आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती पत्नीचा खून करून त्याने बाेलावली रुग्णवाहिका, दोन वर्षांची मुलगी झाली पोरकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - चार महिन्यांची गरोदर असलेल्या पत्नीस दारुड्या पतीने टिकावाच्या दांड्याने मारहाण करीत गळा दाबून खून केला. नंतर  पत्नीस बाळंतपणासाठी घेऊन जायचे आहे, असे सांगून रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यावर मात्र हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात आले. ही धक्कादायक घटना केज तालुक्यातील बनसारोळा येथे रविवारी (दि. १०) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. काजल ज्ञानेश्वर गोरेमाळी (२७) असे मृत विवाहितेचे नाव आहे.  

 
बनसारोळा येथील ज्ञानेश्वर उगम गोरेमाळी हा शेतमजुरी करतो. तीन वर्षापूर्वी ज्ञानेश्वरचा विवाह मोहा (ता. कळंब) येथील काजल हिच्यासोबत झाला होता. विवाहानंतर त्यांना एक मुलगी झाली.  काजल ही दुसऱ्यांदा गरोदर होती.  ज्ञानेश्वरला दारूचे व्यसन जडल्याने तो नेहमी दारूच्या नशेत राहत होता. पत्नीला नेहमी शिवीगाळ आणि मारहाण करीत असे. रविवारी सकाळी दारू प्यायलेल्या ज्ञानेश्वरने काजलला दिवसभरात अनेक वेळा टिकावाच्या दांड्याने मारहाण केली.  रात्री ९.३० वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने  काजल  पाणी भरण्यासाठी निघाली असता ज्ञानेश्वरने पुन्हा टिकावाच्या दांड्याने अंगावर आणि डोक्यात मारहाण करीत तिचा गळा दाबून खून केला.  


काजल  मृत झाल्याचे पाहून घाबरलेल्या ज्ञानेश्वरने १०८ या क्रमांकावर फोन करून पत्नीस बाळंतपणासाठी घेऊन जायचे आहे असे सांगून रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका आल्यानंतर डाॅक्टरांनी तपासणी केली असता काजल मृत आढळून आली. डाॅक्टरांनी ही माहिती युसूफवडगाव पोलिस ठाण्यात दिली. सहायक पोलिस निरीक्षक आनंद झोटे, फौजदार सुनील अंधारे यांनी रात्री बनसारोळा येथे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. मात्र तोपर्यंत तो फरार झाला.  सोमवारी बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान फरार झालेला ज्ञानेश्वर सोमवारी दुपारी पायी चालत अंबाजोगाईकडे जात असताना पोलिसांनी त्यास अटक केली. 


दोन वर्षांची मुलगी झाली पोरकी 
मृत काजल गोरमाळी हीस आई वडील नसून दोन भाऊ आहेत.  काजलला दोन वर्षांची मुलगी आहे. काजलचा खून झाल्याने ही बालिका पोरकी झाली आहे. तिचा वडील ज्ञानेश्वर गोरमाळी हा पत्नीच्या खुनात  अटकेत आहे. आजी आजोबा वृद्ध असल्याने या दोन वर्षांच्या बालिकेच्या भवितव्याचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...