आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीतील विकासपुरी परिसरात सभेला संबोधित केले. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा खरपूस समाचार घेतला. शाहीनबागमधील आंदोलकांना केजरीवाल मोफत बिर्याणी खाऊ घालत असल्यामुळेच पाकिस्तानचे मंत्री केजरीवालांच्या समर्थनार्थ विधान करत आहेत, असा गंभीर आरोप योगींनी केला. पाकिस्तानचे उद्योगमंत्री चौधरी फवाद हसन यांनी निवडणुकीत भाजपला पराभूत करा, असे विधान केले होते.
दिल्लीत विधानसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यामुळे प्रचाराने जोर धरला आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत प्रचारसभा घेतली. यादरम्यान त्यांनी केजरीवालांना चांगलेच धारेवर धरले. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शाहीनबागमध्ये सुरू असलेले आंदोलन केवळ निमित्त आहे, खरे कारण म्हणजे त्यांना कोणतीही समस्या सोडवायची नाही, अशी टीका योगींनी केली. भारताचे तुकडे होतील अशा घोषणा देणाऱ्यांबद्दल केजरीवालांना सहानुभूती आहे. देशाच्या सैन्याकडून ते पुरावे मागतात. त्यांना दिल्लीतील जनतेबद्दल नाही, तर शाहीनबागमधील आंदोलकांबद्दल सहानुभूती आहे, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, आमच्या सरकारने गंगा स्वच्छतेसाठी अनेक प्रयत्न केले. त्यामुळे नदी मोठ्या प्रमाणात स्वच्छ झाली आहे.
केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे : प्रकाश जावडेकर
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी दहशतवादी आहे का? असे केजरीवाल नेहमी विचारत असतात. तर याचे अनेक पुरावे आहेत. केजरीवाल स्वत: म्हणाले होते, मी अराजकवादी आहे. अराजकवादी आणि दहशतवादी यांच्यामध्ये जास्त फरक नसतो. तसेच ते खलिस्तान कमांडो फोर्सचा कमांडर दहशतवादी गुरिंदर सिंग याच्या घरीही थांबले होते. ते जाणूनबुजून नाही तर विचारपूर्वक थांबले होते.
मी भाजपला आव्हान देतो, त्यांनी केजरीवालांना अटक करावी : सिंह
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले, आपल्या देशाच्या राजधानीत हे काय सुरू आहे. येथे सरकार आहे. निवडणूक आयोग आहे. अशा स्थितीत केंद्रीय मंत्री अशा प्रकारचे विधान कसे करू शकतात. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खरच दहशतवादी असतील तर भाजपने त्यांना अटक करून दाखवावी, असे आव्हान सिंह यांनी दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.