आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोटामध्ये 100 नवजातांचा मृत्यू होऊनही प्रियंका गांधी गप्प का आहेत' : मायावती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ : राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात जवळपास १०० नवजात मुलांचा मृत्यू झाला असतानाही काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी गप्प का आहेत, असा प्रश्न बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी विचारला. राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या सरकारच्या बेपर्वाईमुळे मुलांचा मृत्यू झाला असून प्रियंका यांनी या मुलांच्या मातांची भेट घ्यायला हवी होती, अशी टिप्पणीही मायावती यांनी केली.

मायावती यांनी गुरुवारी अनेक ट्विट्स करून प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला. मायावती यांनी म्हटले आहे की, 'राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात अलीकडेच जवळपास १०० मुलांचा मृत्यू झाला आहे, ही घटना दु:खद आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी जर कोटाला गेल्या नाहीत तर त्याचा अर्थ असा असेल की, त्यांचा उत्तर प्रदेशचा दौरा करणे आणि पीडित कुटुंबांची भेट घेणे हे फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी केलेले राजकीय नाटक होते. 


राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत असताना प्रियंका कोटाला का जात नाहीत? प्रियंका यांच्यासारखी महिला नेता अशा गंभीर मुद्द्यांवर मूकदर्शक राहिल्या आहेत हे दुर्दैवी आहे. त्यांनी उत्तर प्रदेशप्रमाणेच कोटाचाही दौरा करून मृत्यू झालेल्या मुलांच्या मातांची भेट घ्यायला हवी होती.'

आणखी एका ट्विटमध्ये मायावतींनी म्हटले आहे की, 'कोटा येथे १०० मुलांचा मृत्यू होऊनही तेथील मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे उदासीन, असंवेदनशील आणि बेजबाबदार आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. त्यापेक्षाही दु:खद गोष्ट म्हणजे काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व विशेषत: महिला सरचिटणीसांनी याप्रकरणी बाळगलेले मौन. काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने मुले मृत्युमुखी पडले आहेत.

कोटा : जेके लोन रुग्णालयात मुलावर उपचार होण्याच्या प्रतीक्षेत असलेली एक माता.

सोनिया, प्रियंका गांधी यांनी मुलांच्या मातांची वेदना जाणून घेतली नाही : योगी आदित्यनाथ यांचीही टीका

लखनऊ : स्वत: महिला असूनही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कोटामधील मुलांच्या मातांच्या वेदना जाणून घेतल्या नाहीत याचे दु:ख वाटते, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दोन्ही नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. योगींनी अनेक ट्विट्स करून म्हटले आहे की, १०० मुलांचा मृत्यू ही अत्यंत दु:खदायक आणि हृदयद्रावक घटना आहे. मुलांचा मृत्यू हा सभ्य समाज, मानवी मूल्ये आणि भावना यांच्यावरील डाग आहे. सोनिया आणि प्रियंका या महिला असूनही त्यांना मातांचे दु:ख समजत नाही हे वेदनादायक आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याएेवजी प्रियंकांनी या मातांची भेट घ्यायला हवी होती.

मुलांच्या मृत्यूबाबत राजकारण करू नका : अशोक गेहलोत

जयपूर : कोटा जिल्ह्यातील रुग्णालयात १०० मुलांचा मृत्यू झाला असल्याच्या मुद्द्यावर राजकारण करू नये, असे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. माझे सरकार या मुद्द्यावर संवेदनशील आहे, असे ते म्हणाले. भाजप आणि मायावती यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेवर ते प्रतिक्रिया देत होते. गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोटातील जेके लोन रुग्णालयातील आजारी मुलांच्या मृत्यूबद्दल सरकार संवेदनशील आहे. या रुग्णालयातील नवजात मुलांच्या मृत्युदरात हळूहळू घट होत आहे. तो आणखी कमी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

बातम्या आणखी आहेत...