आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधान शेतीच्या या भूमीत सध्या चहाचे दुकान, ड्रॉइंग रूमपासून ग्रंथालयापर्यंत एकाच प्रश्नावर चर्चा झडत आहे, ती म्हणजे काय तो नेता खरेच मैदानात उतरेल की नाही याची. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे ते नेते आहेत. केरळच्या या पर्वतीय क्षेत्रातून त्यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चिले जात आहे. वायनाड मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राहुल यांचे नाव पुढे करणारे काँग्रेसचे सरचिटणीस ओमन चंडी यांनी आता मात्र माघार घेतली आहे. आपण राहुल वायनाडमधून उभे राहतील असे म्हणालोच नव्हतो, असा दावा त्यांनी केला आहे. चंडी म्हणाले, कर्नाटक व तामिळनाडूच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या राज्यातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे आपणही उत्साहित होऊन राहुल यांना केरळ काँग्रेसच्या वतीने वायनाड येथून लढण्याबाबत विनंती केली. हा मतदारसंघ पूर्णपणे सुरक्षितही आहे. यासंदर्भातील निर्णय काँग्रेस अध्यक्षांनाच घ्यावयाचा आहे, असे चंडी म्हणाले.
राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर अद्याप मौन धारण करणे पसंत केले आहे. दुसऱ्या दिवशी नवी दिल्लीत त्यांना याबाबतचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हसरा चेहरा करत उत्तर दिले. असे असले तरी धूर आला म्हणजे आग असेलच या दृष्टिकोनातून याकडे पाहू नये, अशी अपेक्षा चंडी यांनी व्यक्त केली आहे. चंडी यांच्याप्रमाणेच केरळमधील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी दिल्लीकडून चांगली माहिती मिळणार असल्याचे सांगत प्रबळ संकेत दिले. येथून आपला प्रचार सुरू करणारे वायनाड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष टी. सिद्दिक यांनी तर काँग्रेस अध्यक्षांसाठी औपचारिकरीत्या मैदानातून बाजूला होण्याची घोषणा केली आहे. पक्षाला आता सिद्दिकऐवजी अन्य नेत्यास वा त्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पक्षाशी सल्लामसलत केल्याशिवाय त्यांनी अशी घोषणा करावयास नको होती. वास्तवात त्यांनी तळागाळात थोडेफार कामही सुरू केले होते. त्यांनी किमान चंडी यांच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते. आता दिल्लीकडून कोणताही संदेश न आल्याने त्यांच्यापुढे ‘थांबा आणि वाट पाहा’ याशिवाय पर्याय नाही.
यादरम्यान राज्यात काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी तयारी चालवली आहे. काँग्रेस अध्यक्ष या निवडणुकीत आपल्यासोबत असतील या कल्पनेनेच ते आनंदून गेले आहेत. मात्र, तरीही सर्वत्र संभ्रम आहे. त्यांनी आता काँग्रेसच्या नेतृत्वाला विना विलंब भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, वायनाडमध्ये यूडीएफी प्रचार मोहीम थंडावली असून त्याचा परिणाम मतदारसंघावर होऊ शकतो. राहुल यांनी वास्तवात वायनाडचा गंभीर पर्याय म्हणून विचार केला होता का? त्यांनी तसा विचार केला असेल तर कदाचित त्यांनी या निर्णयामुळे काँग्रेस व माकपच्या संंबंधावर होणाऱ्या परिणामांचा विचार केलेला नसावा. हे दोन्ही पक्ष केरळमध्ये प्रतिस्पर्धी आहेत, मात्र येथून काही किमी अंतरावर तामिळनाडूमध्ये दोघे द्रमुकच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे घटक पक्ष आहेत. राहुल यांनी केरळमधून निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर माकप नेतृत्वही अनुकूल नाही. या मुद्द्यावर कठोर भूमिका अंगीकारत मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी काँग्रेसला बजावले की, माकपला मोठा शत्रू मानतात की भाजपला हे त्यांनी स्पष्ट करावे. अशा कोणत्याही कृतीमुळे लोकांत चुकीचा संदेश जाईल, असा इशारा देण्यासही ते विसरले नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.