सर्वात चर्चेचा मुद्दा : नेत्यांची दोन जागांवरून लढण्याची इच्छा का असते?

Apr 01,2019 11:47:00 AM IST

अखेर घोषणा झाली. राहुल गांधी अमेठीसोबतच केरळच्या वायनाड जागेवरूनही लढतील. नेत्यांना दोन जागांवरून लढावे वाटण्याचे कारण काय आहे? राजकीय विश्लेषकांच्या मते, त्याची दोन कारणे आहेत. पहिले- नेत्यांना आपल्या पारंपरिक जागेवरून हरण्याची भीती असेल. दुसरे- नेत्यांना दुसऱ्या राज्यात जाऊन रणनीतिक संदेश द्यायचा असतो. मोदींनी गेल्या वेळी ते केले. मोदी गुजरातमधून लढलेच, शिवाय उत्तर प्रदेशच्या वाराणसीतूनही लढले. पक्षाला फायदा झाला. भाजपने तेथे ८० पैकी ७१ जागा जिंकल्या.

सर्वात आधी इतिहास :

१९९६ च्या आधी नेते तीन-तीन जागांवरून लढत होते. लोकप्रतिनिधित्व कायद्यात (१९५१) मध्ये १९९६ मध्ये दुरुस्ती केली. त्यानुसार कोणताही उमेदवार दोनपेक्षा जास्त जागांवरून निवडणूक लढवू शकणार नाही, असे निश्चित झाले.

आणीबाणीआधीचा काळ
१९५७ मध्ये ३२ वर्षीय अटलबिहारी वाजपेयी बलरामपूर, मथुरा, लखनऊ या तीन जागांवरून लढले होते. फक्त बलरामपूरमधून विजय. मथुरात अनामत जप्त झाली होती.

आणीबाणीनंतर...
१९७७ मध्ये इंदिरा गांधी रायबरेलीतून हरल्या होत्या. १९८० मध्ये त्या रायबरेली (यूपी) आणि मेडकमधून (आताचे तेलंगण) रिंगणात उतरल्या. दोन्ही जागांवरून विजय मिळाला.

२ जागांना पसंती देणारे नेते प्रत्येक पक्षात...

> अटलबिहारी वाजपेयी : वाजपेयी १९९१ मध्ये विदिशा आणि लखनऊमधून रिंगणात उतरले. दोन्ही ठिकाणी जिंकले. १९९६ मध्ये ते गांधीनगर आणि लखनऊमधून लढले. दोन्ही ठिकाणी विजय. १३ दिवसांचे सरकार बनवले.

> लालकृष्ण अडवाणी : १९९१ मध्ये नवी दिल्ली आणि गांधीनगरमधून लढले. दोन्ही ठिकाणी विजय मिळाला.

> सोनिया गांधी : १९९९ मध्ये बेल्लारी, अमेठीतून विजयी.

> एन. टी. रामाराव : १९८५ मध्ये आंध्र विधानसभा निवडणुकीत गुडिवडा, हिंदुपूर, नालगोंडातून लढले. तिन्ही ठिकाणी विजय.

> मुलायमसिंह यादव : २०१४ मध्ये आझमगड, मैनपुरीतून रिंगणात उतरले आणि जिंकले.

> लालूप्रसाद यादव : २००९ मध्ये सारण आणि पाटलीपुत्रमधून निवडणूक मैदानात उतरले आणि जिंकले.

> देवीलाल: १९८९ मध्ये देवीलाल यांनी सीकर, रोहतक आणि फिरोजपूरमधून लोकसभा लढवली. सीकर, रोहतकमध्ये विजयी, फिरोजपूरमधून पराभव.

आयोगाची इच्छा : एक नेता, एक जागा

गेल्या वर्षी निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात म्हटले होते की, एका नेत्याने एकाच जागेवरून लढावे. आयोगाने कलम ३३ (७) मध्ये दुरुस्तीची शिफारस केली होती.

X