आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिल्ली’ गेटमधून आम आदमी शहरात येणार का ? ‘दिव्य मराठी'शी खास बातचीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : दिल्ली विधानसभा निवडणूक सलग तिसऱ्यांदा जिंकल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाली असून आता देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यात औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले असून दररोज ७०० लिटर पाणी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आणि २०० युनिट मोफत वीज हे विकासाचे दिल्ली माॅडेल औरंगाबादेतही शक्य असल्याचे पक्षाचे प्रदेश सचिव धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी सांगितले. 

औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. यासाठी शिंदे औरंगाबादेत आले आहेत. केजरीवाल यांच्या कामाची पद्धत, दिल्लीचे विकास मॉडेल यासंदर्भात त्यांच्याशी दिव्य मराठीने चर्चा केली. 

दिल्लीनंतर थेट औरंगाबाद हे लक्ष्य कसे काय ?

दिल्लीच्या विजयानंतर देशभरात पक्षाचा विस्तार करण्याचा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. दिल्ली आणि औरंगाबादची परिस्थिती साधारणपणे सारखीच आहे. म्हणजे येथेही धार्मिक, जातीय ध्रुवीकरण आहे. त्याला जनता कंटाळली आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांनुसार सर्वांना सोबत घेऊन जाणार आहोत.

‘दिल्ली मॉडेल’ काय? 

२०१५ मध्ये ‘आप’ दुसऱ्यांदा सत्तेवर आला त्या वेळी दिल्लीचा अर्थसंकल्प ३० हजार कोटींचा होता, तो आज ६५ हजार कोटींचा आहे. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर महसूलातील गळती थांबवली. शिक्षणावर २६ आणि आरोग्यावर १३ टक्क्यांची तरतूद करणारे दिल्ली हे एकमेव राज्य आहे. 

लोकांना आता झेंडा नको, अजेंडा हवा 

गेली ३७ वर्षे शहरात जातीय, धार्मिक ध्रुवीकरणावरच मनपाची सत्ता मिळवली जाते आहे. पण शहराचा विकास कुठे झालाय? लोक याला कंटाळले आहेत. त्यांना आता झेंडा नकोय, विकासाचा अजेंडा हवा आहे, अशा शब्दांत शहराध्यक्ष व सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ.सुभाष माने यांनी आपची भूमिका विशद केली. सेवानिवृत्तीनंतर जनतेच्या, शहराच्या समस्या सोडवण्याचा निश्चय केला. आतापर्यंत १०६ जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. वाॅर्डात जर चार इच्छुक असतील तर आम्ही लोकांना त्यांच्यासमोर उभे करून त्यांच्या मागणीनुसारच उमेदवार निवडणार आहोत. विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत.

‘औरंगाबाद डायलॉग’मधून जाहीरनामा 

दिल्लीच्या धर्तीवर ‘औरंगाबाद डायलॉग’ हा उपक्रम राबवून आम्ही जनतेला विचारूनच प्रत्येक वाॅर्ड आणि शहराचा जाहीरनामा तयार करणार आहोत, असे आपचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा मनपा निवडणूक प्रभारी अजिंक्य शिंदे यांनी सांगितले. पुण्यातील एका बहुराष्ट्रीय कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून सन २०१६ पासून अजिंक्य शिंदे यांनी या पक्षाच्या कामाला वाहून घेतले आहे. येत्या ४ मार्चपासून शहरात घरोघरी जाऊन प्रचार करणार असल्याचे सांगून ते म्हणाले, मनपा निवडणुकीसाठी स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देण्यावर आमचा भर आहे. त्याचप्रमाणे जनतेच्या मनात काय आहे त्यानुसारच पक्षाचा जाहीरनामा तयार केला जाणार आहे.

मोफत वीज, पाणी, आरोग्य सुविधांचे रहस्य काय ?

केजरीवाल सरकारने सर्वप्रथम टँकर लॉबी मोडीत काढली. नवीन पाइपलाइन टाकली. त्यामुळे दिल्ली येथील प्रत्येक घरात दररोज ७०० लिटर व महिन्याला २० हजार लिटर पाणी मोफत दिले जाते. २०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येते. त्यावरील वापरास निर्धारित दराप्रमाणे पैसे भरावे लागतात. आरोग्य केंद्राचा कायापालट करून प्रत्येक ठिकाणी मोहल्ला क्लिनिकची संकल्पना राबवली.
 
यात २०० वैद्यकीय चाचण्या मोफत दिल्या जातात. महिलांसाठी बस, मेट्रोसेवा मोफत दिली जाते. यासाठी निधी उभारण्याचे काम सत्तेवर आल्यानंतर केले होते. थकबाकीदारांना सुमारे ७० टक्के सवलत देऊन मालमत्ता कराची वसुली केली. त्यामुळे तिजोरीत पैसा आला. हा जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठी वापरला. एकूणच यामुळे दिल्लीचा विकास झाला.

औरंगाबादकरांनी तुम्हाला मते का द्यावीत ? 

दिल्लीचे हे विकासाचे मॉडेल औरंगाबादेत राबवणे अशक्य नाही. मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली वाढवण्यासाठी करप्रणाली सुटसुटीत केल्यास हे शक्य होईल. औरंगाबादेत आप सत्तेवर आल्यास आठवडाभर दररोज पाणी, मनपाच्या शाळांचा दर्जा वाढवणार, शहराला भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल. आरोग्य सुविधांचा प्रश्न आहे. त्यासाठीच आम्ही स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार तसेच डाॅक्टर, वकील, शिक्षक यांना उमेदवारी देणार आहोत.