आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे घाऊक महागाई दर 4 महिन्यांत सर्वाधिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  खाद्यपदार्थ स्वस्त झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे घाऊक महागाई दर आॅक्टोबरमध्ये वाढून ५.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा चार महिन्यांतील सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे. याआधी जून महिन्यात हा ५.५८ टक्के नोंदवण्यात आला होता. सप्टेंबरमध्ये हा ५.१३ टक्के तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ३.६८ टक्के होता.

 
बुधवारी सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांच्या दरामध्ये घसरण दिसून आली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू १.४९ टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. सप्टेंबरदरम्यान या वस्तूंच्या दरात ०.२१ टक्क्यांची किरकोळ घट नोंदवण्यात आली होती. भाज्यांच्या किमती १८.६५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. सप्टेंबरच्या दरम्यान भाज्यांच्या किमतीत ३.८३ टक्क्यांची कमी आली होती. याचप्रमाणे कांदा ३१.६९ टक्के आणि डाळी १३.९२ टक्के स्वस्त झाल्या आहेत. मात्र, बटाटाच्या किमतीमध्ये ९३.६५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.  

 

पेट्रोल १९.८५ %, डिझेल २३.९१ टक्के, एलपीजी ३१.३९% महागले  
इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाई आॅक्टोबरमध्ये १८.४४ टक्क्यांच्या गतीने वाढली आहे. सप्टेंबरदरम्यान यामध्ये १६.६५ टक्क्यांची वाढ दिसून आली होती. पेट्रोल आणि डिझेलचे दर यादरम्यान अनुक्रमे १९.८५ टक्के आणि २३.९१ टक्के दराने वाढले आहेत. एलपीजीचे दरही ऑक्टोबरमध्ये ३१.३९ टक्क्यांनी वाढले आहेत.  

 

भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दर पुन्हा एकदा ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता  
रिझर्व्ह बँक पतधोरण आढावा बैठकीमध्ये किरकोळ महागाई दराचा विचार करते. ऑक्टोबर महिन्यामध्ये किरकोळ महागाई दर १३ महिन्यांतील सर्वात कमी ३.३१ टक्के नोंदवण्यात आला आहे. कच्चे तेल आणि रुपयाची किंमत स्थिर होत आहे. ऑक्टोबरमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये ७४.३९ या विक्रमी नीचांकावर बंद झाला होता. आता हा ७२.२ या पातळीच्या जवळपास आहे, तर ब्रँड क्रूडची किंमत आॅक्टोबरमध्ये ७६.२५ डॉलर प्रती बॅरलवर होती. आता कच्चे तेल ६५ डॉलर प्रती बॅरलच्या जवळपास आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ३ ते ५ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या पतधोरण आढावा बैठकीमध्ये रेपो दर सध्याच्या ६.५ टक्क्यांच्या पातळीवर कायम ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...