Suicide / प्रेमविवाहानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने उचलले टोकाचे पाऊल

आळंदी येथे पळून जाऊन प्रेमविवाह केला

प्रतिनिधी

Jul 11,2019 09:22:00 AM IST

जळगाव - सात महिन्यांपूर्वी कुटुंबीयांनी विरोध पत्करून प्रेमविवाह केल्यानंतर तरुणीने सासरी येण्यास नकार दिल्याने पती तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार जळगावातील रायसोनीनगरात घडला.


नीलेश ऊर्फ गोलू मधुकर सपकाळे (२२, रा. रायसोनीनगर) असे मृताचे नाव आहे. नीलेशच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीपर्यंत शिकलेला नीलेश हॉटेलात स्वयंपाकी होता. महाविद्यालयात शिकत असलेल्या रूपालीशी (नाव बदललेले) ७ वर्षांपूर्वी त्याचे सूत जुळले होते. दोघांनी २७ डिसेंबर २०१८ रोजी आळंदी येथे पळून जाऊन प्रेमविवाह केला; परंतु दोघांच्या घरी या लग्नाबद्दल माहिती नसल्याने परत आल्यानंतर ते आपापल्या घरीच राहत होते. काही दिवसांनी ते घरी सांगणार होते. नीलेशच्या कुटुंबीयांना मात्र याची भणक लागली होती आणि रूपाली अधूनमधून घरीही येत होती. परंतु, रूपालीच्या वडिलांचा लग्नास ठाम नकार होता. त्यामुळे दोघांत दुरावा आला होता. अखेर नीलेशने मंगळवारी दुपारी ३.३० वाजता आईवडील, भाऊ आणि अन्य काही नातेवाइकांसह रूपालीचे घर गाठले. तिच्या वडिलांनी रूपाली व आईला आत काेंडून घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. नीलेशच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडण्याची विनंती केल्यानंतर अर्ध्या तासाने रूपालीचे वडील काही नातेवाइकांसह घरी आले. मात्र, त्यांनी लग्नास नकार दिला.

युवतीने नकार दिल्याने टाेकाचा निर्णय
नातवाइकांसह रूपालीच्या घरी गेलेल्या नीलेशने रूपालीला सोबत येण्याबाबत विचारणा केली. परंतु, तिने नकार दिला. तिथून घरी परतल्यानंतर रात्री तो वरच्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेला होता. पहाटे ३.४४ वाजेपर्यंत व्हाॅट‌्सअॅपवर ऑनलाइन होता. मंगळवारी सकाळी १० वाजता भाऊ सुबोध हा त्याला उठवण्यासाठी गेला असता गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. कुटुंबीयांनी या प्रकरणी रूपाली व तिच्या कुटुंबीयांविरुद्व तक्रार दिली आहे.

X
COMMENT