आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीनंतर पत्नीनेही संपवले जीवन; शिर्डी येथील साई आश्रयाने आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आजीसह चार नातवांना घेतले दत्तक

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

राम सोनवणे 

सेलू : तालुक्यातील कुपटा येथील तुकाराम माणिकराव हारके यांनी गळफास घेऊन तर पत्नीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली होती. यामुळे त्यांचे संपूर्ण कुटूंब उघड्यावर आल्याची माहिती शिर्डी येथील साई आश्रया परिवारास मिळताच त्यांनी  सोमवारी (दि. २) कुपटा गावात येवून  तुकाराम यांच्या कुटुंबातील आजी व त्यांच्या चार मुलांना दत्तक घेतले. 

कुपटा गावातील तुकाराम हारके (३४) व त्यांची पत्नी सविता (२९) हे कुटुंबासह  पोटाची खळगी भरण्याकरिता सालगडी म्हणून सेलू तालुक्यातील वाकी शिवारातील हारुण किदवाई यांच्या आखाड्यावर दीड ते दोन वर्षांपासून काम करत होते. १३ फेब्रुवारी रोजी तुकाराम यांनी शेतातील विहिरीच्या लोखंडी गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नी सविता हिने त्याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या दांपत्यास तीन मुली व एक मुलगा आहे.  मोठी मुलगी वैष्णवी ७ वर्षाची  तर शिवरी, गायत्री या दोन मुलींसह सात महिन्यांचा एक भागवत नावाचा मुलगा आहे.  पती व पत्नीच्या आत्महत्येमुळे त्यांची मुले उघड्यावर आली. यात तुकारामची आई वृध्द असल्याने या मुलांचा कसा सांभाळ करायचा असा प्रश्न पडला होता. याबाबत शिर्डी येथील साईआश्रया परिवारापर्यंत ही माहिती पोहोचली. या परिवाराचे गणेश दळवे व त्यांची टीम कुपटा  गावात २ मार्च रोजी पोहोचली. त्यांनी या कुटुंबाबाबत सर्व माहिती जाणून घेतली. परिस्थिती हालाखीची असल्याचे लक्षात येताच वृद्ध आजीसह ही चारही मुले त्यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेत पोलिसांसमक्ष आधार देण्याचे जाहीर केले. या वेळी गावातील पोलिस पाटील माणिकराव सोळंके, डॉ. विष्णू दराडे आदींची उपस्थिती होती.

निरोप देताना अश्रू झाले अनावर

आई, वडिलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर कोणताही प्रशासकीय अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे यापैकी सांत्वन करण्याकरिता भेट दिली नाही. परंतु साई आश्रया परिवाराला ही हृदयद्रावक घटना समजल्यानंतर खंत व्यक्त करत या मुलासह आजीला सोबत नेले. जाताना या सर्वांनी साई जन्मभूमी पाथरी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या सर्व प्रकाराने गावातील नागरिकासह महिलांना आश्रू अनावर झाले.

आजी नातवंडांना साई आश्रया परिवाराने दत्तक घेतल्यानंतर पो. नि. बोरगावकर यांना हमीपत्र देताना साई आश्रयाचे पदाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...