आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-शहांसाठी महाराष्ट्राची निवडणूक का महत्त्वाची?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशांत कदम
 
महाराष्ट्राची निवडणूक ही जितकी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्वाची आहे, तितकीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कलम ३७० हटवल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. जनमत या निर्णयाच्या पाठीमागे आहे, हे दाखवण्यासाठी महाराष्ट्र आणि हरियाणातल्या निकालांचा आधार भाजप घेणार, यात काही शंका नाही. प्रचारातही त्याची स्पष्ट झलक पाहायला मिळतेय. मोदी-शहांच्या प्रचारसभांमधे सर्वाधिक भर याच मुद्द्यावर दिला जातोय. निवडणूक महाराष्ट्राची आहे की काश्मीरची, असा प्रश्न विरोधक उपस्थित करीत असले, तरी भाजपने हाच निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनवलेला आहे. त्यामुळे एकटे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात ९ ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. २०१४ ला महाराष्ट्रात  मोदींच्या १५ सभा झाल्या होत्या. त्या तुलनेत हा आकडा कमी वाटत असला, तरी दोन्ही वेळच्या स्थितीतही फरक आहे. मागच्या विधानसभेला ऐनवेळी युती तुटली, त्यामुळे भाजप प्रथमच महाराष्ट्रात स्वत:ची ताकद आजमावत होता. आता शिवसेना-भाजप एकत्र लढतायत, लोकसभेच्या दारुण पराभवातून विरोधक पुरते सावरलेले नाहीत. कलम ३७० च्या निर्णयाने सरकारच्या धाडसी प्रतिमेचा प्रचारात वापर होताना दिसतोय. त्यामुळे मोदींच्या जास्त सभांची गरज भाजपला वाटली नसावी.

महाराष्ट्र, हरियाणातील निकाल सकारात्मक आल्यानंतर भाजप पुढच्या विधानसभा निवडणुकांसाठीही मोठ्या आत्मविश्वासाने  मैदानात उतरेल. डिसेंबरअखेरीस झारखंड, पुढच्या वर्षी फेब्रुवारीत दिल्ली आणि नोव्हेंबरमध्ये बिहार या राज्यांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांनी भाजपचा अश्वमेध रोखून धरला. ही खंडित झालेली विजयमालिका महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निमित्ताने पुन्हा सुरू करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमित शहा देशाचे गृहमंत्रिपद आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांची पक्षावरची पकड ढिली झालेली नाही, हे या निमित्ताने दिसतेय. 

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे आणखी खच्चीकरण करण्यासाठीही महाराष्ट्र, हरियाणाचे निकाल मोदी-शहांसाठी महत्वाचे आहेत. राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हंगामी अध्यक्षपद सोनियांकडे आले. तिकीट वाटप आणि इतरही अनेक जबाबदाऱ्या ७३ वर्षांच्या सोनियाच सांभाळताना दिसल्या. हे निकाल नकारात्मक आले, तर काँग्रेसमधील नेतृत्वाचा प्रश्नही आणखी गंभीर होऊ शकतो. राहुल गांधी लोकसभेच्या निकालानंतर पूर्णपणे विजनवासात गेल्याचे चित्र होते. त्यांनी पक्षाच्या कुठल्याच कामकाजात सहभाग घेतला नाही. दोन्ही राज्यांच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठका होत असताना दिल्लीत असूनही ते गैरहजरच राहिले. आता उशिराने त्यांनी जाहीर सभा घ्यायला सुरवात केली, पण त्यात लढण्याचं स्पिरीट काही फारसं दिसत नाही. आपल्या न जाण्याची चर्चा अधिक होईल, या भीतीनेच हे कार्यक्रम आखल्यासारखे  दिसत आहेत. असे सैरभैर विरोधक मोदी-शहांच्या पथ्यावरच पडू शकतात. 

पहिल्या टर्ममध्ये मोदी सरकार पूर्णपणे ‘इलेक्शन मोड’मध्ये होते. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती होणार, का याचेही उत्तर लवकरच कळेल. त्याचबरोबर मित्रपक्षांबद्दल भाजपची पुढची नीती कशी असणार, याची उत्तरेही महाराष्ट्रातील निकालात दडलेली आहेत. निकालानंतर सत्तेच्या जुळवाजुळवीत शिवसेना-भाजप हे किती सामंजस्यानं राहतात, यावर ‘एनडीए’तील एकोप्याचे चित्र अवलंबून असेल. विशेषत : या सगळ्या घडामोडींवर नितीशकुमार यांची बारीक नजर असेल. लोकसभेच्या निकालानंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बोलताना तर मोदींनी ‘एनडीए’च्या एकतेचे गोडवे गायले होते. मित्रपक्षांना आपण कधी सोडणार नाही, असेही म्हटले होते. पहिल्या टर्ममध्ये शिवसेना-भाजपच्या खटक्यांनी ‘एनडीए’च्या गोटात प्रचंड कटूता निर्माण झाली होती. त्यामुळे आता दुसऱ्या टर्ममधली या आघाडीची वाटचालही महाराष्ट्राच्या निकालांवरच अवलंबून असेल. शिवसेनेला  १२२ जागा देऊन भाजपने काहीशी तडजोडीची तयारी दाखवल्याचे दिसले, पण सत्ता आल्यानंतर शिवसेनेच्या निम्म्या वाट्याचे नेमके काय होते, हे पाहणेही महत्वाचे असणार आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमधील राष्ट्रीयदृष्ट्या आणखी एक साम्य म्हणजे, या दोन्ही ठिकाणी नेता निवड करताना भाजपने दाखवलेली धमक. हरियाणासारख्या जाटबहुल राज्यात मनोहरलाल खट्टर या बिगरजाट व्यक्तीला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार केले, तर मराठाबहुल महाराष्ट्रात ब्राह्मण. या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या पाच वर्षांत या बहुसंख्य समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पेटला होता. पण, तो यशस्वीरित्या हाताळण्यात नेतृत्वाला यश आले. हरियाणात खट्टर आणि महाराष्ट्रात फडणवीस हेच चेहरे पुढे करीत भाजप मैदानात उतरला आहे. निर्णयप्रक्रियेतील मोदी-शहांचं वेगळेपण अधोरेखित करणारी ही गोष्ट आहे. 

एकंदरितच अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्र विधानसभेचे निकाल मोदी -शहांसाठी महत्वाचे आहेत. परीक्षा फडणवीसांची असली, तरी मोदी-शहांच्या प्रगतिपुस्तकावरही त्याचा शेरा उमटणार आहे. त्यामुळे २४ तारखेला काय होते, यावर दिल्लीचीही नजर असेल. विधानसभेच्या मतदान व निकालाची तारीख जवळ येत असताना राममंदिराच्या निकालाचेही पडघम वाजू लागलेत. राष्ट्रीय राजकारणाची दिशा त्यामुळेही बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदलणार, हे निश्चित.