आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत व जगाला का आहे गांधीजींची गरज?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र मोदी:  पंतप्रधान डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर १९५९ मध्ये भारतात आले तेव्हा म्हणाले, ‘इतर देशांत मी पर्यटक म्हणून जाऊ शकतो, पण भारतात मी एक तीर्थयात्री आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘भारताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे अहिंसेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या पद्धती विकसित केल्या गेल्या. माझ्या देशातील अलाबामातील मोंटगोमेरी आणि अमेरिकेच्या दक्षिण भागात हीच पद्धत वापरली गेली. हा मार्ग सर्वात प्रभावी आणि शाश्वत आहे यावर आमचा विश्वास आहे.’  नेल्सन मंडेलांनी गांधीजींना पवित्र योद्धा म्हटले. ते लिहितात, ‘असहकाराचे धोरण. एखाद्याच्या अधीन असणारे सहकार्य करतील तोपर्यंतच शीर्षस्थ व्यक्तीचे त्यावर नियंत्रण राहते. त्यांच्या अहिंसक चळवळीने आमच्या शतकातील अनेक वसाहती तसेच वंशवादविरोधी आंदोलनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रेरणा मिळाली.’ मंडेलांसाठी गांधीजी भारतीय आणि दक्षिण आफ्रिकी होते. गांधीजीदेखील त्यांच्याशी सहमत होते.  मानवी समाजातील प्रचंड विरोधाभासांमध्येही एक सूत्र बांधण्याची अनोखी कला त्यांच्याकडे होती. १९२५ मध्ये गांधीजींनी ‘यंग इंडिया’त लिहिले : ‘एखादी व्यक्ती राष्ट्रवादी झाल्याशिवाय आंतरराष्ट्रवादी होणे अशक्य आहे. म्हणजेच विविध देशांचे लोक एकत्र येतात आणि नंतरच एक व्यक्ती म्हणून काम करण्यात त्यांना यश येते.’ गांधीजींनी भारतीय राष्ट्रवादाची जी कल्पना केली होती तो संकुचित नव्हता, तर तो संपूर्ण मानवजातीची सेवा करणारा होता.  महात्मा गांधी समाजातील सर्व वर्गांतील लोकांच्या विश्वासाचे प्रतीक होते. १९१७ मध्ये गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे कापड गिरण्यांमध्ये मोठे उपोषण झाले. तेव्हा गिरणी मालक व कामगारांमधील संघर्ष एवढा विकोपाला गेला होता की, तेथून माघार घेणे अशक्य वाटू लागले. गांधीजींनी मध्यस्थी करत न्यायसंगत तडजोड केली. गांधीजींनी कामगारांच्या हक्कांसाठी ‘मजूर महाजन संघ’ स्थापन केला होता. प्रथमदर्शनी ही संघटना नाममात्र वाटते, पण एक लहानसे पाऊलही किती प्रभावी ठरू शकते हे कळते. त्या काळात ‘महाजन’ शब्द उच्चभ्रू वर्गासाठी आदरार्थी वापरला जात असे. गांधीजींनी महाजनांसोबत मजूर शब्द जोडून सामाजिक संरचनाच बदलली. अशा प्रकारे शाब्दिक प्रयोगांनी त्यांनी कामगारांची प्रतिष्ठा वाढवली.  गांधीजींनी साध्या गोष्टी व्यापक जनमानसाच्या राजकारणाशी जोडल्या. चरखा आणि खादीला देशाच्या स्वयंपूर्णतेशी आणि सबलीकरणाशी कोण जोडू शकत होते? चिमूटभर मिठाच्या मदतीने व्यापक जनआंदोलन उभारण्याची ताकद कुणाकडे होती? वसाहतवादी राज्यातील मिठाच्या कायद्यात भारतीय मिठावर मोठा कर लादण्यात आला होता. १९३० च्या दांडीयात्रेच्या माध्यमातून गांधीजींनी या कायद्याला आव्हान दिले. अरबी सागरकिनारी त्यांनी चिमूटभर मीठ हाती घेतले अन् ऐतिहासिक सविनय कायदेभंग आंदोलन सुरू झाले. जगातील इतर आंदोलनांपेक्षा गांधीजींचे आंदोलन खूप वेगळे होते. त्यांनी कधीही प्रशासकीय किंवा िनर्वाचित पद स्वीकारले नाही. त्यांना सत्तेचे आकर्षण कधीही नव्हते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे विदेशी शासन नसणे, असा अर्थ नव्हता. राजकीय स्वातंत्र्य आणि वैयक्तिक सबलीकरण यात घनिष्ठ संबंध अाहेत यावर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या स्वप्नातील भारतात प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा व समृद्धी प्राप्त आहे. जग हक्कांबाबत बोलते, तर गांधीजी कर्तव्यावर बोलतात. त्यांनी ‘यंग इंडिया’त लिहिले : ‘अधिकारांचा स्रोत हा कर्तव्यात असतो. आपण कर्तव्ये पार पाडली तर हक्क फार दूर राहणार नाहीत.’ गांधीजींनी आपल्याला ‘ट्रस्टीशिप’चे तत्त्वज्ञान दिले. यात गरिबांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर भर दिला गेला. त्यातून प्रेरित होऊन आपण स्वामित्वाच्या भावनेवर विचार केला पाहिजे. पृथ्वीचे वारसदार या नात्याने आपण तिच्या कल्याणासाठीही जबाबदार आहोत. यात वनस्पती आणि प्राण्यांचाही समावेश आहे. कारण तेही आपले सोबती आहेत.  गांधीजींच्या रूपात आपल्याला मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ शिक्षक मिळाला आहे. माणुसकीवर विश्वास असणाऱ्यांनी एकजूट होत शाश्वत विकासाकडे वाटचाल करणे, आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सुनिश्चित करण्यापर्यंतच्या प्रत्येक समस्येचे उत्तर त्यांच्याकडे आहे. आपण भारतीय याच दिशेने आपली कर्तव्ये पार पाडत आहोत. गरिबी निर्मूलनात भारत सर्वाधिक वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या देशांपैकी एक आहे. स्वच्छतेच्या आपल्या उपक्रमांकडे जगाचे लक्ष वेधले आहे. आंतरराष्ट्रीय सौर संघटनेसारख्या प्रयत्नांच्या माध्यमातून भारत अक्षय ऊर्जेचे स्रोत वापरण्यात सध्या अग्रेसर आहे. या संघटनेने अनेक देशांना शाश्वत भविष्याच्या दिशेने नेण्यासाठी सौर ऊर्जा वापरासाठी एकत्रित केले आहे. आपण जगासोबत हातमिळवणी करत पर्यावरणासाठी आणखी अनेक प्रयत्न करू इच्छितो. गांधीजींना श्रद्धांजली देण्यासाठी मी ज्याला आइन्स्टाइनचे चॅलेंज म्हणतो, ते सादर करू इच्छितो. गांधीजींविषयी अल्बर्ट आइन्स्टाइनचे प्रसिद्ध वक्तव्य आपल्याला माहिती आहे. ‘गांधीजींसारखी एखादी हाडामासाची व्यक्ती या पृथ्वीवर होती यावर नव्या पिढीचा विश्वासही बसणार नाही.’ गांधीजींचा आदर्श पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मी विचारवंत, व्यावसायिक आणि तंत्रज्ञानातील नेत्यांना आवाहन करतो की, त्यांनी नूतनाविष्कारांच्या माध्यमातून गांधीजींच्या विचारांचा प्रसार करण्यात पुढाकार घ्यावा. चला, आपले जग समृद्ध तसेच द्वेष-वेदनारहित बनवण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करू. हे प्रत्यक्षात घडेल तेव्हाच आपण महात्मा गांधींच्या स्वप्नातील जग, त्यांच्या आवडत्या भजनातील ‘वैष्णव जन तो...’ सत्यात उतरेल. या उक्तीनुसार, खरा माणूस तोच आहे, जो इतरांच्या वेदना अनुभवू शकतो, त्या दूर करतो तसेच याचा त्याला गर्वही असणार नाही. संपूर्ण जगाच्या वतीने तुम्हाला शतश: प्रणाम, बापू.   गांधीजींच्या मते, स्वातंत्र्य म्हणजे विदेशी शासन नसणे, असा अर्थ नव्हता. राजकीय स्वातंत्र्य आणि वैयक्तिक सबलीकरण यात घनिष्ठ संबंध आहेत. यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी ‘यंग इंडिया’त लिहिले : ‘अधिकारांचा स्रोत हा कर्तव्यात असतो. आपण कर्तव्ये पार पाडली तर हक्क फार दूर राहणार नाहीत.’ गांधीजींनी गरिबांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर भर दिला. त्यांच्या मते, पृथ्वीचे वारसदार या नात्याने आपण तिच्या कल्याणासाठीही जबाबदार आहोत. यात वनस्पती आणि प्राण्यांचाही समावेश आहे. कारण तेही आपले सोबती आहेत.  (द न्यूयाॅर्क टाइम्सच्या संपादकीय पानावर प्रकाशित लेख. विशेष करारान्वये उपलब्ध)

बातम्या आणखी आहेत...