आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जागा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळवून देणारच

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या सर्वसाधारण सभेत बोलताना बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात इन्स्टिट्यूटसाठी जागा देण्याचे सूतोवाच केले.

मुख्यमंत्री म्हणाले, 'जालना जिल्ह्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भूखंड देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता त्या कामाची फाइल आम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर करू. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रगत ऊस व साखर तंत्रज्ञानासाठी पुणे गाठण्याची गरज भासणार नाही. जालना जिल्ह्यात एक शाखा उभारली जाणार आहे. त्यातून ऊस बेणे, ऊस पीक तंत्रज्ञान, साखर तंत्रज्ञान तसेच ऊसपीक-साखर उद्योगाविषयी तंत्रज्ञान मराठवाड्यात उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमदार अजित पवार, मंत्री जयंत पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

संपूर्ण कर्जमाफी देणारच : ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मंदीच्या काळात शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना त्याला कोणी वाली नाही. शेतकऱ्यांना अधिक मजबूत केले पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची घोषणा अमलात आणल्याशिवाय राहणार नाही. २ लाख रुपयांवरील कर्जमुक्तीच्या टप्प्यासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.

चुकीचं बोललो तर पवारांना जबाबदार धरा


ठाकरे म्हणाले, 'साखर उद्योगाबाबत शब्द चुकीचा बोललो तर त्याला वडिलांचे मित्र शरद पवार जबाबदार असतील. त्यांनी मला प्रेमाने मुख्यमंत्री होण्याचा आदेश दिला. चुकीचे बोलल्यास त्यांना जबाबदार धरा...'

कमी जागेत अधिक उत्पादन, तशीच पवारांनी सत्ता स्थापली

ठाकरे म्हणाले, 'कमी जागेत अधिक ऊस उत्पादन घ्यायला शरद पवार शिकवतात. त्याप्रमाणे राजकारणातही त्यांनी चमत्कार करत कमीत कमी आमदारांत सरकार बनवले. त्यामुळे आता कोणी जागा जास्त आहेत म्हणून आमचंच पीक येणार असे म्हणू नये.'

अजित पवार - हर्षवर्धन पाटील यांच्यात रंगली चर्चा

हर्षवर्धन पाटील व त्यांचे विरोधक अजित पवार यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा रंगली होती. स्पष्टीकरणात पाटील म्हणाले, 'अजित पवारांशी राजकीय नव्हे तर साखर कारखानदारी, शेतीवर चर्चा झाली. भाजप सोडण्याचा आपला कुठलाही विचार नाही.'

फडणवीसांचे आश्वासन ठाकरे पूर्ण करतील : पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जवळच ऊस शेती तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून प्रयत्न करत आहे. गतवर्षी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जालन्यात भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. ते थोडंसं राहिलेलं काम हे विद्यमान मुख्यमंत्री पूर्ण करतील. दिलेली आश्वासनं पाळत नाही म्हणून त्यांनी संघर्ष केला. जमीन देण्याचा निर्णय लवकर पूर्ण करतील.

मी अजूनही राष्ट्रवादीतच : विजयसिंह मोहिते पाटील

विजयसिंह मोहिते पाटलांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींच्या सभेत हजेरी लावली होती. गुरुवारी पुण्यातील कार्यक्रमात ते म्हणाले, मी कुठेही गेलेलो नाही. मी अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. मी याआधी तीन वेळा शरद पवार यांना भेटलो आहे.
 

बातम्या आणखी आहेत...