषी म्हणून आपल्याला एक बळीचा बकरा हवा असतो. आपण कितीही कट्टर देशभक्त, राष्ट्रवादी असलो तरी आपण एका तिसऱ्याच देशाचे रहिवासी आहोत, जो विकसित जगाच्या तुलनेत खूप कमी पैसा कमावतो, हे वास्तव आहे. जोपर्यंत हे वास्तव बदलत नाही, तोपर्यंत सव्वा अब्जाहून अधिक लोकसंख्येला उत्तम आरोग्य यंत्रणा देण्यासाठी आपल्याकडे पुरेशी यंत्रणा नसल्याचे चित्रही आपण बदलू शकणार नाहीत.


रुग्णालय चालवणे, तपासण्या, उपचार, शस्त्रक्रिया करणे, औषधी देणे या सर्वांसाठी पैसा लागतो. त्यातही दर्जा उत्तम राखणे महागात पडते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर निश्चित पात्रता आणि क्षमतेचे आहेत. अखेरच्या मुद्द्याचा अर्थ असा की, आपल्याला सर्वोत्कृष्ट बुद्धिमत्ता म्हणजेच सर्वाधिक स्मार्ट लोकांना या व्यवसायाकडे आकर्षित करावे लागेल. म्हणजेच या श्रेष्ठतेचे मूल्य आपण समजून घेतले पाहिजे, तिला योग्य पद्धतींनी प्रोत्साहन दिले पाहिजे. राजकारणापासून हे क्षेत्र वेगळे ठेवले पाहिजे. पण सध्याचे चित्र पूर्णपणे उलट आहे. कारण भारतात कुणी डॉक्टर बनण्याची चूक करत असेल तर आपण त्याला तो हे जग वाचवण्यासाठीच घडला आहे, या भूमिकेत पाठवतो. त्याला प्रत्येक ठिकाणी सुविधांचा अभाव असेल, इतर क्षेत्रांतील समान बुद्धिमत्तेच्या लोकांना कमी वेतन आणि सुरक्षेची हमीदेखील नाही. हा सर्व प्रकार चुकीचा आहे, असे ते म्हणत असतील तर आपण त्यांना नैतिक रूपाने दोषी ठरवतो आणि तुम्ही डॉक्टर झालात कशासाठी? हा सवाल करतो. त्यामुळे आपल्याकडील सर्वोत्कृष्ट डॉक्टर विदेशात जात आहेत. अधिक खेदजनक म्हणजे प्रतिभावान लोकांना तर डॉक्टर व्हायचेच नसते.


काही चांगले घडत असेल तर त्यात कोणत्याही प्रकारे राजकारण आणून ते नष्ट करावे, हा भारताचा स्वभावच आहे. कारण एकूणच राजकारण ही लोकांचीच इच्छा असते. एखादी चांगली शाळा असेल तर आपण त्यावर असंख्य नियम लावतो. चांगली मेट्रो असेल तर त्यात महिलांना मोफत तिकिटाची घोषणा करून त्याचे संचालन अव्यावहारिक बनवतो. यात एक समान तत्त्व लावत नाहीत. तुम्ही शाळांचे नियम कठोर केले किंवा मेट्रोचे व्यवस्थापन बिघडवले तर लोक शाळाच उघडणार नाहीत किंवा मेट्रो सुरू करण्याचा विचारही करणार नाहीत. याच प्रकारे आपण डॉक्टरांना त्रास दिला तर चांगले लोक या व्यवसायात प्रवेश करण्यास निरुत्साह दाखवतील. पण डॉक्टर तर नि:स्वार्थी असावेत, अशी आपली अपेक्षा आहे. त्यांनी सर्व त्रास सहन करून २४ तास केवळ लोकांवर उपचार करत राहिले पाहिजे, पैसा कमावू नये..हे कसे शक्य होईल. अर्थात काही दुर्मिळ लोक समाजाचे भले करतात आणि त्यातून त्यांचा वैयक्तिक फायदाही नसतो. उदा. अण्णा हजारे, मदर टेरेसा. अशा लोकांची संख्या एवढी नाही की, ते देशातील आरोग्याबाबतच्या गरजा भागवू शकतील. समाजासाठी काम करणाऱ्या लोकांचा आणखीही एक गट आहे. हे लोक समाजकार्य करतात आणि पैसाही कमावतात. ते अण्णा हजारे, मदर टेरेसांसारखे नाहीत. आपल्यापैकी बहुतांश लोकांना समाजाचे भले करायचे असते, पण स्वत: उत्तम आयुष्यही जगायचे असते. यात फार चुकीचेही नाही. खरं तर अशा लोकांची खूप गरज आहे. एक डॉक्टर लोकांवर उपचार करत असेल, स्वत:देखील चांगले आयुष्य जगण्याची त्याची इच्छा असेल (जेणेकरून त्याला एमबीएऐवजी डॉक्टरकी केल्याचे समाधान मिळेल), समाजासाठीही तो चांगले काम करत असेल, त्यात काहीही गैर नाही. त्यामुळे ही परिस्थिती प्रत्येकाने समजून घेतलीच पाहिजे. डॉक्टरांच्या रूपाने आपल्याला स्मार्ट आणि उत्कृष्ट लोक हवे आहेत. दयनीय आरोग्य प्रणालीचा अर्थच असा की, भारतातील डॉक्टरांवर खूप ताण आहे. त्यामुळे आपल्याला जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांबाबत आदर आणि सहानुभूतीची भावना असली पाहिजे. देशातील डॉक्टरांसोबत उभे राहा. आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्यांनाही सुरक्षित ठेवा.

X
COMMENT