आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरकरांचे भारतरत्न काँग्रेसला का खुपते? कायदामंत्री प्रसाद यांचा प्रतिसवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - सावरकरांचा भारतरत्नने सन्मान करण्याची मागणी होत असेल तर काँग्रेसच्या पोटात का दुखते? काँग्रेसच्या राजवटीत तर गांधी कुटुंबात भारतरत्न वाटले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषांचा भारतरत्नने सन्मान करण्यासाठी इतकी वर्षे का लागली?’ असा सवाल कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी नागपुरात बोलताना उपस्थित केला. 

भाजपने आपल्या संकल्पपत्रात सावरकरांचा भारतरत्नने सन्मान करण्याच्या शिफारशींचे आश्वासन दिले आहे. त्यावर काँग्रेसकडून टीका हाेत आहे. याबाबत  प्रसाद म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्तच होते. स्वातंत्र्यानंतर सावरकरांनी देशाकडून कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. अशा महापुरुषाला भारतरत्न मिळणार असेल तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे. काँग्रेसच्या राजवटीत गांधी कुटुंबातच भारतरत्न दिले गेलेत. आमचा त्याला विरोध नाही. पण, आंबेडकरांना १९९० मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या कार्यकाळात, तर सरदार पटेलांना १९९१ मध्ये; तर मौलाना आझादांना १९९२ मध्ये नरसिंह राव सरकारने भारतरत्न दिले गेले. या महापुरुषांना भारतरत्न देण्यास इतकी वर्षे का लागली, असा सवालही त्यांनी केला. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व भारतरत्नपेक्षा कितीतरी मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची यासाठी शिफारस झाली नसावी. खरे तर गांधीजी त्याच वेळी नोबेल पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार होते’, याकडेही मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले.  
 

काँग्रेसच्या मजबुतीसाठी आम्ही काय करावे?
देशात मजबूत विरोधी पक्ष हवा, असे आम्हाला सांगितले जाते. देशात काँग्रेस मजबूत होण्यासाठी आम्ही काय करावे, असा प्रतिप्रश्न रविशंकर प्रसाद यांनी केला. ३७० कलम हटवण्यास विरोध, ट्रिपल तलाक विधेयकाला विरोध करण्यास आम्ही सांगितले नव्हते. आम्ही आमच्या क्षेत्रीय नेत्यांना मजबूत करतो. काँग्रेसमध्ये खच्चीकरण होते, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...