आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटींचे उत्पन्न असलेली माणसे लाखांची कर्जे का घेतात; तेही कुटुंबीयांकडूनच!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर : लातूर जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या मालमत्तांचे आकडे पाहिले तर डोळे विस्फारतील अशी स्थिती आहे. निवडणूक रिंगणात उतरलेले बहुतांश उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यातही दिवंगत नेते विलासराव देशमुखांची अमित आणि धीरज ही दोन मुले लातूरमधील शेजारच्या मतदारसंघातून उभी आहेत. त्यांनी जाहीर केलेला मालमत्तेचा तपशील पाहिला की डोळे तर विस्फारतातच, पण त्यासोबतच काही गमतीदार प्रश्नही मनात उभे राहतात. त्यातील एक म्हणजे कोट्यवधी रुपयांची संपत्ती बाळगून असलेली ही मंडळी कर्ज का घेत असावीत? तीही कुटुंबातील सदस्यांकडूनच. तसेच कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक व स्वत:च्या मालकीचे चारचाकी विक्रीचे शोरूम असलेली ही मंडळी मालकीचे वाहन का घेत नसावीत, असे एका ना अनेक प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून उपस्थित होतात.

आता लातूर शहरामधून रिंगणात उतरलेल्या अमित देशमुख यांचेच उदाहरण पाहूया. अमित यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी १५ कोटी ६८ लाख ९४ हजार ३७९ रुपयांची संपत्ती आहे, तर पत्नी अदितींची ६ कोटी ११ लाख ३५ हजार ५४३ रुपयांची मालमत्ता आहे. दोघांच्या संपत्तीची बेरीज केली २१ कोटी ८० लाख २९ हजार ९२२ रुपये इतकी होते. यामध्ये अमित यांनी पत्नी अदिती यांना १ कोटी ५१ लाख ५० हजार ८५५ रुपयांचे कर्ज दिले आहे. यात विशेष बाब अशी आहे की एवढ्या कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असलेल्या अमित यांनी आपले लहान बंधू धीरज यांच्याकडून १० लाख ९ हजार २८१ रुपयांचे कर्ज घेतले आहे. आता पत्नीला सव्वा कोटीचे कर्ज देणारी व्यक्ती लहान भावाकडून १० लाखांचे कर्ज का घेईल, या प्रश्नाचे उत्तर शपथपत्रात मिळत नाही. यामध्ये धीरज देशमुखांचे शपथपत्र पाहिल्यानंतर आणखी रंजकपणा येतो. लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेल्या धीरज यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून एकूण १६ कोटी ३७ लाख ९१ हजार ३४७ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी दीपशिखा यांच्याकडे स्थावर-जंगम अशी १९ कोटी ११ लाख ८५ हजार ३७९ रुपयांची मालमत्ता आहे. दोघांच्या संपत्तीची बेरीज केली तर ती ३५ कोटी ४९ लाख ७६ हजार ७२६ इतकी होते. विशेष बाब म्हणजे १९ कोटींहून अधिक मालमत्ता असलेल्या दीपशिखा यांनी पती धीरज यांच्याकडून १ लाख ५४ हजार ८६८ रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याहीपुढे जाऊन पाहिले तर यात आणखी एक गंमत आहे. मोठे बंधू अमित आणि पत्नीला कर्ज देणाऱ्या धीरज यांनी आपले दुसऱ्या क्रमांकाचे बंधू अभिनेते रितेश देशमुखांकडून १ कोटी ६८ लाख १० हजारांचे कर्ज घेतले आहे.

कोट्यवधींची संपत्ती, पण मालकीचे वाहन नाही
देशमुख कुटुंबीयांकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे त्यांच्याच शपथपत्रातून दिसते. एवढेच नव्हे तर त्यांचा लातूरमध्ये इंडोमोबिल सेल्स अँड सर्व्हिस या नावाने वाहन विक्रीचाही व्यवसाय आहे. परंतु दोन्ही भावांकडे मालकीचे एकही वाहन नाही. केवळ अमित यांच्या पत्नी अदिती देशमुखांकडे जुनी फोर्ड फिएस्टा कार असून त्याची आजची किंमत केवळ २ लाख रुपये इतकी आहे. कोट्यवधींचे मालक असलेली ही मंडळी मालकीचे वाहन खरेदी का करत नसावी असा प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होतो.