आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशासाठी होतेय शिवसेना- काँग्रेसची हातमिळवणी?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशांत कदम (राजकीय विश्लेषक)


महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जनादेश महायुतीला मिळाला असला, तरी दोन्ही पक्ष आपल्यातल्या अंतर्गत भांडणात एकत्र यायची शक्यता दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस- शिवसेना- राष्ट्रवादी यांचे एकत्रित सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेसोबत काँग्रेस हा अशक्य वाटणारा प्रयोग महाराष्ट्रात खरोखर यशस्वी होऊ शकेल का, झाल्यास तो किती काळ टिकणार, याची उत्तरे नजीकच्या भविष्यात मिळतीलच. कारण किमान समान कार्यक्रम करण्याआधी किमान समान प्रश्नांवरील वाद या पक्षांना सोडवावा लागेल. पण, मुळात काँग्रेससारखा पक्ष शिवसेनेसोबत जायला तयार कसा झाला, हे कोडं अनेकांना पडलं असेल. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून या संदर्भातली खलबतं सुरु होती. काँग्रेस नेतृत्वाकडून हिरवा कंदील आल्यानंतरच आता दोन्ही पक्षांचे नेते अगदी उघडपणे भेटीगाठीही करू लागलेत. शिवसेनेच्या जवळीकीचे पक्षाला भविष्यात काय फायदे-तोटे होणार आहेत, हे कळेलच. मात्र, सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय घेण्याची अगतिकता काँग्रेससारख्या जुन्या राष्ट्रीय पक्षावर का बरं आली असेल, यावर पाच प्रमुख कारणे घेऊन आपण चर्चा करुयात...

 

१. भाजपला सत्तेबाहेर ठेवणे :  


महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यातून भाजपला सत्तेबाहेर ठेवणं, हे या निर्णयामागचं प्रमुख कारण आहे. देशात दीड वर्षांपूर्वी अशी स्थिती आली होती की पंजाब आणि कर्नाटक सोडले, तर एकही प्रमुख राज्य काँग्रेसच्या ताब्यात नव्हतं. भाजपच्या काँग्रेसमुक्त भारताचा संकल्प मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांनी रोखल्यानंतर स्थिती बरीच बदलली. काँग्रेस देशातून हद्दपार होतेय की काय असं वाटत असतानाच या घडीला त्यांचे देशात पाच मुख्यमंत्री आहेत. तरीही शक्य तिथे भाजपशासित राज्यांची संख्या कमी करणे काँग्रेसला आवश्यक आहे. राष्ट्रीय पातळीवर लढण्यासाठी आर्थिक स्त्रोत आवश्यक असतात. त्यातही महाराष्ट्र हे तर आर्थिकदृष्टया सर्वांत महत्वाचं राज्य. त्यामुळे या राज्यातून भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने आपली विचारसरणी खुंटीवर टांगून दिलीय. त्यात धोके अनेक असले, तरी कदाचित पक्षाने व्यवहार्यतेला अधिक प्राधान्य दिले असावे.

 

२. कार्यकर्ते टिकवणे :


महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपने सुरू केलेल्या नेत्यांच्या मेगाभरतीत काँग्रेसलाही मोठे खिंडार पडले. पक्षाचे विरोधी पक्षनेतेच जिथे भाजपच्या गोटात जाऊन बसले, तिथे बाकीच्यांची काय कथा? कार्यकर्त्यांचं मनोबल इतकं तुटलं होतं, की काँग्रेसच्या तिकिटावर लढायला जे तयार झाले, त्यांना एखादा शौर्य पुरस्कारच द्यावा, अशी स्थिती होती. पण, याही परिस्थितीत पवारांच्या झंझावाताचा आधार घेत का होईना, पण काँग्रेसने आपला आधीचा आकडा टिकवला. राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या समोर पर्यायच दिसत नसल्याने दोन्ही लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचे पानिपत झाले. पक्षाकडे राष्ट्रीय पातळीवर असा मजबूत चेहरा नाही, ज्याकडे पाहून कार्यकर्त्यांचा तिकडे ओढा वाढावा. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहिल्यावरही आपल्याला बरे दिवस येऊ शकतात, हे दाखवण्यासाठीही बहुदा महाराष्ट्राच्या सत्तेचा पर्याय दिसत असावा.

