आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर मनपा भाजपकडेच राहणार का?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर : अडीच वर्षांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत शून्याहून थेट सत्तेत आलेली भाजप अाता अंतर्गत मतभेदांमुळे संभ्रमित झाली आहे. नगरसेवकांमधील उलटसुलट चर्चेमुळे संभ्रमात भरच पडली असून लातूरचे महापौरपद भाजपकडेच राहणार की सत्तांतर होऊन काँग्रेस वरचढ ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


लातूर मनपाची अडीच वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. नगर पालिकेचे मनपात रूपांतर झाले तरी तेथे काँग्रेसची अभेद्य सत्ता राहिली. मात्र पाच वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर होऊन भाजपचे सरकार बनले. त्यानंतर पालकमंत्री बनलेल्या संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वात भाजपने मुसंडी मारत ७० पैकी ३६ जागा पटकावत बहुमत मिळवले. सत्तेतून पदच्युत व्हावे लागलेल्या काँग्रेसला ३३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. इतिहासात पहिल्यांदाच लातूर मनपावरचा काँग्रेसचा झेंडा खाली उतरला. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्यामुळे लातूरकरांनी मनपाच्या चाव्या भाजपकडे दिल्या. मात्र या दोन्ही सत्तांचा मनपातील भाजपच्या कारभाऱ्यांना योग्य वापर करून घेता आला नाही. त्यामुळे आजघडीला दिवाळखोरीच्या दिशेने लातूर मनपाचा कारभार सुरू आहे. भाजपत जुने आणि नवे असा वाद सुरू झाल्यामुळे मनपातील भाजप नगरसेवकांची अडीच वर्षे संघर्षातच गेली. भाजपने काँग्रेसमधून आलेल्या सुरेश पवारांना महापौरपद दिले. परंतु त्यांना आपल्या कामातून छाप पाडता आली नाही. कचरा, पाणी, स्वच्छता, करांची वसुली अशा सर्वच आघाड्यांवर मनपातील कारभारी सपशेल अपयशी ठरले. त्यातच लातूर भाजपत संभाजी निलंगेकरांना अाव्हान देऊ शकणारे अभिमन्यू पवार यांच्या रूपाने नवीन नेतृत्व गेल्या वर्षभरात पद्धतशीरपणे पुढे आणण्यात आले. मनपातील नगरसेवकांत यामुळे फूट पडल्याचे चित्र आहे. त्यातच आता महापौर आमचाच असे म्हणत दोन्ही गटांनी शड्डू ठोकला असून खासगीत आमचा नाही तर मग त्यांचाही नाही, अशी भूमिका घेणार असल्याची नगरसेवकांत चर्चा आहे. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.


दुसरीकडे पहिल्यांदाच विरोधी पक्षात बसावे लागल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांतही अस्वस्थता आहे. येत्या दोन दिवसांत विद्यमान महापौरांचा कालावधी संपणार असून त्यानंतर आठ दिवसांत नव्या महापौरांची निवड होणार आहे. या निवडीच्या वेळी काहीही करून भाजपतील अंतर्गत संघर्षाचा फायदा उचलायचा आणि पुन्हा एकदा मनपा ताब्यात घ्यायची असे मनसुबे काँग्रेसच्या गोटात रचले जात आहेत. काहीही करून पुन्हा सत्ता मिळवण्याचा चंगच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे.

असे आहे पक्षीय बलाबल : भाजप- ३५; काँग्रेस- ३३; राष्ट्रवादी-१

राजा मणियारांची भूमिका महत्त्वाची
लातूर मनपात भाजपचे ३५, काँग्रेसचे ३३ आणि राष्ट्रवादीच्या राजा मणियार यांच्या रूपाने केवळ एक जागा निवडून आली होती. त्यातील मणियार यांनी पूर्वी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. परंतु दोन महिन्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत वंचित आघाडीत प्रवेश घेऊन लातूर शहर विधानसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांचे काँग्रेससोबत मतभेद झाले आहेत. तर भाजपला पाठिंबा देण्याची त्यांची मनस्थिती नाही.

महापौर निवडीत काय होऊ शकते?
लातूर मनपात काठावर बहुमत असलेल्या भाजपचे एक नगरसेवक शिवदास गवळी यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे भाजपचे काठावरचे बहुमत गेले असून त्यांना बहुमतापेक्षा एक जागा कमी आहे. त्यातही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि सध्या वंचित आघाडीत गेलेल्या राजा मणियार यांनी जर भाजपविरोधात मतदान केले तरी सत्ताबदल होणार नाही. मात्र भाजप-काँग्रेसने समसमान मते मिळवली तर कायदेशीर तिढा उभा राहू शकतो. त्यातच मनासारखा उमेदवार मिळाला नाही तर भाजपत बंड होऊ शकते. त्यामुळे लातूर मनपात सत्तांतर होणार का, याची उत्कंठा वाढत चालली आहे.