आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा हल्ल्यांमुळे भयभीत, मात्र अाैरंगाबाद साेडून जाणार नाही; उद्योजकांचा निर्धार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 'मराठा क्रांती मोर्चाच्या गुरुवारच्या अांदाेलनादरम्यान वाळूज एमअायडीसीतील सुमारे ६० ते ७० कंपन्यांत झालेली जाळपोळ आणि तोडफोडीमुळे देशाच्या औद्योगिक नकाशावर औरंगाबादची माेठी बदनामी झाली. या घटनेने आम्ही भयभीत झालेलो असलो तरी उमेद सोडली नाही. आम्ही अाैरंगाबाद साेडून कुठेही जाणार नाही. विदेशी कंपन्यांनादेखील धीर देऊ. 


आतापर्यंत आम्ही समाजासाठी काम केले आहे आणि यापुढे करतच राहू,' अशा भावना वाळूजमधील उद्योजकांच्या बैठकीत शुक्रवारी व्यक्त करण्यात अाल्या. 'आमचा कोणत्याही आंदोलनाला विरोध नाही, पण प्रत्येक आंदोलन हे लोकशाही मार्गानेच झाले पाहिजे असा आमचा आग्रह आहे,' असेही हे उद्योजक म्हणाले. 


सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले यांच्या अध्यक्षतेखाली वाळूजमधील उद्योजक आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. प्रचंड भीतीने ग्रासलेलो असलाे तरी हिंमत न हरता फीनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घेण्याचा निर्धार बैठकीत उद्याेजकांनी व्यक्त केला. ‘यापुढे असा प्रसंग होणार नाही याची काळजी नक्कीच आम्ही घेऊ. आता सकारात्मक मनाने कंपनीत जा आणि पोलिसांना सहकार्य करा. पोलिसांना तक्रार द्या. पोलिसांनी वाळूज वाचवले म्हणून ते एक दिवसाच्या दंगलीवर निभावले. त्यांनी संयम सोडला असता तर आणखी आठ दिवस वाळूज पेटत राहिले असते,’ असे राम भोगले म्हणाले. आम्ही सर्व कर भरतो, पण आमच्या कंपन्या जाळताना कोणीच आले नाही, अशी खंत उद्योग भारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी व्यक्त केली.


दंगलखाेरांना कुठेच राेजगार मिळणार नाही 
दंगलखोरांना आम्ही कदापि क्षमा करणार नाही. हे दंगेखोर जर आमच्या कंपन्यांतील असतील तर त्यांना कामावरून काढू टाकू आणि नसतील तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कुठेच रोजगार मिळणार नाही याची काळजी घेऊ,' असा इशाराही वाळूजमधील उद्याेजकांच्या बैठकीतून देण्यात अाला. 

बातम्या आणखी आहेत...