आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नसीर को गुस्सा क्यों आता है?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा असणारा पक्ष सत्तेत येणं हे धोकादायक आहे, पण त्याहून धोकादायक आहे ते संकुचितता हा राजकारणाचा मुख्य प्रवाहच होणं. त्या परिभाषेत राजकारणाची फेरमांडणी होणं. अशा वेळी भारताचं काव्य बुलंद करण्याची जबाबदारी तुमची-माझी आहे.  


फरीद झकेरिया आपल्या औरंगाबादचे. ‘मेल्टिंग पॉट’ असलेल्या आणि बहुसांस्कृतिक श्रीमंती लाभलेल्या औरंगाबादचे. नंतर अमेरिकेत जाऊन पत्रकारितेवर त्यांनी अमीट ठसा उमटवला आणि जग नावाच्या नव्या खेड्यात त्यांना वलयही लाभले. बराक हुसेन ओबामा अध्यक्ष झाल्यावर याच झकेरियांनी लिहिलं होतं:  ‘अमेरिकेनं मला सगळं दिलं हे खरं, तरी काही वेळा मी आणि पत्नी सचिंत होत असू. त्यातही ९/११ नंतर जरा जास्तच. जाहीरपणे हे मान्य करत नसलो तरी मनाच्या तळाशी असलेलं भय कसं नाकारणार? या देशात माझ्या मुलांचं, माझ्या ओमरचं भवितव्य कसं असेल ही चिंता मी आणि पत्नी व्यक्त करीत असू. ओबामा अध्यक्ष झाल्यावर असं वाटलं की, ओमरचं कसं होणार, ही चिंताच नाही. तो काहीही होऊ शकतो. तो या देशाचा अध्यक्षही होऊ शकतो!’ झकेरिया हे पूर्वी का बोलले नाहीत आणि आताच का बोलले, असा प्रश्न त्या लेखावर कोणी उपस्थित केला नाही. खरं सांगायचं तर धाकटे जॉर्ज बुश यांच्याशी झकेरियांचे संबंध अगदीच मैत्रीचे होते. मात्र, ओबामांच्या बहुसांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाचा आशय तेव्हाच समजण्याएवढे झकेरियांचे आकलन चांगले होते.  

 

भवतालाचा अंदाज येत असतो. तो झकेरियांना अमेरिकेत आजही येतो, तसाच नसीरुद्दीन शाह यांना भारतात येतो. ‘कारवां- ए- मोहोब्बते’ या कार्यक्रमात बोलत असताना नसीरुद्दीन म्हणाले, “हे धर्मांध विष इथं कोणी पसरवलं? कोणीही कायदा हातात घेतो. झुंडीकडून एका पोलिस अधिकाऱ्याचा खून होतो. मात्र, त्यापेक्षाही गाईचा मृत्यू महत्त्वाचा आहे, असं दिसतंय.’ बुलंदशहरमध्ये सुबोधकुमार सिंग यांच्या हत्येचा संदर्भ नसीरुद्दीन यांनी दिला. अखलाकच्या हत्येचा तपास करणाऱ्या सुबोधकुमारांना झुंडीच्या तोंडी दिलं गेलं. नसीर हे बोलले आणि मग त्यांच्याविरोधात निदर्शने सुरू झाली. ‘अजमेर लिटरेचर फेस्टिव्हल’चं उद््घाटनच त्यांनी करू नये, अशी आंदोलनं उभी राहिली. भूमिका करणाऱ्यांनी भूमिका घ्यायच्या फंदात कशाला पडायचं, असा सूर आळवला गेला. ‘…तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म?’ अशा थाटात सवालही सुरू झाले.  

 

फेसबुकच्या भिंती हल्ली अधिक वेगानं ‘भिंती’ बांधू लागलेल्या असताना आणि व्हॉट्सअॅपनं सारंच ‘विषाणुजन्य’ करून टाकलेलं असताना नसीर यांच्या विधानानं वातावरण तापलं. ते घराघरांतच काय, खिशाखिशात पोहोचलं. अनुपम खेर तर संतापून म्हणाले, ‘भारतात सारं आलबेल आहे. नसीर यांची अडचण काय आहे? त्यांना आणखी किती स्वातंत्र्य हवंय?’ अनुपमराव, किती स्वातंत्र्य हवंय? तुम्ही देता की काय ते आम्हाला खिरापतीसारखं? अहो, या प्रकारे बोलण्याचं, नोंदवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असायलाच हवं. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सादर करताना केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हॉल्टेअरला उद््धृत करत सांगितले होते, ‘तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तो मला पटला नाही तर तो खोडून काढण्यासाठी मी बुद्धी पणाला लावेन, पण तुम्हाला तो मुद्दा मांडता यावा यासाठी जिवाची बाजी लावेन!’ आपला मुद्दा प्रत्येकाला मांडता यावा हा अवकाश हे तर भारतीय लोकशाहीचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे.  

 

भवतालात हे भय कोणी मिसळले, असं विचारण्याऐवजी नसीर असं का बोलले, हा प्रश्न आपण कसा विचारू शकतो? नसीर यांची चिंता समजून घेतली पाहिजे. त्यापूर्वी आमिरनंही आपली अस्वस्थता व्यक्त केली होती. ‘दिव्य मराठी’च्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना जावेद अख्तर यांनी तेच तर सूचित केलं होतं. परवा अरुंधती रॉयही ते सांगत होत्या. १९८४च्या शीखविरोधी दंगलींनंतर अस्वस्थ होणारे, ज्ञानपीठविजेते अमिताव घोष तरी वेगळं काय सांगतात? माणसांच्या जगण्यातून कल्पकता संपली तर गोष्टी संपतात. आणि गोष्टी संपतात तो समाज झुंडीत रूपांतरित होतो. भारताची गोष्ट ज्यातून उगवली तो पाया उखडला गेला तर आणखी वेगळं काय होणार, असंच अमिताव मांडतात. 

