आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हाेणार हंगामी अध्यक्ष ?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : १४ व्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते व सध्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याच नावावर देवेंद्र फडणवीस- अजित पवार सरकारकडून पिवळी पट्टी (शिफारस) लागणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

आमदारांना शपथ देणे व अध्यक्षांची निवड प्रक्रिया यासाठी हंगामी अध्यक्ष निवडला जातो. त्यासाठी सरकार तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवत असते. फडणवीस- पवार सरकारने विशेष अधिवेशन कधी बोलवायचे याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र, विधिमंडळ सचिवालयाने हंगामी अध्यक्ष निवडीसाठी ज्येष्ठ सदस्यांची १० नावे राज्यपाल व संसदीय कार्य विभागाला पाठवली आहेत. यात १० नावांमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (८ वेळा अामदार), के. सी. पाडवी (७ वेळा), राष्ट्रवादीचे जयंत पाटील (७ वेळा), दिलीप वळसे पाटील (७ वेळा) आणि छगन भुजबळ (६ वेळा) यांचा समावेश अाहे. भाजपचे बबनराव पाचपुते (७ वेळा), कालिदास कोळंबकर (७ वेळा), हरिभाऊ बागडे (६ वेळा) आणि राधाकृष्ण विखे पाटील (६ वेळा) यांच्या नावांचा समावेश आहे. संसदीय कार्य विभाग १० अनुभवी सदस्यांची यादी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवतात. मुख्यमंत्री यातील ४ ते ६ नावे निवडतात आणि त्यातील एका नावावर शिफारशीची पिवळी पट्टी लावून ती राज्यपालांकडे पाठवली जाईल. राज्यपाल हे सरकारच्या शिफारशीवर हंगामी अध्यक्ष नियुक्त करतात. २०१४ मध्ये हंगामी अध्यक्ष म्हणून 'माकप'च्या जिवा पांडु गावीत यांनी काम पाहिले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली बागडेंची अध्यक्षपदी निवड झाली हाेती.

बहुमताचे गणित जुळवून अाणण्यासाठी भाजपची खेळी


१. सत्ता स्थापनेचा वाद सर्वाेच्च न्यायालयात पोचला आहे. महाविकास आघाडीच्या वकिलांनी हंगामी अध्यक्षांच्या निगराणीखाली बहुमत सिद्ध करावे, अशी भूमिका घेतली अाहे.
२. हंगामी अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरते. म्हणून सरकार भाजप नेते व ५ वर्षे
अध्यक्षपदाचा अनुभव असलेल्या बागडेंच्या नावाची शिफारस करू शकते.
३. बाळासाहेब थोरात हे आठवेळा विजयी ठरलेले सर्वात अनुभवी सदस्य आहेत. मात्र सर्वात अनुभवी व ज्येष्ठ व्यक्तीला हंगामी अध्यक्ष करावे, असा नियम नाही तर तो संकेत आहे.