३. ‘एनडीए’मधली फूट वाढवणे :


महाराष्ट्रात शिवसेनेसोबत हातमिळवणी करणे, याचा दुसरा अर्थ ‘एनडीए’ कमजोर करणे. शिवसेनेने महाराष्ट्रात जे केले, त्यानंतर त्याचे परिणाम राष्ट्रीय पातळीवरही दिसू लागलेत. हरियाणात दुष्यंत चौताला यांच्या पक्षाने भाजपला मंत्रिपदाच्या वाटण्यांमध्ये वाकवले आहे. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत दोन स्थानिक पक्षांनी भाजपची साथ सोडली. शिवाय, बिहारमध्ये ‘जेडीयू’चे नेते के. सी. त्यागी यांनी शिवसेनेसोबत जे झालं त्याला केवळ भाजप जबाबदार असल्याचे सांगत पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधीच गुरगुरायला सुरुवात केलीय. ‘एनडीए’च्या गोटात भाजपबद्दल अशी अस्वस्थता निर्माण करणे काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवरची लढाई लढताना कामी येईल. लोकसभेत एकट्या भाजपची संख्या बहुमतापेक्षा अधिक असली, तरी काही महत्वाच्या विधेयकांवर राज्यसभेत असे नाराज पक्ष काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतात.४. सहकाराचे बुरुज टिकवणे :


देशात एखाद्या राज्यातून काँग्रेस हद्दपार झाली, तर ती पुन्हा तिथे लवकर रूजत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि अलीकडच्या काळातील आंध्र प्रदेशवर नजर टाकली, तर ही गोष्ट लक्षात येईल. महाराष्ट्र हे असे राज्य आहे, जिथे बिगर काँग्रेस सरकार यायला १९९५ साल उजाडले. महाराष्ट्रात काँग्रेसचे नेटवर्क मजबूत आहे. सलग दहा वर्षे सत्तेबाहेर राहिल्यास ज्या पायावर ते उभं आहे, त्याला बऱ्याच भेगा पडणार. ज्या सहकाराच्या जोरावर काँग्रेसचे नेते मोठे झाले, तोच मुळात गेल्या काही वर्षांत डबघाईला आला आहे. सरकारी पातळीवरुनही त्याला वाचवण्याचे प्रयत्न होत नाहीत. अशा स्थितीत सत्तेत येऊन सहकारी संस्थांना सत्तेचे सलाईन मिळते का, हेही चाचपण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल.५. सॉफ्ट हिंदुत्वाची उजळणी :


शिवसेनेसोबत येण्यात काँग्रेसला तोटे अनेक आहेत, पण त्यात एक फायदाही दडलेला आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसची प्रतिमा हिंदूविरोधी पक्ष अशी बनू लागली आहे. ती बनवण्यात विरोधी पक्षांचा काही वाटा असला, तरी काँग्रेसच्या चुकांचाही त्यात समावेश आहेच. २०१४ ला ते लक्षात आल्यावर काँग्रेसने गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून मंदिरांच्या वाऱ्याही सुरु केल्या. शिवसेनेसोबत किमान समान कार्यक्रम काय बनतो, याची उत्सुकता आहेच. पण, हा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष काही मुद्द्यांवर काँग्रेसला मवाळ करु शकला, तर त्या माध्यमातून काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वाची उजळणी आपोआपच घडेल. राष्ट्रीय पातळीवरील आपली ही नकारात्मक प्रतिमा पुसण्यासाठी पक्ष त्याचा किती हुशारीने उपयोग करतो, त्यावर बरेच काही अवलंबून असेल.