आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ आणि आईच्या मदतीने शॉक देऊन पतीचा खून, शवविच्छेदनामुळे पाच दिवसानंतर समोर आली घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- येथील राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीचा रविवाी(दि. 18) मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत्यूचे कारण समोर आले नव्हते, मात्र शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरात अंतर्गत जखमा तसेच शॉक दिल्याचे समोर आल्यामुळे राजापेठ पोलिसांनी तपास केला. दारूड्या पतीकडून वारंवार होणारा त्रास असह्य झाल्यामुळे मृतकाच्या पत्नीनेच भाऊ आणि आईच्या मदतीने पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी(दि.23) सकाळी समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिघांना अटक केली आहे. 
 
नरेंद्र कॉलनीतील रहिवासी सुधीर श्रीराम गायगोले असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी नम्रता सुधीर गायगोले (35), योगेश दलपतराव वानखडे (32) आणि व्दारकाबाई दलपतराव वानखडे (62) यांना अटक केली आहे. सुधीर गायगोलेंचे मुळ गाव मोर्शी तालुक्यातील तळेगाव दाभेरी असून मागील अनेक वर्षांपासून सुधीर त्याच्या पत्नी व तीन मुलांसह नरेंद्र कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. 18 ऑगस्टला सायंकाळी सुधीरचा मृत्यू झाल्याचे समोर आले, त्यावेळी नम्रताने असे सांगितले कि, सकाळी दहा वाजताच्या सुमारास सुधीरने प्रकृती ठिक नसल्याचे सांगितले व झोपी गेला. सायंकाळी चार वाजता उठवले मात्र तो उठत नसल्यामुळे भाऊ योगेशच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले, त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच तो प्रचंड मद्यपी होता. त्यादिवशीही त्याने मद्य घेतले होते.या माहीतीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. 
 
दरम्यान सुधीरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले व पोलिसांना प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये सुधीरच्या दोन्ही हाताला इलेक्ट्रीक शॉक तसेच शरीरात चार ठिकाणी हाडं फ्रॅक्चर असल्याचे पुढे आले. तसेच शरीरावर काठीने मारल्यासारखे व्रणही दिसत असल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्या आधारे पोलिसांनी मागील दोन दिवसांपासून पत्नी नम्रताची चौकशी सुरू केली मात्र ती काही सांगायला तयार नव्हती. इतकेच नाही तर हिंदी चित्रपट दृष्यम प्रमाणे सुधीरचे मुलेही आम्हाला काही माहीती नाही, आम्ही मित्रांकडे खेळायला गेलो, इतकेच बोलत होते. मात्र हा खून असल्याच्या निष्कर्षावर पोलिस पोचले होते.
 
अखेर गुरुवारी रात्री पोलिसांना नम्रता, योगेश व द्वारकाबाई यांच्याकडून सत्य जाणून घेण्यात पोलिसांना यश आले. घटनेच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून सुधीर हा योगेशच्या लाँड्रीच्या दुकानात बसला होता. दरम्यान नऊ वाजता योगेशने सुधीरला घरी जावून जेवण करा आणि कामावर जाण्यासाठी सांगितले होते. मात्र तो नेहमीप्रमाणे दारू पिवून घरी आला आणि पत्नी नम्रतासोबत भांडायला लागला. दारू पिऊन तो वारंवार नम्रता व कुटुंबियांना त्रास देत होता. सततच्या त्रासामुळे नम्रता व कुटुंबीय त्याला त्रस्त झाले होते. रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास नम्रताने भाऊ योगेशला घरी बोलवले. त्यानंतर नम्रता, योगेश आणि तीची आई द्वारका यांनी सुधीरचे हात बांधले, त्याच्या दोन्ही हाताच्या बोटांना शॉक दिला तसेच काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला काही वेळ घरातच ठेवले व नंतर त्याला रुग्णालयात नेले, त्यावेळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान हा घटनाक्रम पुढे आल्यामुळे तिघांनाही शुक्रवारी अटक केली आहे. अशी माहीती राजापेठचे ठाणेदार अशोक लांडे यांनी दिली. नम्रता व सुधीर यांना 14 वर्षाचा मुलगा आर्यन, 12 वर्षीय मुलगी पल्लवी आणि 8 वर्षांचा मुलगा असे तीन अपत्य आहे. 
 

असा लागला पोलिसांना छडा
मारेकऱ्यांनी अतिशय नियोजनबद्ध कट रचून हा खून केला. दृष्यम चित्रपटाप्रमाणे मुलांना पोलिस विचारतील, असे त्यांना माहीती होते, पोलिसांनी मुलांकडूनही माहीती घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना माहीती मिळाली नाही. मात्र घटनेच्या दिवशी योगेशकडे एक महीला आली होती. या महीलेच्या घरचे कपडे प्रेससाठी योगेशच्या लाँड्रीमध्ये आले होते, ते तीला पाहीजे असल्यामुळे ती योगेशकडे आली, त्यावेळी योगेशने त्या महिलेला दुकानाची चाबी दिली आणि सांगितले कि, दुकान उघडून तुमचे कपडे घेवून जा, तसेच चाबी तुमच्याचकडे राहू द्या, मी आता बाहेरगावी जात आहे आणि कधी परतणार ते सांगता येणार नाही. दरम्यान तपास सुरुच असताना पोलिसांना ही महिला मिळाली. योगेशने रविवारी आपल्याला असे सांगितल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा निश्चित झाली आणि खूनाचे बिंग फुटले.