जातीचे कार्ड खेळणाऱ्या मोदींचे दलित अत्याचारावर मौन का? मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा पुण्यात सवाल

दिव्य मराठी

Apr 19,2019 11:01:00 AM IST
पुणे - पंतप्रधान आता जातीचे कार्ड खेळत असून आता मोदींना जात आठवते. मग पाच वर्षांत दलितांवर अन्याय झाला, त्यावेळी का त्यांनी मौन बाळगले, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना विचारला.
खडकवासला येथील जाहीर सभेत ते बोलत होते. राज म्हणाले, निवडणुकीसाठी मोदी जातीचा वापर करत आहेत. आपण मागास जातीतील असल्याचे सांगत आहेत. आम्ही जातीवरून त्यांच्यावर टीका करत नाही. मात्र, जातीबाबत बोलणारे मोदी गुजरातमधील उना येथे दलित बांधवांवर झालेल्या अत्याचाराबाबत का बोलत नाहीत, हा माझा त्यांना सवाल आहे. माझे काही जैन मित्रही बिफच्या व्यवसायात आहेत, असे एका मुलाखतीत मोदी सांगतात. मग, त्या निरपराध तरुणांना का मारले, याचे उत्तर द्यावे. पाच वर्षांपूर्वी देशाला मोदी यांनी स्वप्ने दाखवली. देशातील शेतकरी, कामगार, तरुणांना अच्छे दिन येतील, असे सांगितले. मात्र, आज पाच वर्षानंतर हा माणूस चकार शब्द काढायला तयार नाही. सत्तेत आल्यावर मोदींची भाषा बदलली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मोदी सत्तेत आल्यानंतर सांगत आहेत, महिलांवरील अत्याचाराचे खापर सरकारवर फोडणे योग्य नाही. मात्र, निर्भया प्रकरणात त्यांनीही सरकारला घेरले होते, हे ते विसरतात, असा सवालही त्यांनी विचारला.
X