आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाण पडले का पाडले?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड लोकसभा मतदारसंघातून दोन वेळचे माजी मुख्यमंत्री, अनेक वर्षे विविध खात्यांचे मंत्री राहिलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. हा निकाल सर्वांसाठीच धक्कादायक आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले. दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर, माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांच्यासोबत चिखलीकरांचे सत्काराचे पेढे भरवतानाचे फोटो व्हायरल झाले. वंचित आघाडीमुळे अशोकरावांना १ लाख ६६ हजार मतांचा फटका बसलाच. मात्र, स्वकीयांनी केलेल्या पोटजातीच्या प्रचारामुळेदेखील त्यांचे ८० हजारांचे मताधिक्य कमी झाले. हे मताधिक्य कमी झाले नसते तर अशोक चव्हाण वंचितच्या फटक्यानंतरही नांदेडमधून किमान काही हजार मतांनी निवडून आले असते. राष्ट्रवादीसोबतच काँग्रेसच्या अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या गावांतदेखील अशोकराव चव्हाण यांची पीछेहाट झाली. यात पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, कारखान्याचे सदस्य, जिल्हा बँकेचे आणि पक्षाचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण सध्या भोकरच्या विद्यमान आमदार आहेत. मात्र, या मतदारसंघातून चव्हाण यांना केवळ ८५ हजार मते मिळाली. येथेही चव्हाणांविरोधात भरपूर काम झाले. चिखलीकरांना येथे ८० हजार मते मिळाली. भोकर मतदारसंघातदेखील पोटजातीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अशोकरावांनी विविध पदे देऊन मोठे केले आहे. याचे उत्तर चव्हाण संबंधितांकडून मागतीलच. स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्यानंतर अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. अशोकरावांना कोंडीत पकडण्याचा अनेकदा पक्षातीलच लोकांनी प्रयत्न केला. मात्र, अशोक चव्हाण यांनी त्यांना नेहमीच आस्मान दाखवले. याची सल कुंटूरकर, गोरठेकर यांच्यासह प्रताप चिखलीकर, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकरांना होतीच. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत पोटजातीचे राजकारण करून अशोक चव्हाण यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न झाला. चव्हाण वेळोवेळी त्यात सरस ठरले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पोटजातीचा असा काही प्रचार करण्यात आला की, चव्हाण यांना याचा मोठा फटका बसला. व्हॉट्सअॅप ग्रुपवरील व्हिडिओत पोटजातीवरून चव्हाण यांना डिवचण्यात आले. हे राजकारण चव्हाण चांगलेच जाणून आहेत. देगलूर, नायगाव, मुखेड या मतदारसंघात चव्हाण यांना अनुक्रमे २३, २१ आणि ३६ हजार मतांचा फटका बसला. ही मते चिखलीकरांना मिळाली.एकूणच राष्ट्रवादीचे नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत निवडणुकीत प्रचाराला फिरले. मात्र, त्यांनी आघाडी धर्म पाळला नसल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. म्हणूनच नांदेडात सध्या अशोक चव्हाण पडले की पाडले? अशीच चर्चा रंगत आहे.  
 

बातम्या आणखी आहेत...