Political / आंबेडकरांचा पुनरुच्चार : काँग्रेसला ४० जागाच देणार; मान्य असतील तरच आघाडी

विधानसभेला वंचित आघाडी, एमआयएम एकत्रच; काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

दिव्य मराठी

Jul 16,2019 09:06:00 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएम एकत्र होते. त्याप्रमाणेच राज्यातील आगामी विधानसभेलाही बरोबर असतील. मात्र, कोणी किती जागा लढवायच्या याची निश्चिती अद्याप झालेली नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस पक्षाला विधानसभेसाठी आपण ४० पेक्षा अधिक एकही जागा देऊ शकत नाही. हा प्रस्ताव त्यांना मंजूर असेल तर काँग्रेसशी आघाडी होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एमआयएम विधानसभेला १०० जागा लढवणार आहे, अशी चर्चा असली तरी अद्याप तसे ठरलेले नाही. माझी व खासदार असदुद्दीन ओवेसी यांची दिल्लीत बैठक झाली. त्यात उमेदवार जिंकण्याच्या शक्यता हा निकष लावून जागावाटप करायचे ठरले आहे. ईव्हीएममधील गोंधळासंदर्भात वंचित बहुजन आघाडीने नागपूर, मुंबई व औरंगाबाद उच्च न्यायालयात एकूण ३१ याचिका दाखल केल्या असल्याचे ते म्हणाले. ईव्हीएममधील मतदान व प्रत्यक्ष झालेले मतदान यांचा मेळ बसला पाहिजे. तो बसत नसल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱी विजयी उमेदवार घोषित करू शकत नाही. असा निवडणूक आयोगाचा कायदा आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या नियमाला बगल देण्यात आली. त्यासंदर्भातच याचिका दाखल केलेल्या आहेत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.


काँग्रेसचा कित्ता भाजप गिरवत आहे
काँग्रेस पक्ष ईव्हीएमविरोधात आंदोलन करत नाही. कदाचित त्यांना ईडी, सीबीआय, आयकर विभाग किंवा आयबीचा विंचू चावला असावा, अशी टीका आंबेडकर यांनी केली. पूर्वी काँग्रेसने घाेडेबाजार करत राज्यात सत्ता आणली. तोच कित्ता आज भाजप गिरवत आहे. उलट काँग्रेसची तीन राज्यांतील सत्ता पाडण्यात भाजप विलंब लावत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी रविवारीच वंचित आघाडी, राज ठाकरे यांचा मनसे या पक्षाने समविचारी पक्षासाेबत येण्याचे आवाहन केले होते. आता प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष असेल.

ईव्हीएममध्ये घाेळ, तरीही मतपत्रिका नकाेच
राज्यातील ३१ आणि देशातील ३४३ लोकसभा मतदारसंघांत झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मतदानांचा ताळमेळ बसत नसल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. मात्र, मतपत्रिकेवर विधानसभा निवडणुक घ्यावी, अशी मागणी आपण करणार नाही, असे ते म्हणाले. आपण न्यायालयास भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात याचिकेच्या माध्यमातून विचारणा करत आहोत. ईव्हीएमध्ये गडबड करता येत नाही, असे न्यायालयाने आश्वस्त केले होते. त्यावर विश्वास ठेवून ईव्हीएमविरोधातली आंदोलने बंद झाली. त्यामुळे आता न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही, तर न्यायसंस्थेची विश्वासार्हता संपुष्टात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

X