आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मोगलांना जमले नाही ते भाजपने करून दाखवले : पाटील; स्वराज्यातील किल्ल्यांना हात लावणार नाही : मुख्यमंत्री

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्रातील २५ किल्ले हेरिटेज हाॅटेल, लग्न समारंभासाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. मोगलांना जे जमले नाही ते भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले राज्याचे दैवत आहेत. त्याच्यावर घाला घालण्याचे काम सरकार करत आहे. या निर्णयाला राष्ट्रवादीचा तीव्र विरोध आहे. पर्यटनाच्या नावाखाली किल्ले दुसऱ्या कामांसाठी न देता जसे आहेत तसे विकसित करून पर्यटनासाठी खुले करून द्यावेत. किल्ल्यांवर हॉटेल चालू झाल्यास बार पासून लग्नापर्यंत सर्व गोष्टी येणार असल्याचे ते म्हणाले.

अशोक चव्हाण यांचीही टीका : निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागून भारतीय जनता पक्षाने आता त्यांचेच गड-किल्ले खासगी हॉटेल व्यावसायिकांना विकण्याचा घाट घातल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. किल्ले हॉटेलमध्ये परिवर्तित करणे म्हणजे ते विकायला काढल्यासारखेच असल्याचे ते म्हणाले. 
 

किल्ले समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच नाही
गडकिल्ल्यांसंदर्भात येत असलेल्या चुकीच्या बातम्यांच्या अनुषंगाने पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात वर्ग-१ आणि दुसरे वर्ग-२ असे दोन प्रकारचे किल्ले आहेत. त्यापैकी वर्ग-२ मधील किल्ले पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.

या किल्ल्यांचा समावेश :
नागरधन – गोंड राजांकडून बांधकाम
कंधार- राष्ट्रकूट राजांकडून बांधकाम
नळदुर्ग- नळ राजांकडून बांधकाम
लळिंग- फारुखी राजांकडून बांधकाम
कोरिगड- निर्माता अज्ञात
साल्हेर- शिवरायांनी जिंकलेला किल्ला
घोडबंदर- पोर्तुगिजांकडून बांधकाम
पारोळा- झाशीच्या राणींच्या वडिलांकडून बांधकाम
 

स्वराज्यातील किल्ल्यांना हात लावणार नाही : मुख्यमंत्री
पुणे - हिंदवी स्वराज्य व मराठ्यांच्या इतिहासातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजाच्या किल्ल्यांना आम्ही नखभरही हात लावणार नाही. उलट आमचे सरकार त्या किल्ल्यांचे चांगले जतन करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितले.  गडकिल्ल्यांवर पर्यटन विभागाकडून राजस्थानच्या धर्तीवर लग्नसमारंभ व मेजवान्यांसाठी हॉटेल व रिसॉर्ट बांधण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केसरीवाड्यात स्पष्टीकरण दिले. गडकिल्ल्यांबाबत पसरलेली बातमी अतिशय चुकीची बातमी असून छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित कोणताही किल्ला भाड्याने देण्याची कधीही परवानगी देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य सरकारने रायगडावर अनेक कामे केली आहेत, तसा विकास यापूर्वी कोणत्याही सरकारने केला नाही, असेही त्यांनी सांगितले.
 

सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध : खासदार सुळे 
गड-किल्ल्यांवर पार्टी, लग्नसमारंभ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या गोष्टीचा मी निषेध करते. महाराष्ट्रातील गड-किल्ले हे महाराजांच्या पवित्र स्मृती आहेत. जागतिक मानांकनानुसार त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. गड-किल्ल्यांचे रिसॉर्ट, हेरिटेज हॉटेल्समध्ये रूपांतर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही तीव्र विरोध करत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
 

0