आंबेडकर-राष्ट्रवादी यांच्यात दुवा / आंबेडकर-राष्ट्रवादी यांच्यात दुवा बनणार छगन भुजबळ; मुंबईत अॅड. आंबेडकर आणि भुजबळांत दीड तास बंदद्वार चर्चा

विशेष प्रतिनिधी

Jan 10,2019 09:19:00 AM IST

नाशिक/मुंबई- भाजपविरोध हा सामायिक मुद्दा असला तरी राष्ट्रवादीसोबतचे वैर या समस्येवर मार्ग काढण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीतील 'बहुजन' चेहरा मानले गेलेले छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी बुधवारी वांद्रे येथील एमईटी संस्थेत छगन भुजबळांची भेट घेतली. त्यांच्यात सुमारे दीड तास बंदद्वार चर्चा झाली. या वेळी समीर भुजबळ हेसुद्धा उपस्थित होते.

'शारीरिक तब्येती'च्या चौकशीच्या नावाने झालेल्या या बैठकीत चर्चा मात्र 'राजकीय तब्येती'चीच झाल्याचे कळते. छगन भुजबळांनी अॅड. आंबेडकरांपुढे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दलित, वंचित, भटके-विमुक्त, आदिवासी यांच्यासह अलुतेदार आणि बलुतेदारांना सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी अॅड. आंबेडकरांनी या वेळी बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीला १२ जागा मिळाव्यात, या मागणीमुळे महाआघाडीतील अॅड. आंबेडकरांचा प्रवेश फिस्कटला. महाआघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादीसोबत तर त्यांचे कठोर वैर असल्याने तेेथील शक्यताही दुरावल्या आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सांगलीमध्ये झालेल्या जाहीर सभेत अॅड. आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साखरसम्राटांवर जोरदार लक्ष्य केले. त्यामुळे बंद झालेल्या महाआघाडीची द्वारे भुजबळांच्या 'बहुजनवादी' झरोक्यातून किलकिली करण्याचा प्रयत्न अॅड. आंबेडकरांनी केला आहे. सवर्णंना १० टक्के आरक्षण दिल्यामुळे ओबीसी व दलित नेते चिंतेत आहेत, ही गोष्ट आंबेडकर यांना अधोरेखीत करायची होती. म्हणूनच ते भुजबळांना स्वत:हून भेटल्याचे काँग्रेसचे नेते खासगीत सांगत आहेत.

एकत्र कसे येणार हे छगन भुजबळच सांगू शकतील
देशात पुन्हा भाजपची सत्ता येऊ नये या दृष्टीने आम्ही चर्चा केली. त्यासाठी मतांचे विभाजन होऊ नये, हे खरे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करीत आहे. देशातील अलुतेदार, बलुतेदार यांना सत्तेपर्यंत पोहोचवण्याची आमची भूमिका छगन भुजबळ यांनाही पटली आहे. त्यामुळे त्यासाठी एकत्र कसे पुढे जाता येईल, हे भुजबळच सांगू शकतील. -अॅड. प्रकाश आंबेडकर, संस्थापक, दलित वंचित बहुजन आघाडी

मतविभाजन टाळण्यासाठी सोबत येण्याचे सुचवले
सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आंबेडकर यांनी मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत येण्याचे मी सुचवले आहे. प्रयत्न सुरू आहेत. राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते. माझ्या तब्येतीच्या चौकशीसाठी ते भेटण्यासाठी आले होते. आम्ही देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. - छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

X
COMMENT