आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नऊ डिसेंबरपूर्वी फेरविचार याचिका दाखल करणार : एआयएमपीएलबी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ : अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आम्ही ९ डिसेंबरपूर्वी फेरविचार याचिका दाखल करू, अशी माहिती अखिल भारतीय मुस्लिम वैयक्तिक कायदे मंडळाचे (एआयएमपीएलबी) सचिव जफरयाब जिलानी यांनी बुधवारी दिली. फेरविचार याचिका दाखल करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम असून, त्यासाठी आमच्याकडे ९ डिसेंबरपर्यंतचा कालावधी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अयोध्या प्रकरणात फेरविचार याचिका दाखल करायची नाही, असा निर्णय यातील मुख्य पक्षकार सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाने मंगळवारी घेतला होता. मात्र, मशिदीसाठी सरकारकडून पर्यायी पाच एकर जागा घ्यायची की नाही याबाबत मंडळाचा निर्णय व्हायचा आहे. त्या पृष्ठभूमीवर वृत्तसंस्थेशी संवाद साधताना जिलानी म्हणाले की, 'सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाच्या निर्णयाचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही यासंदर्भात १७ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय घेतलेला आहे.' एआयएमपीएलबीने यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, 'आम्ही आमचा घटनात्मक अधिकार वापरणार आहोत. बाबरी मशीद प्रकरणात आम्ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फेरविचार याचिका दाखल करणार आहोत. फेरविचार याचिका दाखल न करण्याच्या सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाच्या निर्णयाचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. याचिका कोणातर्फे दाखल करायची याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. त्यामुळे याचिका कधी दाखल करण्यात येईल हे आताच सांगता येणार नाही.'

ज्या मुस्लिम संघटना फेरविचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे त्यांना अयोध्येतील पोलिस त्रास देत आहेत, असा आरोपही जिलानी यांनी केला. जिलानी म्हणाले की, फेरविचार याचिका दाखल केल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि तुरुंगात डांबले जाईल, अशी धमकी पोलिस मुस्लिम संघटनांना देत आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेत पोलिसांच्या या वर्तणुकीचा उल्लेख केला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला अयोध्याप्रकरणी निकाल दिला होता. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला होता. वादग्रस्त जागा रामलल्ला विराजमान यांना द्यावी आणि मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ मंडळाला पर्यायी पाच एकर जागा द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते.

... तर आम्हाला पाच एकर जागा द्या : शिया वक्फ मंडळ

सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाने मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा प्रस्ताव फेटाळून लावल्यास आम्हाला पाच एकर जागा द्यावी अशी मागणी आम्ही सरकारकडे करू, अशी माहिती उत्तर प्रदेश शिया केंद्रीय वक्फ मंडळाने बुधवारी दिली. मात्र, या जागेचा वापर आम्ही रुग्णालय बांधण्यासाठी करू; मशिदीसाठी नाही, असे शिया वक्फ मंडळाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी स्पष्ट केले. मंडळ यासंदर्भात न्यायालयाशी संपर्क साधणार नाही तर आम्ही सरकारकडे जमिनीसाठी विनंती करू, असेही त्यांनी सांगितले. रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन खटल्यातील प्रमुख पक्षकार सुन्नी वक्फ मंडळाने अद्याप ही पाच एकर जागा घ्यायची की नाही याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. या खटल्यात वादग्रस्त जागेवर शिया वक्फ मंडळाने केलेला दावा पाच सदस्यांच्या घटनापीठाने फेटाळून लावला होता. वादग्रस्त २.७७ एकर जागेवर ट्रस्टमार्फत मंदिर बांधण्यात यावे आणि मशिदीसाठी अयोध्येतच पर्यायी पाच एकर जागा द्यावी, असेही निकालात म्हटले होते.