वेडिंग साइटवर शाेधलेल्या / वेडिंग साइटवर शाेधलेल्या तरुणाचा लग्नाचे आमिष देत विधवेवर बलात्कार

तरुण निघाला विवाहित, साइटवर वरसंशाेधन करणे पडले महाग 

प्रतिनिधी

Dec 15,2018 09:33:00 AM IST

नाशिक- लग्न जमवण्यासाठी विधवेला नामांकित वेडिंग साइटवर जोडीदार शोधणे चांगलेच महागात पडले. मुंबई येथील विवाहित पुरुषाने या महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला अापण अविवाहित असल्याचे सांगत तिच्या राहत्या घरी तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस अाला.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विधवेने तक्रारीनुसार, चाळीस वर्षीय महिलेच्या पतीने निधन झाले आहे. दोन मुलांसह ती एकटी राहते. मुले लहान असल्याने तिला नातेवाइकांनी लग्न करण्याचा आग्रह धरला होता. या पीडितेने नातेवाइकांच्या अाग्रहास्तव ऑक्टोबर महिन्यात एका संकेतस्थळावर ऑनलाइन माहिती आणि नाव नोंदवले होते. या आधारे संशयित रविश प्रभाकर दरगुडे (३५, रा. घाटकोपर) याने पीडितेशी संपर्क साधला. आपण अविवाहित असल्याचे सांगत सर्व माहिती दिली. एक-दोन वेळा फोनवर बोलणे झाले. संशयितावर विश्वास वाढल्याने महिलेने त्यास कुटुंबियांची सर्व माहिती दिली. त्याने मुलांसह सांभाळ करण्याचे अाश्वासन दिले. संशयिताने लग्नापूर्वी भेटण्याची गळ घातली. पीडितेने विश्वास ठेवत त्याला घरी बोलावले. मुले घरी नसताना त्याने लग्नाचे आमिष देत तिच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक प्रवीण शिंदे तपास करत आहे.

रजिस्टर नोंदणीपूर्वीच भांडाफोड
पीडितेने संशयिताची माहिती घेतली असता ताे विवाहित असल्याची माहिती मिळाली. रजिस्टर कार्यालयातून दोघांना विवाह नोंदणीसाठी फोन आला. दोन साक्षीदारांसह हजर राहण्याचे सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत संशयिताचे पितळ उघडे पडले हाेते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेला मानसिक धक्का बसला. तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

खात्री केल्यानंतर घ्या निर्णय
ऑनलाइन विवाह नोंदणी करताना एखाद्या व्यक्तीने लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला तर सतर्क व्हा. त्या व्यक्तीची सर्व माहिती संबंधित नोंदणी कार्यालयातून घ्या. त्याच्या नातेवाइकांकडून माहिती घ्या, सर्व खात्री झाल्यानंतर पुढील निर्णय घ्या. अशा प्रकारात महिलांची सर्वाधिक फसवणूक होते. - लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त

X
COMMENT