आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' वाघिणीला वाचवण्यासाठी वन्यजीव प्रेमींनी काढला मोर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- यवतमाळ आणि राळेगाव तालुक्यात गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला मारण्यासाठी खास हैद्राबादहून बोलावलेला शार्प शूटर नवाब शफतअली खान याला परत पाठविण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी िवदर्भातील वन्यजीवप्रेमी संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी महाराजबाग ते संविधान चौक असा मोर्चा काढून वनविभागाच्या धोरणाचा निषेध केला. जेरील बानाईत, पराग दांडगे, आकाश विहीरे, निलेश मेश्राम, राहुल कोठेकर, श्रीराम रसाळ, माधव येरणे, मुकुंद जोशी आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. 


मोर्चा संिवधान चौकात पोहोचल्यावर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये व मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन मागण्या समजून घेतल्या. त्या नंतर एका शिष्टमंडळाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. आपण वनमंत्री तसेच वनविभागाच्या सचिवांशी बोलून तोडगा काढतो, असे मिश्रा यांनी शिष्टमंडळाला सांगितले. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आलेल्या चमूला अत्यल्प वेळ देऊन नवाब शफतअली खानची बडदास्त ठेवली जात आहे. तो रात्रीबेरात्री जंगलात धुडगूस घालीत फिरतो. अशावेळी वाघिणीने परत हल्ला केल्यास जबाबदार कोण राहिल, असा सवाल शिष्टमंडळाने मिश्रा यांना केला. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा हे मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रकरणात जाणीवपूर्वक निर्णय घेण्यास दुर्लक्ष करतात. त्यामुळे नवाब शाफतअली खान याच्या येण्याचा मार्ग मोकळा होतो, असा आरोप वन्यजीव प्रेमींनी निवेदनात केला आहे. एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करून वाघिणीला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...