 

धार्मिक ध्रुवीकरणानं राजकारणाचा पट व्यापलेला असताना, तोच जणू उद्याचा अजेंडा आणि विजयाचा फंडा असल्याप्रमाणं व्यूहरचना आखल्या जात असताना ही चिंता व्यक्त करायला नको? धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा असणारा पक्ष सत्तेत येणं हे धोकादायक आहे, पण त्याहून धोकादायक आहे ते संकुचितता हा राजकारणाचा मुख्य प्रवाहच होणं. त्या परिभाषेत राजकारणाची फेरमांडणी होणं. 

 

तिकडे मध्य प्रदेशात कमलनाथांनी काय केलंय? ज्या कंपन्यांमध्ये परप्रांतांतील ३० टक्क्यांहून अधिक कर्मचारी नोकरीला आहेत त्या कंपन्यांची सगळी अनुदानं बंद करण्याचा निर्णय कमलनाथांनी घेतलाय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी तर असा नवा कायदा तयार करताहेत. ‘मध्य प्रदेशातील नोकऱ्यांवर उत्तर प्रदेश आणि बिहारमधले कामगार डल्ला मारताहेत,’ या कमलनाथांच्या विधानावर सर्वाधिक आक्रमक झाला तो भाजप. पण तिथं गुजरातेत परप्रांतीयांना हुसकावून लावताहेत त्याचं काय करायचं? आमचे सन्मित्र संजय राऊत यांना ‘रोखठोक’ आनंद असा की, अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते भोपाळात कमलनाथांपर्यंत सगळे त्यांच्याच वाटेवरून निघाले आहेत! (किती द्रष्टे ना हे संजय!)  
जगाचे रूपांतर खेड्यात झाले हे खरे, पण जुन्या खेड्यातली तीच विखारी संकुचितता या नव्या जगात असेल तर विकास नव्हे, विनाश अटळ आहे. नसीरला वाटणारी चिंता ही आहे. देशावर ज्याचं प्रेम आहे त्यालाच अशी चिंता वाटू शकते. म्हणूनच तर त्यांच्या विधानात नाक खुपसणाऱ्या इम्रानला ते ठोकून काढू शकतात. ‘पाकिस्तान’नं भारताला लोकशाही शिकवू नये, असं नसीर सुनावू शकतात. धर्मांधतेवर देश उभा करण्याचे पाकिस्तानचे मॉडेल पूर्णपणे फसले. आज तो देश अराजकाच्या गर्तेत आहे. आणि तरीही आपल्याकडच्या काही वेड्यांना तसलंच मॉडेल हवं आहे. पाकिस्तानी कवयित्री फहमिदा रियाज नुकत्याच काळाच्या पडद्याआड गेल्या. ‘कुछ भी नहीं पड़ोस से सीखा,’ असं म्हणत एका कवितेत त्यांनी लिहिलं होतं –  
वो मूरखता, वो घामड़पन, 
जिसमें हमने सदी गंवाई 
आखिर पहुँची द्वार तुम्हारे, 
अरे बधाई, बहुत बधाई। 
नसीर म्हणूनच तर म्हणतो, ‘मला काळजी वाटते ती माझ्या मुलांची. त्यांना कुठलाच धर्म नाही.’ (नसीर आणि रत्ना पाठक यांचा आंतरधर्मीय विवाह. त्यांच्या मुलांनी कोणत्या एका विशिष्ट धर्माचा स्वीकार केलेला नाही.) ‘एखादी झुंड माझ्या मुलांना घेरेल आणि विचारेल, ‘तुमचा धर्म काय?’ तेव्हा माझी मुलं काय उत्तर देतील? हा विचार करून मला भीती वाटत नाही. संताप येतो. कुठं पळून जाण्याचा प्रश्न नाही. हे माझं घर आहे. पण परिस्थिती बदलताना दिसत नाही. माझ्या घराविषयीची चिंता तर मलाच करायला हवी.’ 

 

तुम्हाला ‘ए बिलियन कलर्स स्टोरी’ हा सिनेमा माहीत आहे? नसेल तर बघा. यूट्यूबवर आहे. इम्रान अझीझ आणि पार्वती यांचा हरी अझीझ हा मुलगा. हे कोवळं पोर तणावात मारलं जातं. सिनेमा संपताना इम्रान-पार्वतीच्या हुंदक्यांसोबत हरीची वाक्यं ऐकू येऊ लागतात- ‘माझा खून धार्मिक दंगलीतून झाला की नाही, हे कोणीच सांगू शकलं नाही. कारण माझा धर्म कोणता हेच त्यांना ठाऊक नव्हतं. पण एक खरं, माझ्या मृत्यूनंतरही भारताचं काव्य मात्र जिवंत असणार आहे. अब्जावधी लोक खोटे असू शकत नाहीत! ए बिलियन पीपल कान्ट बी राँग!’ भारताचं हे काव्य आहे तरी काय?  
धर्माने पेटवलेल्या वणव्यातून 
मिल्खासिंग धावत असतो 
धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात
 फरहान अख्तर दिसतो 
टाळ्या पिटणाऱ्या कोणालाही
 दोघांचाही धर्म ठाऊक नसतो 
तुम्ही कितीही नाकारलीत तरी
हीच माझ्या देशाची गाथा आहे 
भल्याभल्यांचा उतरवला तोरा,
 तुमची काय कथा आहे? 
आम्ही भारताचे लोक 
हीच आमची ख्याती आहे! 
‘ही’ ख्याती बुलंद करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे!

बातम्या आणखी आहेत...