आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद - आपल्या पाल्याच्या पाठीवर दप्तराचा किती भार आहे, शाळेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात दप्तराच्या सूचना दिल्या जातात का, कमी वयात आपले पाल्य पाठदुखीच्या आजाराने का त्रस्त आहे, या सगळ्या उत्तरापासून बहुतांश पालक अनभिज्ञ आहेत. मुलांकडून अपेक्षा, शाळेनंतर जादा तास, ट्यूशन आणि पालकांकडून न तपासल्या जाणाऱ्या बॅगमुळे पाल्यांचे दप्तर डोइजड होत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या तुलनेत दुपटीने भार वाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक परिणामांना जबाबदार कोण, याचे उत्तर कोणाकडेच नाही. ‘दिव्य मराठी’ने बुधवारी(दि.२८) शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं तपासल्यानंतर दप्तराचा भार वाढतच असून, मणक्याचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या.
शहरातील एका नामांकित शाळेत आठवीच्या वर्गात शिकणारा सचिन दुसऱ्या सत्रातील शाळा सुरू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सर्व विषयांच्या वह्या, पुस्तके घेऊन शाळेत आला होता. त्याच्याकडील दप्तराचे वजन ७.५ किलो होते. दुसऱ्या एका नामांिकत प्राथमिक शाळेतील १ लीच्या वर्गातली सोनाली ३ किलो वजनाच्या दप्तरासह शाळेत आली होती. शहरातील ९ शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केल्यानंतर एकाही शाळेत यापेक्षा वेगळी परिस्थिती नसल्याचे समोर आले. राज्य शासनाने १ डिसेंबर २०१५ रोजी काढलेल्या सूचनांची अंमलबजावणी झालीच नाही. दप्तराच्या ओझ्याबाबत पालकही गंभीर नसल्याचे काही शाळांचे मत आहे.याउलट पालक आपल्या पाल्याचे दप्तर कधीही तपासत नसल्याने वह्यांचे वजन वाढत जाते,असा आरोप काही शिक्षक करतात. मात्र, पालकांनी ओझ्याबाबत शाळांना दोषी ठरवले आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार शिक्षक विद्यार्थ्यांना सर्व विषयाच्या वह्या-पुस्तके आणण्यास सांगतात.
यामध्ये शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची असली तरी तीन वर्षात या विभागाने दप्तराच्या ओझ्यासंदर्भात शाळांना कसल्याही प्रकारच्या सूचना केल्या नाहीत. त्यामुळे शाळा, शिक्षक दप्तराबाबत गंभीर नसल्याचे दिसते.
का वाढतोय भार..?
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच स्कॉलरशिप, नवोदय, टॅलेंट सर्च परीक्षेचा ताण असतो. क्रमिक पाठ्यपुस्तकातील अभ्यासानंतर जादा तास घेऊन अन्य परीक्षेचा अभ्यास घेतला जातो. यासाठी विद्यार्थी शाळेत येतानाच अन्य अभ्यासक्रमाची पुस्तके, गाईड्स, वह्या आणतात. शिवाय एकेका विषयाच्या दोन-दोन वह्या असतात. बहुतांश विद्यार्थी जादा तास संपवून ट्यूशनला जातात. त्याचाही अतिरिक्त भार पाठीवर असतो. त्यामुळे दप्तराचे वजन वाढत आहे.
तज्ज्ञांचे मत : बालपण हिरावतेय
दप्तराच्या ओझ्याने मुले मानसिक तणावाखाली येत असून, त्यांचे बालपण हिरावून बसले आहे, अशी खंत ज्येष्ठ बालराेगतज्ज्ञ डॉ.अभय शहापूरकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, लहान मुलांमध्ये डोकेदुखी, कंबर, पाठदुखी, मणक्याचे आजार मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. यापेक्षा वेगळा आजारच दिसत नाही. पाठीवरील दप्तराच्या ओझ्याने हे होत असून, ही मोठी गंभीर समस्या आहे.
९ शाळांत तपासणी, अपेक्षेपेक्षा अधिक ओझे
शहरातील एकूण ९ शाळांमध्ये जाऊन बुधवारी विद्यार्थ्यांसह दप्तराच्या ओझ्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांचा समावेश होता. शाळा सुरू होऊन केवळ तीन दिवस झाले आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती निम्म्यावरच असल्याने शाळांकडून अध्यापनावर भर देण्यात आलेला नाही. तरीही विद्यार्थी अपेक्षित वजनापेक्षा दुप्पट वजनाचे दप्तर घेऊन शाळेत येत आहेत.
दिवसाला दोन विषय
आम्ही दप्तराचे ओझे कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांना एका दिवशी देानच विषयाचे शिक्षण देतो. त्यामुळे दुसऱ्या दोन विषयांची पुस्तके किंवा वह्या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याची गरजच पडत नाही. त्यामुळे दप्तर कमी होते.
- एन.व्ही.शिंदे, मुख्याध्यापक, आदर्श प्राथमिक
१२ तास शड्यूल टाईट
स्कॉलरशिप, नवोदय, टॅलेंट सर्च,अशा परीक्षा देणाऱ्या व दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे दिवसभराचे शड्यूल्ड टाईट असते. सकाळी गेलेले पाल्य रात्रीपर्यंंत घरी येऊ शकत नाही. पालकांची विचार करण्याची गरज आहे.
- आनंद वीर,शिक्षक, छत्रपती शिवाजी हायस्कुल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.