आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांसह स्वकीयांचा चक्रव्यूह सीएमचे पीए अभिमन्यू भेदणार का?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बसवराज पाटील, काँग्रेस आणि अभिमन्यू पवार, भाजप - Divya Marathi
बसवराज पाटील, काँग्रेस आणि अभिमन्यू पवार, भाजप

मंदार जोशी 

औसा (लातूर) - लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार आणि १० वर्षांपासून आमदार व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्यात चुरशीचा सामना होत आहे. एकीकडे काँग्रेसने आपले भरवशाचे बसवराज अस्त्र वापरले आहे, तर दुसरीकडे, अभिमन्यू पवार विरोधक आणि स्वकीयांच्या चक्रव्यूहात खिंड लढवताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्याचे पीए अभिमन्यू पवार गेल्या ५ वर्षांत लातूरच्या राजकारणात अधिक सक्रिय झाले होते. त्यांना यंदा थेट औशाची उमेदवारीही मिळाली. अभिमन्यू म्हणाले, हा मतदारसंघ संघाच्या विचारधारेचा आहे. माझा जन्म औशात झाला. माझे आजोळ, सासुरवाडी, वडिलांची आणि माझी कर्मभूमीही औसाच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या वाट्याचा हा मतदारसंघ या वेळी आग्रहाने भाजपसाठी घेतला आहे. यामुळे इथली लढत आता मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. दुसरीकडे, काँग्रेसही येथे मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी आपले बळ पणास लावत आहे.


पवारांचा असा आला मुख्यमंत्र्यांशी संब
ंध 
पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी स्वीय सहायक म्हणून एका कार्यकर्त्याला सोबत घ्यायचे, अशी भाजपत पद्धत आहे. २००६ मध्ये शिबिरात माझी आणि मुख्यमंत्र्यांची ओळख झाली. त्या नंतर मी पक्षकार्यात सक्रिय झालो. २०१४ पासून त्यांचा स्वीय सहायक म्हणून जबाबदारी सांभाळली. केवळ समन्वयापुरते मर्यादित न राहता मी औसा आणि लातूर जिल्ह्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी आणला. अनेक कामांना सुरुवात केली. यामुळे लोकांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला. आता त्याच बळावर येथून निवडणूक लढवत आहे.
 

काँग्रेस पक्षाची अस्तित्वाची लढाई 
मराठवाड्यात लातूर जिल्ह्याने काँग्रेसचे अस्तित्व जपले आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेतही ते अबाधित होते. अर्थातच या मागे विलासराव देशमुख यांची पुण्याई आहे. या वेळी मात्र काँग्रेसला निकराचा लढा द्यावा लागण्यची चिन्हे आहेत. त्यामुळे काँग्रेसने बसवराज अस्त्र आहेर काढले आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते लातूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी औशातील सभेत महाराष्ट्राच्या रक्तात काँग्रेस आहे आणि औशातील पाटील हे शब्द पाळणारे नेते आहेत, अशा शब्दांत बसवराज यांचे कौतुक केले होते. 
 

शिवसेनेची नाराजी, निलंगेकरही असंतुष्ट 
यंदा हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने शिवसेनेचे माजी आमदार व दोन निवडणुकांत दुसऱ्या स्थानी राहिलेले दिनकर माने नाराज झाले होते. त्यांची नाराजी काही प्रमाणात दूर करण्यात पवार यशस्वी झाले आहेत. मात्र, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही पवारांसमोर आव्हान उभे केले आहे. भूमिपुत्र अशी ओळख सांगत बजरंग जाधव हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. संभाजी पाटील यांचे भाऊ अरविंद पाटील हे त्यांचा उघड प्रचार करत असल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगतात. 

बसवराज यांचा या मुद्द्यांवर प्रचार
किल्लारी साखर कारखाना, शिवरायांचा अश्वारूढ भव्य पुतळा, बंधारे उभारणे, भूकंपाच्या काही महिन्यांत आम्ही पुन्हा गुढी कशी उभारली हा भावनिक मुद्दा घेऊन बसवराज पाटील प्रचारात उतरले आहेत. सहायक हा सहायकच असतो. फक्त निधीची घोषणा करून कामे होत नाही. या फसव्या घोषणा आहेत, असा ते करत आहेत. ज्यांनी विकास केला, जे लातूरसाठी धडपड करतात अशाच लोकांना निवडून द्या; विलासरावांचे स्वप्न पूर्ण करा, असे म्हणत पाटील यांनी ही लढाई अस्तित्वाची केली आहे. 
 

काँग्रेसची लिंगायत समाजाच्या मतांवर मदार 
अभिमन्यू पवारांविरुद्ध काँग्रेसने लिंगायत अस्त्र वापरण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ६ मतदारसंघांत आघाडी आणि युतीने दिलेल्या उमेदवारांपैकी बसवराज पाटील हे एकमेव लिंगायत समाजाचे उमेदवार आहेत. येथे लिंगायत समाजाचे मतदान निर्णायक आहे. उस्मानाबाद आणि नांदेडमध्येही लिंगायत मतदारांची संख्या दखलपात्र आहे. त्यामुळे किमान एक लिंगायत तरी विधानसभेत पाठवा, असे भावनिक आवाहन जिल्ह्यात होताना दिसते आहे.