आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघांच्या स्थलांतरणाची शक्यता तपासून पाहणार; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- वाघांची संख्या वाढत असताना व्याघ्र प्रकल्पांच्या लगत वाघ आणि मानव संघर्षाच्या घटना देखील वाढत अाहेत. त्यावर उपाय म्हणून वाघांची संख्या फारच जास्त असलेल्या वनक्षेत्रातून काही वाघ स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर वन विभागात विचार सुरु असून या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती नेमण्यात आली असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिव्य मराठी शी बोलताना दिली. 


राज्याचे वन विभागाचे प्रमुख असलेले प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांच्या नेतृत्वात ही समिती नेमण्यात आली अाहे. या समितीत वन्यजीव विंगचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली क्षेत्रातील मुख्य वनसंरक्षक, ताडोबा, मेळघाट, पेंच व्याघ्र प्रकल्पांच्या संचालकांसह राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. 


मुनगंटीवार यांनी सांगितले की, एका वाघाचे क्षेत्र किमान दोनशे ते सव्वादोनशे चौरस किलो मीटरचे असते. अशात संख्या वाढल्यास ते एकमेकांच्या क्षेत्रात येतात. त्यातून वाघांमध्ये संघर्ष निर्माण होते. या संघर्षातून कमजोर वाघ शिकार सहज उपलब्ध होण्यासाठी मानवी वस्त्या असलेल्या क्षेत्राच्या आसपास वास्तव्य करतो. या वस्त्यांमध्ये पाळीव जनावरे हे त्याचे सहज उपलब्ध होणारे भक्ष्य ठरते. त्यातून माणसांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडतात. विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होऊन अनेक आमदारांवर यावर उपाययोजना करण्याचे आवाहन वन विभागाला केले होते. त्यामुळेच काही प्रमाणात वाघांच्या स्थलांतराचा विचार पुढे आला. वन विभागाची समिती याचा सर्वच अंगाने अभ्यास करून तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतरच या प्रस्तावावर निर्णय होऊ शकतो. 


यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तूर्तास चंद्रपूर जिल्हा आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरातील वन्यप्राणी-मानव संघर्ष गंभीर असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वाघांच्या स्थलांतराचा विचार सुरु केला असला तरी तो प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व आसपासच्या क्षेत्रापुरता मर्यादित ठेवण्यात आला असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे गाभा क्षेत्र व बफर क्षेत्रात वाघांची संख्या किमान शंभरच्या आसपास सांगितली जाते. ब्रह्मपुरी वनक्षेत्र हे वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांनी सर्वाधिक प्रभावित असल्याचे मानले जाते. 


स्थलांतरण व्यवहार्य नाही 
ताडोबा परिसरातील संख्या लक्षात घेता तेथील वाघांचे काही प्रमाणात स्थलांतरण शक्य होईल. या वाघांना नवे क्षेत्र उपलब्ध करणे विदर्भात शक्य नाही. स्थलांतरण हा व्यवहार्य उपाय नाही. काही वाघ स्थलांतरित केले तरी त्यांची जागा दुसरे वाघ घेतील. त्याचा उपयोग काय? वन विभागाकडून अशा क्षेत्राचे योग्य व्यवस्थापनच हवे. गावकऱ्यांत जागृती हवी. 
- किशोर रिठे, संचालक, सातपुडा फाउंडेशन.

बातम्या आणखी आहेत...