Home | Maharashtra | Mumbai | Will give Lok Sabha candidates against Sharad Pawar: Prakash Abmedkar

शरद पवारांविरोधात लोकसभेला उमेदवार देणार : अॅड. आंबेडकर; भारिप, राष्ट्रवादींचे एकमेकांवर टीकास्त्र

प्रतिनिधी | Update - Feb 11, 2019, 08:09 AM IST

काँग्रेसशी निवडणुकीनंतर आघाडी होऊ शकते 

 • Will give Lok Sabha candidates against Sharad Pawar: Prakash Abmedkar

  मुंबई- वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली नाही तर लोकसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात उमेदवार देऊ, असा इशारा भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. पवार यांच्या माढ्यातून पुन्हा लोकसभा लढवण्याच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले. तर, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातल्या लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्याच्या वक्तव्य केले. मात्र, त्यांनी किमान ४० जागांची मतमोजणी व्हीव्हीपॅटने करावी, असे आव्हानही आंबेडकर यांनी दिले आहे.

  ते मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मुंबईतल्या शिवाजी पार्कवर २३ फेब्रुवारी रोजी ओबीसी परिषद आयोजित केली आहे. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निश्चित होतील. काँग्रेसला संघाशी लढायचे नसल्यास आम्ही आमच्या स्वतंत्र वाटेने जायला मोकळे आहोत. आमच्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे काँग्रेसने लवकरात लवकर संघाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व आघाडी झाली नाही तरी निवडणुकीनंतर आघाडी होऊ शकते, असेही आंबेडकरांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसंदर्भातली चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्द्यावर अडली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास संघाला घटनात्मक चौकटीत आणण्यासाठी काय उपाययोजना करणार, ते काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे. त्याशिवाय काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, याचा पुनरुच्चारही आंबेडकर यांनी केला.

  बारामती वाराणसीच्या पुढे गेली : सुळे
  राष्ट्रीय वयोश्री योजनेत बारामती लोकसभा मतदारसंघाने देशात सर्वप्रथम स्थान मिळवले आहे. बारामती वाराणसीच्या पुढे गेली आहे, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केले. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणूूकीत बारामतीमधून भाजप जिंकणार, असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी हा उपरोधिक टोला हाणल्याचे समजते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाक््युद्ध सुरू झाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तुमचा उमेदवार कोण, मोदी, शहा की देवेंद्र', असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे.

  आधी पदे सोडा, मग पवारांचा प्रचार: देशमुख
  माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार हे लढण्याची तयारी करीत आहेत. अनेक पक्षांत त्यांचे समर्थक असून सोलापूर जिल्ह्यात तर पवारप्रेमींची संख्या खूपच आहे. यातील अनेकजण महायुतीची सत्ता राज्यात व केंद्रात आल्यानंतर भाजपचे सहयोगी झाले. त्यांची पवारांच्या माढ्यातील एंन्ट्रीमुळे पुन्हा गोची होऊ शकते, त्यामुळे त्यांनी भाजपच्या जीवावर मिळवलेली पदे सोडावीत आणि खुशाल पवारांचा प्रचार करावा, असा टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लगावला आहे. दरम्यान, पक्षाने आपल्याला माढ्यातून लोकसभेला उभे राहण्यास सांगितल्यास मी तयार आहे. या निवडणूकीत विरोधात कुणीही असले तरी मी लढेन, असेही देशमुख म्हणाले.

Trending